मोदींना रोखण्यासाठी ‘चार आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला’…

तोंडाच्या वाफांपलिकडे आणि मोदी-शहांना शिव्या घालण्याच्या पलिकडे कोणाचीच उडी नाही

मोदींना रोखण्यासाठी ‘चार आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला’…

भाजपा हरवण्यासाठी मुंबईत एकत्र आलेले २८ पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव पाहण्यासाठी, भाजपाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी प्रचंड आसुसलेले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात मध्ये I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीसाठी आज दिवसभर नेत्यांचे आगमन सुरू आहे. संध्याकाळपासून कार्यक्रमांना सुरूवात होईल. बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर जर नजर टाकली तर मेंदू तवा फ्राय होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पराभवासाठी एखाद्या धाडसी रणनीतीवर खल कमी आणि बाकी फाफटपसारा जास्त असे बैठकीचे चित्र आहे. त्यामुळे ही बैठक भाजपाविरोधी हौशागवशांची जत्रा ठरण्याची शक्यता जास्त आहे.

देशभरातील २८ पक्षांचे ६३ नेते बैठकीला येणार आहेत. शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीचे यजमानपद आहे. ही बैठक म्हणजे भाजपाच्या पराभवाची नांदी अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रय़त्न होतोय. ‘I.N.D.I.A’  आघाडीचा पराभव मुश्कील ही नही नामुमकीन है’, अशी डायलॉगबाजी विश्वप्रवक्ते संजय राऊत करतायत. बैठकीचा एकूण माहोलच फिल्मी आहे. प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल बिग बी अमिताभ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईला येण्याचे त्यांचे मूळ प्रयोजन अमिताभ यांची भेट घेणे हे आहे की, I.N.D.I.A च्या बैठकीत सामील होणे, हे कळायला मार्ग नाही.

 

त्यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली तरी त्याचा फायदा त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत होण्यासाठी होणार नाही, हे संजय राऊतांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. ‘राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेते आहेत’, असे ते म्हणाले आहेत. राऊतांचा आत्मविश्वास जबर वाढलेला आहे. आधी त्यांना ते म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र वाटायचा. आता त्यांच्या कक्षा देशव्यापी झाल्या आहेत. गैरसमजाला काही औषध नसते.     राऊतांच्या विधानाचा अर्थ उद्धवना राखी बांधल्यानंतरही ममता यांच्या पदरात ओवाळणी पडलेली नाही. आम आदमी पार्टी, समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी अनुक्रमे अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करावे अशी लाडीक मागणी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या समर्थकांनी हयात समोर बॅनरबाजी करून त्यांना भावी पंतप्रधान पदावर विराजमानही करून टाकले.

‘गाव बसा नही और भिकारी पहलेही आ गये…’ असे आघाडीचे चित्र आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कुणीही भावी पंतप्रधान म्हणून घेत नाही, की आघाडीचे अध्यक्ष म्हणून. मराठी माध्यमांना त्यामुळे प्रचंड अस्वस्थ वाटले असावे. जिथे कमी तिथे आम्ही या धर्तीवर त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने मोर्चा लढवायला घेतलेला आहे. पवार आघाडीचे समन्वयक होऊ शकतील अशी पुडी सोडून दिलेली आहे. ही बातमी अगदीच कोरडी थाप वाटू नये म्हणून जोडीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव जोडून टाकले. भले पवारांचा सगळा पक्ष त्यांना सोडून गेला, परंतु काही मराठी पत्रकार मात्र त्यांच्या मीठाला आजही जागतायत.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पदाची दावेदारी कधीच सोडून दिली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना दिल्लीच्या तख्तावर बसवण्यासाठी उतावीळ झालेले संजय राऊत अलिकडे फक्त आणि फक्त राहुल गांधी यांचा झेंडा नाचवण्यात व्यस्त असल्यामुळे उद्धव ठाकरे बहुधा नाराज आहेत. तूर्तास ते I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीचे यजमानपद मिळाले यातच समाधानी आहेत.

I.N.D.I.A आघाडीतील नेत्यांचा सूर सध्या असा आहे. आता थोडं कार्यक्रमावर बोलू. तर मंडळी ३१ ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजता पाहुण्याचे स्वागत होईल. ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने शिरावर घेतली आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने आघाडीच्या लोगोचे अनावरण होईल. बैठकीत राजकीय रंग कमी आणि कॉर्पोरेट टच जास्त दिसतोय.

आठ वाजता यजमान उद्धव ठाकरे यांच्या स्नेहभोजनाला सुरूवात होईल. १ सप्टेंबरला ११ वाजता आघाडीचे ६३ नेते एकत्र फोटो सेशन करतील. म्हणजे तोच हातात हात घालून उंचावण्याचा सोहळा जो २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येऊन अनेकदा केलेला आहे. दुपारी दोनपर्यंत राजकीय चर्चा होईल. त्यानंतर दुपारचे जेवण. दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने आपल्या शिरावर घेतली आहे.  भोजनानंतर ३.३० वाजता पत्रकार परिषद आणि नंतर अच्छा, टाटा, बाय-बाय…असा भरगच्च कार्यक्रम आहे.  म्हणजे मोदीविरोधी तासभर चर्चा करण्यासाठी हे लोक जमलेले आहेत आणि यजमान उद्धव ठाकरे इतके राबतायत.

या प्रकाराला ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ नाही तर काय म्हणणार? लोगोचे प्रकाशन, फोटो सेशन, जेवणावळी अशा भाकड कार्यक्रमात बैठकीचा ८० टक्के वेळ वाया जाणार. ही मंडळी मोदींचा पराभव कसा करणार? यांच्याकडे मोदी द्वेषापलिकडे काहीच नाही. ना रणनीती ना नियोजन. यांचा मुकाबला आहे, अमित शहा यांच्याशी ज्यांच्या रणनीतीमुळे भाजपाच्या यशाची कमान २०१४ पासून सतत उंचावते आहे. माणसाच्या कामाचा झपाटा किती आहे याचे एकच उदाहरण सांगतो.

 

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीआधी अमित शहा तिथे तळ ठोकून होते.   प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा दौरा करायचा, ज्याला कि व्होटर म्हणतात, अशा किमान १००-१५० लोकांना रोज भेटायचे. दोन मिनिटांपेक्षा जास्त कुणालाच वेळ नाही. या दोन मिनिटात त्यांच्या क्षेत्राचे बलस्थान किंवा कमजोरीची माहिती घ्यायची. महत्वाच्या मुद्द्यांची नोंद घ्यायची, त्यावर काम करायचे. भेटणाऱ्या प्रत्येकाचा तपशील रेकॉर्डवर घ्यायचा. उशीरा रात्रीपर्यंत गाठीभेटी. जेमतेम दोन-तीन तास झोप. अंगावर येणार नाही इतके माफक जेवण आणि सतत प्रवास, असा त्यांचा कार्यक्रम असायचा.  उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली ती काही उगाच नाही.

हे ही वाचा:

१९९१ च्या भुजबळांची आठवण झाली.. यावेळीही पुरून उरणार काय?

‘क्वाड’ बैठकीत चार देश चीनविरोधात एकमेकांना साथ देणार

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

मोदी-शहांना अंगावर घ्यायचे तर त्यांच्या इतके कष्ट करण्याची तयारी हवी. कामाचा झपाटा हवा, राजकारणाचे बारकावे समजून घेण्याइतपत समज हवी, जिंकण्याची प्रचंड जिद्द हवी. इथे तोंडाच्या वाफांपलिकडे आणि मोदी-शहांना शिव्या घालण्याच्या पलिकडे कोणाचीच उडी नाही. ६३ नेते मुंबईत येणार आणि पिकनिक करून जाणार. नव्या दमाने, नव्या जोशाने मोदींना शिव्या घालणार. मोदी असे हरत नसतात. मोदींना हरवण्यासाठी पोटशूळाच्या पलिकडे बऱ्याच गोष्टींची गरज आहे.

१ तारखेच्या बैठकीनंतर आणि पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात टिळक भवन येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राहुल गांधी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील अशी भाबडी आशा उद्धव ठाकरेही करत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या सन्मानापेक्षा भाजपाचे नाक कापणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version