गुजरात निवडणुकांमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. हा विजय अनपेक्षित अजिबातच नाही. आम आदमी पार्टी राज्यात काँग्रेसला धक्क्याला लावेल असा अंदाज होताच. परंतु या दोन्ही पक्षाच्या मतांच्या बेरजेपेक्षा भाजपाला मिळालेली मतं जास्त आहेत. ५३ टक्के मतं जनतेने पक्षाच्या पारड्यात टाकली आहेत. ५३ टक्क्यांच्या अर्थ भाजपाला अधिक सुखावणारा आहे.
दिल्ली पंजाब नंतर गुजरातमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येईल, असा दावा पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. गुजरातच्या मतदारांना फुकट पाणी आणि वीजेचे आश्वासन दिल्यामुळे इथेही मतांचे पीक येईल, अशी त्यांना वाटत होती. परंतु आपच्या वाट्याला दोन आकडी आमदारीही आले नाहीत. पैशाची वारेमाप पेरणी करून आपचा गाडा पाचवर अडकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गुजरातच्या जनतेत पराकोटीच्या आदराची भूमिका आहे. भाजपातील अनेक दगडांना तारणारा हा नेता आहे, त्यामुळे विरोधकांना मोदी कायम खुपतात. गुजरात निवडणुकीत आपच्या नेत्यांनी मोदींना लक्ष्य बनवले होते. गुजरात आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी मोदींवर विखारी टीका करून आपचा कपाळमोक्ष निश्चित केला होता.
गेल्या निवडणुकीत पाटीदार आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाला कांटे की टक्कर देणाऱ्या काँग्रेसचा पालापाचोळा झाला. काँग्रेसला या निवडणुकीत आजवरच्या इतिहासातील कमी मतं आणि जागा मिळालेल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ४१.४० टक्के मतांसह ७७ जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष फक्त १७ जागांवर गडगडला आहे. मतांचा टक्का २७ टक्क्यांवर आला आहे. घटलेली ही आपच्या वाट्याला आली आहेत हे निर्विवाद. आपने १३.६ टक्के मतं घेतली आहेत.
गुजरात ही संघ परिवाराच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे, असा प्रचार भाजपाविरोधक नेहमीच करत असतात. गुजरातची जनता कडवट हिंदुत्ववादी आहे हे सत्य असले तरी मोदींच्या राजवटीत गुजरात ही विकासाची प्रयोगशाळा बनली. सिंचन, वीज, रस्ते, उद्योगधंदे, सौर उर्जेचे देशातील सर्वाधिक काम गुजरातमध्ये झाले आहे. या सर्वच आघाड्यांवर गुजरातने थक्क करणारी आगेकूच केली. परंतु या विकासाकडे कायम दुर्लक्ष करून विरोधक कायम २००२ च्या दंगलीचा कोळसा उगाळत राहिले. या निवडणुकीतही बिल्कीस बानोचे प्रकरण तापवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. त्यांनी पुन्हा गुजरात दंगलींच्या खपल्या काढण्याचा प्रयत्न केला.
आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या तुलनेत अधिक सफाईने अल्पसंख्यकांना जवळ करण्याचा प्रय़त्न केला. तथाकथित धर्मनिरपेक्ष मतांची या दोन पक्षांमध्ये मतविभागणी झाल्यामुळे भाजपाच्या मार्ग निर्वेध झाला असा युक्तिवाद करण्याची सोय सुद्धा निकालानंतर समोर आलेल्या आकड्यांनी शिल्लक ठेवलेली नाही. इतके भाजपाचे यश निर्भेळ आहे. राज्यातील सुमारे ५३ टक्के पेक्षा जास्त जनतेने भाजपाच्या पारड्यात मत टाकले आहे. गेल्या वेळी भाजपाला ४९ टक्के मतं होती. याचा अर्थ मतांचा टक्का चार टक्क्यांनी वाढला आहे. या मतांमध्ये काही प्रमाण अल्पसंख्यांक मतांचे सुद्धा आहे हे कोणताही राजकीय विश्लेषक नाकारू शकत नाही.
देशात जेव्हा मोदींची लोकप्रियता आणि विरोधकांमध्ये मोदी विरोधाचा ज्वर प्रचंड वाढत असताना भाजपाविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी काही लोक कामाला लागले. आघाडीच्या निमित्ताने कदाचित पंतप्रधान पदाचा लग्गा लागू शकेल या आशेने शरद पवार, त्यांचे चेले चपाटे महाराष्ट्रात आघाडीवर होते. याच दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला. उद्धव ठाकरे भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वळचणीला गेले. महाराष्ट्रात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. कन्हैया कुमार यांच्यासारखे छुटभैये नेतेही या गर्दीत सामील झाले.
हे ही वाचा:
बेस्ट डबल डेकर बसला हॅप्पी बर्थडे@८५
चालत्या ट्रेनमध्ये दरोडा टाकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
उद्धव ठाकरेंचे ब्रह्मास्त्र म्हणजे, ‘टोमणे अस्त्र’
गुजरातमध्ये भाजपच्या शपथविधीची तारीख निश्चित
ही लगबग सुरू झाली तेव्हा एक चित्र स्पष्ट होऊ लागले. भाजपाला पराभूत करण्यासाठी आणि स्वत:चे अस्तित्व वाचवण्यासाठी एक दिवस भाजपा विरुद्ध सर्व असा सामना होऊ शकतो. त्या दृष्टीने भाजपाने तयारी सुरू केली. विरोधक एकत्र आल्यानंतरही सत्तेचे गणित जुळवायचे असेल तर भाजपाला ५० टक्के पेक्षा जास्त मतं मिळवण्याचे लक्ष्य ठेवून चालावे लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने १३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ५० टक्क्यांचा जादूई आकडा पार केला.
गुजरात निवडणुकीत भाजपाने ही रणनीती यशस्वी करून दाखवली. काँग्रेस, आप या पक्षांसह अन्य पक्षांच्या मतांची बेरीज केली तरीही भाजपाच्या मतांचा टक्का जास्त आहे. गुजरातच्या प्रयोगशाळेत भाजपाने हा नवा प्रयोग तडीस नेला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या छताखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा आधीच एकत्र आहेत. तरीही उद्धव ठाकरे ही मोट अधिक भक्कम करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, भारीप बहुजन महासंघ अशा पक्षांशी आघाडी करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जर भाजपाला मैदान मारायचे असेल तर मित्र पक्षांच्या साथीने ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा काबीज करण्याचे लक्ष्य ठेवायला हवे हाच गुजरात निवडणुकांचा धडा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)