24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरसंपादकीयघुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप...

घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…

पाकिस्तान, नेपाळ, ब्रिटन, कॅनडा येथील बिळात लपलेल्या शत्रूंविरुद्ध अज्ञात शक्तींचे युद्ध

Google News Follow

Related

पाकिस्तानात गेल्या आठवड्यात भारताच्या दृष्टीने दोन महत्वाच्या घडामोडी झाल्या. दोन्हीचा केंद्रबिंदू २६/११ चा मास्टरमाईंड लष्कर ए तोयबाचा म्होरक्या, भारताचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी हाफीज सईद आहे. लष्कर ए तोयबाचा संस्थापक सदस्य आणि हाफीजचा विश्वासू असलेल्या मुफ्ती कैसर फारुकची हत्या आणि हाफीजचा मुलगा कमालुद्दीन सईद याचे अपहरण. दोन्ही घटना दिवसाढवळ्या झालेल्या. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून घडलेल्या अशा घटनांची जंत्री सांगता येईल. या घटनांमागे अज्ञातांचा हात आहे हा योगायोग नाही. घर मे घुस के मारेंगे… ही मोदी नीती आहे.

 

 

५ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. काही दिवस आधीच म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी पुलवामातील महाभयंकर हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करून दहशतवाद्यांनी ४० जवानांचा बळी घेतला होता. देशात संतापाची लाट निर्माण झाली होती. २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे हवाई हल्ला करून भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. व्याजासह हिशोब चुकता केला.

 

 

अहमदाबादेतील सभेला ही पार्श्वभूमी होती. मोदींनी नाव न घेता पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला. मोदी या सभेत गरजले. घर मे घुस कर मारेंगे. हा इशारा देताना मोदींच्या डोळ्यात अंगार होता. चेहऱ्यावर खुन्नस. भारतात हल्ले करून जगभरातील बिळात लपणारे दहशतवादी गेली काही वर्षे संतापाच्या या आगीत होरपळताना दिसतायत.

 

 

पाकीस्तान, ब्रिटन, नेपाळ, कॅनडा येथे भारतविरोधी शक्तिंना टिपले जाते आहे. सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘डंके की चोट पे’ तीन मोठी ऑपरेशन केली. डोग्रा रेजिमेंटच्या जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जून २०१५ मध्ये म्यानमारच्या सीमेत घुसून नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड (के) या दहशतवादी संघटनेचे शंभरावर सदस्यांना ठार केले.

 

 

उरीमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक केली. पुलवामानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या सगळ्या कारवाया भारतीय सुरक्षा दलांच्या नावावर जमा आहेत. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, नेपाळ, ब्रिटन, कॅनडा येथील बिळात लपलेल्या शत्रूंविरुद्ध काही अज्ञात शक्तींनी एक युद्ध छेडलेले दिसते. हे युद्ध पाकिस्तानने गेली अनेक दशके भारताविरुद्ध छेडलेल्या छद्म युद्धाला देण्यात येत असलेले चोख उत्तर आहे.

 

 

भारतविरोधी कारवाया पाकिस्तानच्या भूमीवरून होत असल्या तरी त्या दहशतवादी संघटनांकडून होतायत. या दहशतवादी संघटना आमच्या नियंत्रणात नाही, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून गेली अनेक वर्षे करण्यात येतोय. आंतरराष्ट्रीय दबाव फार वाढला तर एखाद्या दहशतवाद्याला गजाआड करायचे, तुरुंगात त्याला पंचतारांकीत सुविधा पुरवायच्या आणि त्याच्या कारवाया सुरू राहतील असे पाहायचे हे पाकिस्तानचे धोरण राहिलेले आहे. पाकिस्तानच्या या तथाकथित नॉन स्टेट एक्टर्सना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाते आहे.

 

 

रशियाने वॅगनर ग्रुप नावाची एक खासगी सेना उभी केली आहे. त्यांचा मुखवटा भाडोत्री सैनिकाचा असला तरी हे सैनिक जगभरात रशियाच्या सोयीच्या युद्ध मोहीमा राबवताना दिसतात. विशेष करून आफ्रीकेत वॅनगर ग्रुपने अनेक ठिकाणी अमेरिकेच्या रणनीतीच्या चिंधड्या उडवलेल्या दिसतात. भारतानेही असाच एखादा वॅगनर ग्रुप उभा केला आहे की काय, असा संशय येण्यासारख्या घटना गेल्या काही वर्षात घडताना दिसतायत. या काळात १७ बड्या दहशतवाद्यांना टिपले गेले.

 

 

 

मुफ्ती कैसर फारुखवर झालेल्या हल्ल्याचा व्हीडीयोही व्हायरल झालेला आहे. पाकिस्तानातील सामनाबाद येथे कैसरवर अज्ञात हल्लेखोरांनी जवळून अंदाधुंद गोळीबार केला. कैसर या हल्ल्यात ठार झाला आणि त्याच्यासोबत असलेला एक मुलगा जबर जखमी झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हल्लेखोर पायी आले होते. बेछूट गोळ्या झाडून ते पळून गेले. हल्ला अगदीच लो बजेट होता. हल्लेखोर निष्णात नेमबाज असण्याची गरज नव्हती इतक्या जवळून गोळ्या घालण्यात आल्या. त्यांना वेगाने पळता येते की नाही हे मात्र त्यांना सुपारी देणाऱ्याने तपासून घेतले असावे. हल्ल्यानंतर अब्बासी शाहीद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या कैसरला मृत घोषित करण्यात आले.

 

 

 

कैसरच्या हत्ये आधी हाफीजचा मुलगा कमालुद्दीन याला अज्ञातांनी पेशावरमधून २६ सप्टेंबर रोजी गायब केले. हाफीजच्या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आयएसआयवर आहे. कमालुद्दीनची हत्या करण्यात आली असून जब्बा येथे त्याचे छिन्नविछीन्न शव सापडल्याची कुजबुज आहे, परंतु या घटनेची पुष्टी होऊ शकलेली नाही.

 

हे ही वाचा:

कर्नाटकात औरंगजेबाचे वाढते उदात्तीकरण, पण काँग्रेस,उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प!

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

 

भारताला कोणत्याही परिस्थितीत हाफीजचा काटा काढायचा आहे. २०२१ मध्ये लाहोरमधील जौहर टाऊन येथे हाफीजच्या इमारतीवर आत्मघाती हल्ला झाला होता. हाफीज या हल्ल्यात बचावला. पाकिस्तानचा मंत्री राणा सनाउल्ला याने या हल्ल्यामागे भारताच्या रिसर्च एण्ड एनालिसिस विंगचा हात असल्याचा आरोप केला होता.

 

 

परकीय भूमीवर भारतविरोधी शक्तींना नेस्तनाबूत करणारे युद्ध छेडणाऱ्या या अज्ञातांना भारत सरकार किंवा भारतीय गुप्तचर संस्था रॉचा पाठींबा आहे का, हे उघड झाले नाही. अशा गोष्टी उघड होत नाहीत. २०२२ पासून अशा १७ विकेट पडल्या आहेत. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा छडा लावण्यात आयएसआय़ला पूर्णपणे अपयश आलेले आहे. खालिस्तान चळवळीत सक्रीय दहशतवादी, कश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटना, भारतात झालेला २६/११ चा हल्ला, काठमांडू येथून करण्यात आलेले एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण अशा भारतविरोधी कटांमध्ये सामील असलेल्या लोकांना टिपण्यात येत आहे.

 

 

 

कॅनडात हरदीप सिंह निज्जर, सुखदुल सिंह उर्फ सुखा यांची हत्या झाली. काठमांडू विमान अपहरण प्रकरणातील आरोपी जहूर इब्राहिम मिस्त्रीला कराचीत ठोकण्यात आले. कनिष्क विमान दुर्घटनेतील आरोपी रिपुदमन सिंह, आयएसआय़चा नेपाळमधील हस्तक मोहम्मद लाल, लाहोरमध्ये कार्यरत असलेला खलिस्तानी हरविंदर सिंह संधू, हिजबुल मुजाहिदीनचा बशीर अहमद पीर, अल बद्रचा सय्यद खालीद रझा, आयएसचा इजाज अहमद अहंगर, खैबर पख्तुनख्वामध्ये ठार केलेला सय्यद शोलाबर, लाहोरचा परमजीत पंजवार, ब्रिटनमध्ये उडवण्यात आलेला अवतार सिंह खांडा, जमात उद दावाचा सरदार हुसेन एरैन, रियाज अहमद उर्फ अबू कासीम, लष्कर रावलकोट, झिया उर रहमान – लष्कर कराची.

 

 

 

२०१४ पूर्वी रॉने अशा प्रकारची ऑपरेशन केली नाहीत असे नाही. सिक्कीमच्या विलिनीकरणापासून, बॉम्बस्फोट प्रकरणातील मेमन कुटुंबियांना भारतात आणण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन दिल्ली दरबार पर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील. परंतु गेल्या काही वर्षात शत्रूला ठोकण्यात जे सातत्य दिसते आहे, त्याला बदललेले आधिक आक्रमक झालेले राजकीय धोरण जबाबदार आहे. पाकिस्तानच्या उरावर बसलेले तहरीक ए तालिबान पाकिस्तान, जिये सिंध मुत्ताहीदा महाज, बलोच लिबरेशन फोर्स, अफगाणिस्तानातील तालिबान अशा तमाम शक्तींचा पाकिस्तानच्या विरोधात वापर करण्याची नीती भारत वापरतो आहे. शत्रूराष्ट्रात काम करणाऱ्या डीप एसेटची संख्या वाढवणे, त्यांना पुरेशी साधन सामग्री उपलब्ध करून देणे, बिकट परिस्थितीत राजकीय दबावाचा वापर करून त्यांना जपणे हे सगळे भारत सरकार करते आहे, असे मानायला वाव आहे. घुस कर मारेंगे ही मोदी नीती शत्रूच्या मनात भय निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा