अंबानींच्या विवाह सोहळ्यात काँग्रेस नेत्यांसह इंडी आघाडीचे वऱ्हाड

अंबानींच्या विवाह सोहळ्यात काँग्रेस नेत्यांसह इंडी आघाडीचे वऱ्हाड

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या म्हणजे अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात नाचल्याबद्दल तेजस ठाकरे प्रचंड ट्रोल झाले. सगळे प्री-वेडींग सोहळे तसेच मुख्य विवाह सोहळ्यात सह परीवार सहभागी झाल्याबद्दल उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाकी टीका झेलत होते. गेल्या दोन दिवसात या विवाह सोहळ्यात इंडी आघाडीच्या तमाम नेत्यांनी रांग लावल्यामुळे ठाकरेंना थोडे हलके वाटत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींना देश विकला असे म्हणणारे हे लोक अनंत अंबानी यांच्या चार्टर्ड विमानातून इथपर्यंत येऊन विवाह सोहळ्यात मेजवानी झोडत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मोदींच्या विरोधात एक मुद्दा लागतो. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी अदानी-अंबानी यांचा मुद्दा मोदींच्या विरोधात वापरला. हे अदानी-अंबानी यांचे सरकार आहे. मोदींनी उद्योगपतींना देश विकला आहे. मोदी गरीबाच्या, शेतकऱ्याच्या खिशातून पैसे काढून ते त्यांच्या उद्योगपती मित्रांचे खिसे भरतात. मोदी इस्त्रायलला जातात, तिथे अदानी यांना बंदराचे काम मिळते. ऑस्ट्रेलियाला जातात तिथे कोळशाच्या खाणी मिळतात, बांगलादेशात गेले की तिथे वीज पुरवठ्याचे काम मिळते, असे आरोपपत्र राहुल गांधी यांनी मोदींवर ठेवले होते.
तुम्ही जेव्हा पंखा लावता तेव्हा पैसे अदानींच्या खात्यात जातात, अशी फाजील विधाने केली. ही टीका त्यांनी इंडी आघाडीच्या मंचावर केली. इंडी आघाडीच्या सभेत त्यांच्या मित्र पक्षांसमोर केली, पत्रकार परिषदांमध्ये केली. त्या विधानांवर मौन बाळगणारे नेते अंबानीच्या विवाह सोहळ्यात मेजवान्या झोडायला गेले.

उद्धव ठाकरे तर जाम नगर, युरोपची क्रुझ पार्टी, बीकेसी अशा तिन्ही ठिकाणी सह परिवार उपस्थित होते. बीकेसीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांचे तर सगळे खानदान विवाह सोहळ्यात पोहोचले होते. त्यांच्यासाठी अंबानी यांनी विशेष चार्टर्ड विमान पाठवले होते. सपाचे नेते अखिलेश यादवही आले होते. राहुल गांधी यांनी उद्योगपतींना टार्गेट केल्यामुळे काँग्रेस नेते तिथे जाणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु सलमान खुर्शीद तिथे पोहोचले.

मुकेश अंबानी स्वतः दहा जनपथवर जाऊन सोनिया गांधींना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देऊन आले होते. परंतु, गांधी परिवारातील कोणीही अद्यापि विवाह सोहळ्याला आलेले नाही. मोदींना विरोध करण्यासाठीच उद्योगपतींच्या नावाने ठणाणा सुरू होता. इंडी आघाडीचे नेते राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळत होते. आम्ही कसे गोरगरीबांच्या बाजूने आवाज उठवतो, हे दाखवण्यासाठी अदानी-अंबानी यांना व्हिलन बनवणे आवश्यक होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनासाठी ही स्क्रीप्ट लिहीण्यात आली. परंतु, आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत. जनतेला टोपी लावण्याची योजना यशस्वी झालेली आहे. त्यामुळे आता अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला जायला काहीच हरकत नाही. पुढच्या निवडणुकांच्या काळात वेगळा मुद्दा उपस्थित करू, असा विचार करून विरोधक अंबानी विवाह सोहळ्यात सामील झाली असावी.

हे ही वाचा:

“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”

उबाठाचा ‘अजगर’ लहान पक्षांना गिळतोय !

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक

स्पष्टच झालं…मविआमध्ये सगळं आलबेल नाही!

इंडी आघाडीच्या राजकारणाचे पितळ उघड करण्याचे श्रेय मुकेश अंबानी यांना दिले पाहिजे. त्यांनी प्रत्येक राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिले. आग्रह केला. परंतु, हे निमंत्रण नाकारणे या राजकीय नेत्यांच्या हाती होते. तुम्ही गरीबांचा पैसा उद्योगपतींच्या घशात घालता, असे सांगता आले असते. मोदी तुमच्यासाठी राज्य चावलतात, तुम्हीच या राज्याचे लाभार्थी आहात, तुम्ही जनविरोधी आहात, असे म्हणून विवाह सोहळा टाळता आला असता. मेजवान्या नाकारता आल्या असत्या, परंतु एकाही नेत्याने असे काहीही केले नाही.

राहुल गांधी यांना मुर्खात काढण्याचे काम फक्त इंडी आघाडीच्या नेत्यांनी केले अशातला भाग नाही. काँग्रेस नेत्यांनी सुद्धा हेच केले. सलमान खुर्शीद तिथे पोहोचले याचा अर्थ अन्य नेतेही गेले असणार. राहुल गांधी यांना आम्ही फार मनावर घेत नाही, हे काँग्रेस नेत्यांनीही दाखवून दिले. देशात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा पेट्रोलियम मंत्री कोण हे अंबानी परिवार ठरवायचा. काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा हे सरकार आणि रिलायन्समधील दुवा होते. अंबानी परिवाराचा काँग्रेसशी घनिष्ट संबंध राहिलेला आहे. जनता हा इतिहास विसरलेली नाही. राहुल गांधी उद्योगपतींच्या नावाने जनतेला मुर्ख बनवत होते. अनंत अंबांनी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. आता विवाह सोहळ्यात उपस्थिती लावल्यानंतर ही मंडळी अंबानी यांच्याविरोधात गरळ ओकणारच नाहीत, याची अजिबात खात्री देता येत नाही. राहुल गांधी प्रणीत या मुद्दयाची हवा निघाली हे मात्र नक्की.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version