लोकसभेतील जागावाटपासाठी सिल्व्हर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काय झाले, त्याचे काही महत्वाचे तपशील ‘न्यूज डंका’कडे आहेत. शिउबाठाने या बैठकीत जिंकलेल्या १८ जागांसह २० जागांची मागणी केलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हवी असलेली १८ वी जागा म्हणजे अमरावती आणि आणि १९ वी जागा म्हणजे छत्रपती संभाजी नगर होय. यापैकी अमरावती त्यांनी राणा दांपत्याचा हिशोब चुकते करण्यासाठी मागितलेली आहे, हे उघड.
सत्ता राबवताना उद्धव ठाकरे यांचे सूडाचे रंग जनतेने वारंवार पाहीले. आता लोकसभेसाठी जागा मागतानाही त्यांनी काही जागांसाठी सूड हाच निकष ठेवलेला दिसतो. सत्ता गमावल्यामुळे घट्ट झालेली मविआची वज्रमुठ लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेच सैल होताना दिसते आहे.
‘सिल्व्हर ओक’ वर झालेल्या बैठकीत नेमके काय घडले याबाबत मविआतील तीन्ही पक्षांचे नेते तोंड आवळून बसलेले आहेत. त्याचे कारण म्हणजे बैठकीत झालेली चर्चा बाहेर आली, तर आपसातले खटले लोकांसमोर येणार. मविआच्या नेत्यांना हे माहीत आहे. त्यामुळे वर्तमानापत्रात जागा वाटपाबाबत आलेल्या बातम्या साफ चुकीच्या आहेत, असा दावा हे नेते वारंवार करतायत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठकीत जिंकण्याची क्षमता या निकषावर जागा वाटप करावे असा मुद्दा मांडला होता. परंतु हा निकष ठाकरे गटाला परवडणारा नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याला कडाडून विरोध केला होता.
‘आम्ही जिंकलेल्या जागा सोडणार नाही. या जागा आम्हाला मिळाल्या नाही तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल’, असे ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले. या १८ जागांच्या व्यतिरीक्त अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर या दोन्ही जागा त्यांनी मागितलेल्या आहेत. मविआच्या काळात गाजलेले हनुमान चालीसा प्रकरण ठाकरेना अजून ठसठसते आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती नवनीत राणा या दोघांनी उद्धव ठाकरेंशी उघड पंगा घेतला होता. तुरुंगाच्या कोठडीत काढलेले १४ दिवस राणा दांपत्य विसरलेले नाही. जेलमधून बाहेर आल्यावर रवी आणि नवनीत राणा यांनी सातत्याने ठाकरेंवर घणाघात केलेला आहे. जो रामाचा होऊ शकला नाही तो हनुमानाचा असा काय होईल?
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्वप्नाची माती केली…, उद्धव ठाकरेंनी जनतेतून निवडणूक लढवावी, मी त्यांच्याविरुद्ध लढेन… ही वानगी दाखल नवनीत राणा यांची काही विधाने. ठाकरे गट अमरावतीची मागणी करतोय, ती याच विधानांमुळे. जो खुन्नस ठाकरेंना रामदास कदम, भरत गोगावले यांच्याविरोधात आहे, तेवढाच खुन्नस त्यांच्या मनात नवनीत राणा यांच्याबद्दल आहे. त्यामुळे राणा दांपत्याचे हिशोब चुकते करण्यासाठी ठाकरे उत्सुक आहेत. गेल्या वेळी नवनीत राणा अमरावतीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठींबा दिला होता. यावेळी हा मतदार संघ लढण्याची शिउबाठाला तीव्र इच्छा आहे. वेळ प्रसंगी ते छत्रपती संभाजीनगरचा दावा सोडतील परंतु अमरावती सोडण्याची त्यांची तयारी नाही.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना दोन जागा दिल्या तरी ते घेतील!
आदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?
अदानी उद्योगातील गुंतवणूकदारांची तीन दिवसांत झाली चांदी
तिसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे काश्मिराचे स्वप्न झाले पूर्ण
ठाकरेंचे सगळे राजकारणच भावनिक आधारावर सुरू आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, हे उद्धव ठाकरे दर दुसऱ्या सभेत सांगतायत. जिंकलेल्या १८ पैकी एकही जागा सोडली तर कार्यकर्ते नाराज होतील, जनतेच चुकीचा संदेश जाईल, असे भावनिक आवाहन त्यांनी मविआतील मित्र पक्षांना केलेले आहे. आता अमरावतीची जागाही ते भावनिक साद घालूनच मिळवण्याचा प्रयत्न करतील असे दिसते. जिंकलेल्या जागा सोडणार नाही, असा चंग ठाकरे गटाने बांधल्यामुळे काँग्रेस पक्ष एका वेगळ्या फॉर्म्यूलावर काम करतो आहे.
ठाकरे गटाला १८ जागा सोडायच्या. उर्वरीत दोन पक्षांनीही जिंकलेल्या जागा लढायच्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी जिंकलेल्या ४ जागा आणि काँग्रेसकडे त्यांनी जिंकलेली एक जागा राहील. उर्वरीत २५ जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वाटून घ्याव्यात. या फॉर्म्यूलानुसार काँग्रेसने १५, राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागा आणि १८ जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येतील. परंतु हा काँग्रेसने ठरवलेला फॉर्म्यूला आहे. यावर अजून बाकी दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केलेले नाही. नाना पटोले यांनी माढा आणि सोलापूर या जागा आपल्याच असल्याचे सांगितले आहे. दोन्ही ठिकाणी भाजपाचे खासदार आहेत. सोलापूरमध्ये अभिजित पाटील यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने या जागेवर आपला रस असल्याचे संकेत दिले आहेत. जागा वाटपाचे प्रत्येक पक्षाचे आपापले सूत्र आहे. याबाबत अंतिम निर्णयापर्यंत येण्यासाठी प्रत्येक पक्षाचे दोन नेते घेऊन एक समिती बनवावी. त्या समितीने याबाबत निर्णय घ्यावा. अशी चर्चाही सिल्व्हर ओकच्या बैठकीत झालेली आहे. ही पवारांनी उघड केलेली माहिती आहे. परंतु एकूणच एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाला फार जमेस धरत नाही, असेच चित्र दिसते आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा मविआतील मोठा भाऊ असे विधान केले. त्याला तात्काळ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ असे अजित पवारांना म्हणायत. ते योग्यही असले तरी त्याला फारसे महत्व नाही, असे चव्हाण म्हणाले. म्हणजे प्रत्येक पक्षाला वाटते आहे की आपण म्हणतो तेच योग्य. अजून मविआतील प्रमुख तीन पक्षांची भूमिका ठरत नसल्यामुळे वंचित आघाडीसारखे घटक पक्ष अजून कुंपणावर आहेत.
प्रकाश आंबेडकरांना अकोल्याच्या जागेपुरता या वाटाघाटींमध्ये रस आहे. ती जागा तर शिवसेना-भाजपा अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते आंबेडकर यांच्यासाठी सोडायला तयार होतील. त्यामुळेच आंबेडकर यांनी अद्यापि आपले पत्ते उघड केलेले नाहीत. जागा वाटप करताना उमेदवार कोण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. आणि अखेर जागावाटप याच निकषावर करावे लागेल. त्यासाठी जागांची अदलाबदल करण्याची काही ठिकाणी मागे पुढे येण्याची तयारी मविआतील नेते दाखवतील. परंतु मिशांना पिळ देण्याचा ठाकरेंचा स्वभाव या प्रक्रीयेत मोठा अडसर ठरणार आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरची हाळी देऊन त्यांनी त्याची झलक दाखवलीच आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)