धोतराला हात घालणाऱ्या पत्रकारांचा नाद नको रे बाबा..

आघाडीच्या नेत्यांना मीडियातील काही विशिष्ट वर्गाचे वावडे

धोतराला हात घालणाऱ्या पत्रकारांचा नाद नको रे बाबा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील ६-जनपथ या निवासस्थानी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी महत्वाची घोषणा केली. काही न्यूज चॅनलच्या चर्चांवर इंडी आघाडीचे तमाम सदस्य बहिष्कार घालणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अर्थात धोतराला हात घालणाऱ्या मीडियाच्या वाटेला जायचे नाही, असे आघाडीच्या नेत्यांनी सर्वोनुमते ठरवलेले दिसते. ६- जनपथवर काल बुधवारी झालेल्या बैठकीत झालेले काही महत्वाचे निर्णय जाहीर करताना अखेरीस वेणुगोपाल यांनी ही माहिती जाहीर केली.

 

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चेला काल अखेर इंडी आघाडीच्या बैठकीत मुहूर्त मिळाला. देशात ठिकठिकाणी आघाडीच्या जाहीर सभा होतील आणि त्याचा शुभारंभ भोपाळपासून होणार आहे. प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी ईडीने समन्स बजावल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, अशी माहिती वेणुगोपाल यांनी उघड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूडाच्या राजकारणाचा त्यांनी निषेध केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी कंबर कसणाऱ्या आघाडीच्या नेत्यांना मीडियातील काही विशिष्ट वर्गाचे वावडे आहे. कारण हा वर्ग अडचणीचे प्रश्न विचारतो. यांच्या भानगडी बाहेर काढतो, भारतविरोधी अजेंड्याच्या मुद्द्यावर आघाडीच्या नेत्यांना झोडतो, असा मीडिया आघाडीच्या नेत्यांना झोंबतो. आघाडीचे सर्व नेते याबाबत एका माळेचे मणी आहेत. वाढत्या वयामुळे पवार अलिकडे वारंवार पत्रकारावर डाफरत असतात. फक्त सोयीच्या प्रश्नांवर त्यांची कळी खुलताना दिसते. अडचणीचे प्रश्न विचारणारे पत्रकार पवारांना नकोसे असतात. अशा पत्रकार परिषदांमध्ये बोलावू नका असे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.

 

२०१९ च्या निवडणुकांच्या आधी तुमच्या पक्षातील नेते, इतकंच काय तुमचे नातेवाईक पक्ष सोडून जातायत? असा प्रश्न विचारल्यानंतर पत्रकाराला माफी मागायला सांगणारे पवार इतके चिडले की, सभ्यता नसलेल्या पत्रकारांना बोलावत जाऊ नका असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. नातेवाईक पक्ष का सोडतायत, या प्रश्नामध्ये खटकण्यासारखे असे काय होते? पवारांच्या दुखऱ्या नसेवर पत्रकारांने चुकून बोट ठेवले हा त्याचा दोष असू शकतो कदाचित.

 

अनिल देशमुखांच्या १०० कोटीच्या प्रकरणावर प्रश्न विचारणाऱ्या दिल्लीतील महिला पत्रकारावर शरद पवार भडकले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कराडमध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत, हे अजित पवारांचे बंड आहे की तुमच्या आशीर्वादाने झाले आहे ? असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संतापलेले पवार म्हणाले, पत्रकारितेचा दर्जा खराब करू नका. त्यांचे चेले संजय राऊत यांनी तर पत्रकारांसमोर शिवीगाळ करण्यापासून थुंकण्यापर्यंत सर्व काही केलेले आहे, परंतु त्यांना कधी पत्रकारितेचा किंवा राजकारणाचा दर्जा खराब करू नका असा सल्ला पवारांनी दिलेला ऐकीवात नाही.

 

हे ही वाचा:

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

शौर्याला सलाम: जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली

चिनी शिष्टमंडळाचा २० बॅगा हॉटेलच्या खोलीत नेण्यासाठी आग्रह होता

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

नावडत्या पत्रकारांना गप्प बसवण्यासाठी राहुल गांधी त्यांना थेट विचारतात की आप बीजेपी के एजण्ट हो क्या?
इंडी आघाडीचे नेते कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करत असतात. तेच अभिव्यक्ति स्वातंत्र्य त्यांच्याविरोधात वापरले की मग त्यांचा थयथयाट सुरू होतो. पुण्यप्रसून वाजपेयी हा आज तकचा पत्रकार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मुलाखती आधी प्रश्नांचे फिक्सिंग करतोय, हा व्हीडीयो मार्च २०१४ मध्ये प्रचंड व्हायरल झाला होता.

 

 

असे सोयीचे पत्रकार इतके बदनाम झाले की त्यांना चॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे इंडी आघाडीच्या नेत्यांची तळी उचलणाऱ्या त्यांच्या आदेशावरून मोदीविरोधी प्रपोगंडा चालवणाऱ्या पत्रकांरांची चॅनल विश्वातून झालेली गच्छंति हा इंडी आघाडीतील नेते मंडळींसाठी चिंतेचा विषय आहे, त्याचप्रमाणे अलिकडे भीडभाड न ठेवता काँग्रेसच्या अजेंड्याची चिरफाड करणारा पत्रकार ही सुद्धा त्यांच्यासाठी डोकेदुखी बनली आहे. काँग्रेसकडे बोलणारी माणसे नाहीत. संजय झा, रणजीत सुरजेवाला, सुप्रिया श्रीनेत्र ही मंडळी सुधांशू त्रिवेदी, संबित पात्रा किंवा शहजाद पूनावाला यांच्यासमोर टिकत नाहीत. चॅनलचे अँकरही पूर्वी प्रमाणे काँग्रेसला झुकतेमाप देण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे चर्चेच्या वेळी काँग्रेसवाल्यांना पळताभूई थोडी होते.

 

ईंडी आघाडीचे काही नेते तर स्क्रीप्ट शिवाय बोलू शकत नाहीत. जेव्हा स्क्रिप्ट बाहेरचे काही येते तेव्हा त्यांची भंबेरी उडते. जळगाव दौऱ्यावर शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असा अनुभव आला. ठाकरे बांधावर गेले असताना सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. आमच्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी तुम्हाला मिळाली का, असा प्रश्न तीन तीन वेळा ठाकरेंनी शेतकऱ्याला विचारला. परंतु तिन्ही वेळेला नाही साहेब आम्हाला नाही मिळाली तुम्ही केलेली कर्जमाफी. ठाकरे अवाक झाले आणि त्यांनी गुमान तिथून पाय काढला.

 

इंडी आघाडीच्या नेत्यांच्या अशा दुखऱ्या नसा बऱ्याच आहेत. त्यांच्यावर हात ठेवण्याची संधी पत्रकारांना देऊन उगाच बोंबलत बसण्यापेक्षा ऐकण्यातल्या पत्रकारांनाच निमंत्रणे धाडावीत आणि पत्रकार परिषदा मनाप्रमाणे गाजवाव्यात असे पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमताने ठरले असावे. त्यामुळे चर्चेसाठी कुठल्या चॅनलवर जायचे, पत्रकार परीषदांना कोणाला बोलवायचे याचा तपशील त्यांनी ठरवून टाकला.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version