मुख्यमंत्री पदाचा मुद्दा मविआमध्ये पुन्हा चर्चेत आला, निमित्त होते षण्मुखानंद सभागृहात आज संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याचे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, मी त्याला पाठींबा देतो, असे विधान उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना केले. वरकरणी ही ठाकरेंची दर्यादिली वाटण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री पदावरून मविआत जे काही राजकारण सुरू आहे, त्याचा हा नवा सिझन आहे. ठाकरेंच्या या खेळीमुळे मविआतील अंतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे. या तापलेल्या तव्यावर पोळी मात्र दुसऱ्याच कुणाची शेकली जाईल अशी शक्यता आहे.
‘चेहरा जाहीर करण्याची काय गरज आहे’? हे विधान इंडी आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार केले जाते. कारण चेहऱ्यावर कधीच एकमत नसते. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांना पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करता आलेला नव्हता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यात काही रस नाही. उद्धव ठाकरेंना मात्र उतावीळ झालेले आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची घोषणा त्यांना निवडणुकीच्या आधीच हवी आहे. मविआच्या मेळाव्यात त्यांनी केलेले विधान त्यांच्या मनात सुरू असलेली चलबिचल व्यक्त करणारे आहे.
पृथ्वीराजजी, पवार साहेब, कोणाचेही नाव जाहीर का, उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करा, इतर कोणाचे जाहीर करा, माझा पाठींबा असेल, असे ठाकरे म्हणाले. त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की ते स्वत: इच्छुक आहे.
दिल्लीश्वर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या नावावर शिक्कामोर्तब करावे म्हणून ठाकरे दिल्लीत तीन दिवस ठाण मांडून होते. परंतु त्यांची डाळ शिजली नाही. जे वरून होऊ शकले नाही ते खालून तरी व्हावे हा त्यांचा प्रयत्न आहे.
काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेली विधाने ऐकल्यावर कुणाचेही असे मत बनू शकेल की, ते ठाकरेंसाठी वातावरण निर्मिती करतायत. ‘व्हीलनच्या विरोधात हिरोचा एक चेहरा हवा. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहेत’, असे विधान त्यांनी केले. ‘काँग्रेसकडे चेहरा असेल तर त्यांनी उमेदवार जाहीर करावा’, अशी पुस्तीही राऊत यांनी जोडली. खरेच त्यांच्या मनात तसे आहे का?
राजकारणात खायचे दात आणि दाखवायचे सुळे वेगळे असतात. मविआची सत्ता गेल्यापासून राऊतांनी ठाकरेंचा ग्राफ पद्धतशीरपणे खाली आणलेला आहे. राऊत ठाकरेंबाबत जी विधाने करतात, ती मीम्स बनवण्यासाठी एकदम उपयुक्त असतात. कधी ते त्यांना डब्ल्यूएचओचे सल्लागार बनवतात, कधी पुतीन आणि बायडनसोबत त्यांना जोडतात. कधी त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून गुळ लावतात. राऊतांची ही विधाने ऐकून ठाकरेंना गार गार वाटते. राऊतही हे ठाकरेंचे किती निष्ठावान, पक्षाचे किती कट्टर असे चित्र निर्माण होते. ईडीची कारवाई होऊन सुद्धा आपण ठाकरेंची साथ सोडली नाही, हे अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर
वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे नवीन भूखंडावर पुनर्वसन
भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
सण, उत्सव असल्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका आत्ता नाहीत
हे सगळे उपद्व्याप करण्यामागे राऊतांची रणनीती आहे, असे म्हटल्यावर कोणी त्यावर फार विश्वास ठेवणार नाही. परंतु हे सत्य आहे. गेल्या काही वर्षात उबाठा शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्यानंतरचा दोन नंबरचा नेता अशी प्रतिमा बनवण्यात राऊतांना यश मिळाले आहे. ठाकरे पिता-पुत्रांच्या खांद्यावर हात ठेवणारा दुसरा नेता त्यांच्या पक्षात नाही. ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवण्यासाठी फिल्डींग लावत असल्याचे चित्र ते निर्माण करत असले तरी ते आभासी आहे. राऊतांना हे पक्के ठाऊक आहे, मविआच्या सत्ता काळात ठाकरेंच्या कार्यशैलीचा अनुभव घेतल्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंना खांद्यावर घेण्यास इच्छूक नाहीत. ठाकरेंच्या नावावर चौकट मारण्यात आली तर आपली वर्णी लागू शकते.
कारण मुख्यमंत्री उबाठा शिवसेनेचाच असा हट्ट जर ठाकरेंनी धरला, तर आपले नाव पुढे येऊ शकते. त्यांच्या नावाला शरद पवार आणि राहुल गांधी यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. ते शरद पवारांचे घरचेच आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते ज्या त्वेषाने तुटून पडतात त्यामुळे ते राहुल गांधी यांच्याही गुडबुकमध्ये आहेत.
राऊत पद्धतशीरपणे सोंगट्या हलवतायत. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची लालसा जितकी जुनी आहे, तितकीच ती राऊतांचीही आहे. परंतु त्यांनी याचा वास कधी कुणाला लागू दिलेला नाही. त्यामुळेच पक्षात त्यांचे वजन वाढत राहिले.
अर्थात ही सगळी रणनीती मविआची सत्ता येणार या गृहितकावर आधारीत आहे. ती येईलच असे आज तरी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. जे दिसते तसे नसते हा राजकारणाचा अलिखित नियम आहे. मविआतील राजकारण आज त्याच वळणावरून पुढे जात आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)