27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयसामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?

सामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?

अधिक अचकट विचकट तर्क मांडून सामनाकडे लोकांनी पाहावं असा प्रयत्न सध्या सुरू आहे.

Google News Follow

Related

महाराष्ट्रात जादूटोण्याचे, करणीचे तांत्रिक प्रयोग होतायत, असा दावा सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलेला आहे. जनतेत अशी कुजबूज आहे, असे म्हणत या बाता खपवण्यात आल्या आहेत. ठाकरेंचे कर्तृत्व पूर्णपणे संपलेले असून सत्तेचे सोपान जादूटोणा, जारण-मारण आणि करणीनेच सर करता येते असा त्यांचा वहीम झालाय याची खातरजमा या अग्रलेखातून होते. तू अगदीच बिनडोक आहेस, रेम्या डोक्याचा आहेस, मूर्ख आहेस…. असे एखाद्याला दातओठ खाऊन म्हणायचे आणि नंतर, ‘असे मी नाही म्हणत, अशी ऑफीसमध्ये चर्चा आहे’, असे म्हणायचे. असे प्रसंग अनेक सिनेमात आपण पाहीले असतील, वैयक्तिक आय़ुष्यातही पाहीले असतील. सामनाच्या अग्रलेखातून तोच प्रयोग करण्यात आला आहे.

सामना अलिकडे फारसे कोणी वाचत नाही. अनेकांनी हे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे अधिक अचकट विचकट तर्क मांडून सामनाकडे लोकांनी पाहावं असा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे कधी काळी ज्वलंत हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे हे मुखपत्र अलिकडे अगदीच ओंगळवादी झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली तर शेकते आणि एकदा शेकले की शेकवायला पुन्हा त्यांच्याचकडे जावे लागते, असा अनुभव शिउबाठाच्या नेत्यांना आला असल्यामुळे अलिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्यात येत आहे.

संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसात फडणवीसांच्याविरोधात काही बोलल्याचे आठवते आहे का? अगदी क्वचित, ना के बराबर. पण एकनाथ शिंदे यांना मात्र नियमित टार्गेट करण्यात येतेय. कधी काळी आपल्या हाताखाली बाळगलेला हा सरदार आता सिंहासनावर बसलाय, हे बहुधा ठाकरेंना सहन होत नाहीये. हिवाळी अधिवेशन काळात रेशीमबाग या संघ मुख्यालयात भेट दिल्यानंतर तिथे काही लिंबू-टाचण्या सापडल्या का बघा, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. लिंबू-मिर्च्या त्यांच्या मनात इतकं खोलवर घर करू बसल्या आहेत. आरोप केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. हिऱ्या पोटी गारगोटी या शब्दात त्यांचे उट्टे काढले. त्यामुळे उद्धव ठाकरे अधिकच चिडले असावेत. लिंबू-मिर्चीचे आरोप त्यांनी अधिक ताकदीने करायला सुरूवात केली. राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांना होणाऱ्या अपघातांचा संबंध जादूटोण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. जणू जगातील सगळे अपघात आणि आजार करणीमुळेच होतात, असा निष्कर्ष एखादा हे अग्रलेख वाचून करू शकतो.

उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व झेपले नाही. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञानवादी हिंदुत्व तर अजिबातच झेपणार नाही. जादूटोण्यावर अग्रलेख लिहीणाऱ्यांनी यापुढे सावरकरांचे नाव घेऊन नये. तो राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानापेक्षा मोठा अपमान ठरेल. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पदराला लागलेली आग, अजित पवारांचा लिफ्टमध्ये झालेला अपघात, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात यांना झालेले अपघात, इतकंच काय उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रिया आणि आजार हा सुद्धा ही जादूटोण्याची करणी असल्याचे अग्रलेखांत म्हटले आहे. फक्त हे सगळे दावे लोकांमध्ये चर्चा आहे, या शब्दात मांडण्यात आले आहे.

आयुष्यात निराश आणि हतबल झालेले कमजोर लोक नेहमी मांत्रिक आणि ज्योतिषवाल्यांच्या मागे जातात. कठोर परीश्रम करून नशीब बदलण्याची उमेद संपली की करणी आणि जादूटोण्याचे मार्ग सुचतात. उद्धव ठाकरे यांचे नेमके तेच झालेले आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर सत्ता मिळाली. मुख्यमंत्री पदावर बसून काम करण्याऐवजी ते घरी बसून राहीले. सामनातून दिलेल्या बोलबच्चन मुलाखतीतून आणि पीआर साठी मोजलेल्या कोट्यवधी रुपयातून आपली प्रतिमा निर्माण होईल या गैरसमजात त्यांचा कडेलोट झाला. आजूबाजूला पोसलेले खुषमस्करे पत्रकार जे बोलताय तेच जनमत आहे, असे समजून त्यांनी स्वत:ची कबर खणली. आता जे स्वकर्तृत्वाने जे गमावले त्याचे खापर त्यांनी जादूटोण्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

हे इतकं सोपं असतं तर मोदींना सत्तेवरून हटवणे सोनियांना कधीच जमायला हवे होते. कारण राज्यभरात ख्रिस्ती पास्टर आणि फादर पवित्र पाणी शिंपडून कँसरसारखे रोग बरे करण्याचे जादूचे प्रयोग करतायत. त्यातलाच एखादा पास्टर पकडून मोदींवर अपवित्र पाणी शिंपडले असते तर विषयच संपला असता. ठाकरेंपेक्षा राहुल गांधी खूपच बरे, ते रस्त्यावर तरी उतरले. उद्धव ठाकरे सगळं गमावल्यानंतरही घराबाहेर पडायला तयार नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ते महाराष्ट्र पिंजून काढणार अशी घोषणा करून महिने लोटले. ते २०२२ च्या दिवाळीनंतर बाहेर पडणार होते, परंतु ते पडले नाहीत.

स्वत:च्या अकर्मण्यतेचे खापर दुसऱ्यावर फोडायला मर्यादा असतात. सामनामध्ये जो आजचा अग्रलेख पाडण्यात आलाय, ते पाहून सामनाचे संपादक ठाकरे आहेत कि रामसे असा प्रश्न पडावा. स्मशान, आत्मा, जादूटोणे, बळी या विषयावर रामसे बंधूंनी बरेच सिनेमे केले. हॉटेल, दरवाजा, दो गज जमीन के नीचे, वीराना, पुराना मंदीर, पुरानी हवेली, सामरी… असे अनेक सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा जमाना संपल्यानंतर या भयाच्या प्रांतात विक्रम भटने उडी घेतली. नारायण धारप हे लोकप्रिय लेखक अशा भयकथा लिहीत असत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. परंतु त्यांच्या लिखाणाचा एक दर्जा होता. हा अग्रलेख रामसे कँपपैकी कुणी लिहील्याचा संशय आल्याशिवाय राहात नाही.

हे ही वाचा:

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पदयात्रेत राहुल गांधींच्या गळ्यात एकाने घातले हात

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

नड्डा म्हणाले नऊ राज्यात जिंकायचेच

अडॉल्फ हिटलरने आयुष्याच्या शेवटच्या क्षणी लग्न केलं ते त्याच्या प्रेयसीच्या इच्छे खातर. बाकी जन्मभर तो अविवाहीत राहिला, त्याच सर्वात मोठं कारण म्हणजे थोरा मोठ्यांची मुलं त्यांचा लौकीक बुडवण्यासाठीच जन्माला येतात, हा विचार त्याच्या मनात अगदी घट्ट रोवला गेला होता. थोर जर्मन साहित्यिक जोहान गटे याचा मुलगा अगदीच मूर्ख निघाला, असे निरीक्षण त्याने नोंदवले आहे. हिटलर अनेक बाबतीत चुकला परंतु तो अनेक बाबतीत योग्य होता, असे म्हणावे लागेल.

एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदीरात जाऊन रेड्याचा बळी दिला, असा दावा अग्रलेखात केलेला आहे. हा आरोप खोटा असल्यास शपथ घेऊन सिद्ध करा असे आवाहनही दिलेले आहे. शिउबाठाला एवढी उठाठेव करण्याची गरज काय? बळी दिलेल्या रेड्यामुळे आपली सत्ता गेली यावर जर उद्धव ठाकरेंचा एवढाच विश्वास असेल तर त्यांनी अजमेरला जाऊन उंटाचा बळी द्यावा आणि सत्तेवर यावे. येता येता तिथे गोल जाळीदार टोपी घालून मजारीवर चादरही चढवावी. एकनाथ शिंदे यांच्याकडे जर तंत्र असेल तर त्याची तोड पण असणारच की? एखादा बंगाली बाबा पकडून ठाकरेंनीही समाधान करून घ्यावे.

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गरळ ओकून महाराष्ट्र वाचवण्यासाठी विठ्ठलाला साकडे घालण्याची सूचना फडणवीसांना करण्यात आलेली आहे. आम्हाला ही फडणवीसांना विनंती करायची आहे की सत्ता सरकल्यामुळे अनेकांची मती सरकल्यासारखी झालेली आहे. त्यांचे मेंदू ठिकाणावर यावेत म्हणून फडणवीसांनी खरोखर विठ्ठलाला साकडे घालावे आणि महाराष्ट्राला यांच्यापासून मुक्ती द्यावी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा