मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

या गुंडाला राजकीय आश्रय कोणी दिला? त्याला मोठा करणारे कोण? हे भांडुपच्या जनतेने अगदी जवळून पाहिले आहे.

मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

काही दिवसापूर्वी संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांना धमकी आली होती. धमकी प्रकरणात मविआचे चाणक्य संजय राऊत तोंडावर पडणार असे चित्र दिसते आहे. पोलिसांनी सुरूवातीपासून या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. या प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या आरोपीचे अंडरवर्ल्डशी गहिरे संबंध आहेत. धमकी प्रकरण राऊत बंधूंना अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार सुनील राऊत यांनी एक ऑडीयो मीडियासोबत शेअर केली होती. ‘सकाळचा भोंगा बंद कर, अन्यथा गोळ्या घालू’ अशी धमकी देणारा फोन सुनील राऊत यांच्या मोबाईलवर आला होता. त्याच कॉलचे हे रेकॉर्डींग होते. धमकी फक्त दोन भावांना आलेली नव्हती. एक आमदार आणि खासदाराला आली होती. प्रकरण गंभीर दिसत होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तपासाची प्रगती मुंबई पोलिसांच्या लौकीकाला शोभणारी होती. ज्याच्या नावावर सिमकार्ड आहे, त्या रिझवान अन्सारी आणि त्याचा साथीदार शाहीद अन्सारी यांना गोवंडीतून अटक करण्यात आली.

पोलिसांच्या हाती याप्रकरणातील पहिला दुवा लागला. पुढे हा तपास प्रत्यक्ष धमकी देणाऱ्या मुन्ना या आरोपीपर्यंत पोहोचला. मयूर शिंदे याच्या सांगण्यावरूनच आपण धमकीचा फोन केला होता, अशी माहिती मुन्नाने चौकशी दरम्यान उघड केली. आज त्या मयूर शिंदेला पोलिसांनी अटक केली. हा मयूर शिंदे कोणी साधासुधा इसम नाही. याची पार्श्वभूमी अत्यंत खतरनाक आहे. खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे याच्या नावावर आहेत. एकेकाळी भांडूपमध्ये अंडरवर्ल्डची पाळंमुळे घट्ट रोवली होती. कुमार पिल्ले, के.टी.थापा, अशोक जोशी अशी अनेक बदनाम नावं भांडुपशी जोडली गेली होती. शिंदे गेली २० वर्ष त्याचा अविभाज्य भाग आहे. या गुंडाला राजकीय आश्रय कोणी दिला? त्याला मोठा करणारे कोण? हे भांडुपच्या जनतेने अगदी जवळून पाहिले आहे.

शिंदे हा मुळचा भांडूपच्या कोकण नगरचा. सुरुवातीला तो कुमार पिल्ले या गँगस्टरसाठी काम करत होता. पुढे त्याने स्वत:ची टोळी स्थापन केली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अशोक खरात हा याचा एकेकाळचा बॉस. २००० मध्ये गुलाम अली या गुंडाच्या हत्येप्रकरणी शिंदेला पहिल्यांदा अटक झाली. २०११ मध्ये भांडूपमधील एका मराठी बिल्डरच्या कार्यालयावर या शिंदेने त्याच्या साथीदारासह गोळीबार केला होता. त्यावेळी त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस एक्टीव्हीटीज (एमपीडीए) अंतर्गत अटक झाली होती. २०१६ मध्ये त्याने एका पोलिसाला मारहाण केली होती.

हा मूळचा शिवसैनिक. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिंदेला सत्तेचे संरक्षण मिळाले. त्याच्यावर लावलेला मकोका काढण्यात आला. २०१८ मध्ये सुनील राऊत यांनी आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवात शिंदेची उपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. शिंदेला नगरसेवक व्हायचे होते. प्रसिद्धीसाठी तो प्रचंड खर्च करायचा. फक्त भांडुप आणि ठाण्यात नाही तर गावी सुद्धा. चैत्र पौर्णिमेला त्याच्या गावी चिपळूणमधील दसपटी येथे रामवरदायीनीचा मोठा उत्सव होतो. या उत्सवात शिंदेचे दरवर्षी मोठ्या संख्येने बॅनर, पोस्टर लागतात. काही काळापूर्वी तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाला. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे शिंदेला आशीर्वाद मिळाले. तो ठाण्यातून नगरसेवक पदासाठी लढण्याच्या तयारीत होता.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना झालेली मारहाण आणि राऊत धमकी प्रकरणात अनेक समान दुवे आहेत. मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेला अशोक खरात हा गुंड सुद्धा भांडुपचा होता. शिवसैनिक होता. त्याचेही राऊत बंधूंशी घनिष्ट संबंध होते. आता राऊतांना मिळालेल्या धमकी प्रकरणात अटक करण्यात आलेला मयूर शिंदे हाही शिवसैनिक होता. नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता झाला. त्याला अटकही ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालायतून झाली. दहशत माजवण्यासाठी, वसूलीसाठी राजकीय नेत्यांना गुंडाची मदत लागतेच. बिल्डरांकडून पैसा हवा असेल तर हेच गुंड मदत करतात. त्यातूनच मयूर शिंदे यांच्यासारख्या लोकांना संरक्षण मिळते. खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे असून राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात हे लोक सेलिब्रेटीसारखे मिरवतात.

शिंदेला अटक झाल्यानंतर या प्रकरणात बरेच गौप्यस्फोट होऊ शकतात. एकूणच याप्रकरणावर नजर टाकल्यानंतर शिंदे कोणाचा माणूस आहे, याचा अंदाज बांधणे फार कठीण नाही.या प्रकरणात आता सुनील राऊत यांची चौकशी होण्याची गरज आहे. ज्याचा वाढदिवस साजरा करताना प्रेमाने केक भरवला, तो तुमच्या धमकी कटाचा सूत्रधार कसा होऊ शकतो? या मुद्दावर सुनील राऊत प्रकाश टाकू शकतात.

हे ही वाचा:

अंतराळातून ‘बिपरजॉय’ असं दिसतं!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

आशिया कप क्रिकेट स्पर्धा होणार पाकिस्तान, श्रीलंकेत

वेस्ट इंडिजच्या त्या दौऱ्यात जेव्हा संपूर्ण भारतीय संघ जखमी झाला होता…

मकोका लागलेल्या या गुंडाशी त्यांचे इतके स्नेहाचे संबंध का होते, याबाबतही ते माहिती देऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांना धमकीचा फोन आला होता. धमकी देणारा हा पुण्याचा दारुडा इसम होता, हे तपासानंतर उघड झाले. दुसरी धमकी सुनील राऊत यांना आली. त्यात जो तपशील उघड होतो आहे, तो राऊतांची अडचण वाढवणारा आहे. मयूर शिंदेच्या अटकेनंतर संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर जळजळीत टीका केलेली आहे. तामझाम आणि पोलिस संरक्षणासाठी किती खोटं बोलायचं? किती नौटंकी करायची? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

हा प्लॉट राऊतांनी संरक्षण मिळवण्यासाठी रचला, असा देशपांडे यांच्या म्हणण्याचा स्पष्ट अर्थ. हे खरे असेल तर विषय गंभीर आहे. एका बाजूला मला संरक्षणाची गरज नाही, अशा फुशारक्या मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला असे कच्चे प्लॉट रचायचे, याला काय म्हणावं. एकूणच राऊतांच्या कल्पना शक्तीला ग्रहण लागले आहे, असेच म्हणावे लागले. मविआचे चाणक्य म्हणून मीडियाने ज्यांना डोक्यावर घेतले ते अगदीच सुमार निघाले असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version