23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयपहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

पहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

Google News Follow

Related

पहाटेच्या शपथविधीबाबत महाराष्ट्रात अनेक दंतकथा आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे गूढ काहीसे उलगडलेले आहे. आजवर याबाबत झालेल्या गौप्यस्फोटांचे ठिपके जोडले तर मुद्यांवरून जी गोष्ट निर्माण होते, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा आहे.

या घटनाक्रमाची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्मपासून होते. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या एकतर्फी पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली. जे मिळेल ते स्वीकारून शिवसेनेला सरकारमध्ये सामील व्हावे लागले. तेव्हा मिळालेल्या दुय्यम भूमिकेमुळे उद्धव ठाकरे खदखदत होते. सरकारमध्ये राहून सरकारला झोडत राहायचे अशी रणनीती या काळात शिवसेनेने राबवली. बरेचदा भाजपा तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागला.

२०१४ मध्ये सरकारमध्ये सामील असतानाच शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करू, असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसला दिला होता. शिवसेनेच्या बाजूने मिलिंद नार्वेकर काँग्रेसशी बोलणी करीत होते. परंतु काँग्रेसच्या थंड्या प्रतिसादामुळे हा डाव फसला असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. डाव फसत होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी चंग बांधला होता. २०१९ च्या निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपासमोर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठेवला. भाजपाने त्याला स्पष्ट नकार दिल्यानंतर पालघरच्या जागेवर तडजोड झाली, असे काल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे मनातल्या मनात मुख्यमंत्री पदाचे मांडे खात होते ही बाब एव्हाना अनेकांच्या विधानावरून स्पष्ट झालेली आहे. विक्रमाने जिद्द सोडली नाही. तो वेताळाला खांद्यावर मारण्यासाठी पुन्हा स्मशानाकडे निघाला, या कथानकाच्या तोडीची उद्धव ठाकरे यांची जिद्द होती.

भाजपा आपल्याला मुख्यमंत्री पद देणार नाही हे स्पष्ट झाल्यावर शिवसेनेने पुढची खेळी खेळली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट शिजला. भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना जरी याचा सुगावा नसला तरी काँग्रेसचे नेते निवडणुकीपूर्वी खासगीत हे कुजबजत होते. माजी मंत्री नसीम खान यांनी काही हिंदी पत्रकारांसमोर ही बाब उघड केली होती. जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बेरजेचा आकडा शंभरच्या पलिकडे गेला तर शिवसेना आमच्या सोबत येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. परंतु तेव्हा पत्रकारांचा यावर विश्वास बसला नव्हता.
२०१९ चे निकाल लागल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आमचाच मुख्यमंत्री होणार हे संजय राऊत वारंवार सांगत होते. याचा अर्थही भाजपा नेत्यांना उशीरा उमजला. पुढे राऊतांनीच आमचे आधीच ठरले होते, असे सांगून यावर शिक्कामोर्तब केले.

२०१९ च्या निवडणुकांचे निकाल लागले, तेव्हा भाजपा आणि शिवसेना यांच्या सरकार स्थापन करण्याचा घोळ सुरू होता. सरकारचे गाडे पुढेच सरकेना. याच दरम्यान, शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने भेट झाली. भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बनवण्याचे ठरले. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसह सगळा तपशील ठरला. इथून भाजपाची फसवणूक सुरू झाली. शरद पवार डबलगेम खेळत होते. एका बाजूला भाजपाशी बोलणे सुरू असताना त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसशी बोलणे करून दुसरा गेम फीट करून घेतला. मुरब्बी देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत अनुभव नसलेले उद्धव ठाकरे त्यांना कधीही सोयीचे होते.

शिवसेना आणि काँग्रेसशी डील पक्की झाल्यानंतरही त्यांनी अजित पवारांना भाजपाकडे का पाठवले, याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनी आधीच देऊन ठेवले आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटवणे शक्य झाले, असे जयंत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील बोलले आहेत. फडणवीसांनीही यावर थोडा प्रकाश टाकलेला आहे. या दोन्ही नेत्यांच्या विधानांवरून फक्त एवढीच बाब समोर येते की ज्यांचे आधीच ठरले होते, त्यांनी चक्क भाजपाला झुलवले आहे. बोलणी केली, बेसावध ठेवले आणि डाव साधला. आता राजकारणात कोणी कोणाला कात्रजचा घाट दाखवला तर त्यात वाईट वाटून घ्यायचे नसते. संधी मिळते तेव्हा व्याजानिशी उट्टे काढायचे असतात. फडणवीसांनी नेमके तेच केले त्यामुळे त्यांचे अभिनंदन.

हे ही वाचा:

काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी

बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?

बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?

फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला संजय राऊत यांनी फेकाफेक म्हटले आहे. त्यावर भाष्य ही केलेले आहे. राऊतांच्या प्रतिक्रियेवरून फडणवीसांचा बाण लक्ष्यावर लागलाय हे लक्षात येते.

अर्थात संजय राऊत हे रोज काही तरी बोलत असतात. त्यामुळे अलिकडे त्यांना गंभीरपणे कोणीच घेत नाही. शरद पवारांनी मात्र सुसंस्कृत फडणवीस असत्य बोलत असल्याचे सांगून पलटवार केला आहे. शरद पवार एखाद्या विषयावर इतक्या तातडीने प्रतिक्रिया देत असल्याचे बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले आहे. पवारांच्या प्रतिक्रियेमुळे या विषयातील गुंता वाढला आहे. आणि जोवर याविषयावर अजित पवार काही बोलत नाही, तोपर्यंत याप्रकरणावरील पडदा उठणे कठीण आहे. पहाटेच्या शपथविधीचा उत्तरार्ध अजित पवार यांनी उघड करावा, ते जर बोलले नाहीत तर मी बोलेन असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा विषय कधी ना कधी लोकांच्या समोर येणार हे नक्की.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा