25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरसंपादकीयवडाची साल पिंपळाला, कुरुलकराची संघाला....

वडाची साल पिंपळाला, कुरुलकराची संघाला….

कुरुलकर हे डीआरडीओसारख्या मान्यताप्राप्त संघटनेत कामाला होते. त्यांना संघाच्या व्यासपीठावर आमंत्रित करणे गैर कसे काय ठरू शकते.

Google News Follow

Related

डीआरडीओ या मान्यताप्राप्त संस्थेचा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला पुणे एटीएसने ५ मे रोजी अटक केली. त्याला हनी ट्रॅप करण्यात आले होते. तो पाकिस्तानला माहिती पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर आहेत. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून कुरुलकरला याबाबत कठोर शिक्षा व्हायला हवी. परंतु काही लोक त्याच्या आडून रा.स्व.संघावर तीर चालवतायत. तो संघाच्या संपर्कात होता, अशा प्रकारची चर्चा घडवली जातेय. संघावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न होतो आहे.

 

काँग्रेसचे लाभार्थी असलेल्या पत्रकारांची एक मोठी जमात देशात कार्यरत आहे. कोणी पत्रकार काँग्रेसच्या विचारांचे समर्थन करणारी भूमिका मांडत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. कोणतीही व्यक्ति एखाद्या विचारधारेने प्रेरीत असू शकते. परंतु काही दशके काँग्रेसच्या पालख्या वाहण्याचे काम करणारे हे तितके प्रामाणिकही नाहीत. बदनाम काँग्रेसचे उघड समर्थन करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे तटस्थपणाची झूल पांघरून छुपेपणे काँग्रेसचा अजेंडा रेटण्याचे काम ही मंडळी करीत असतात.

 

भाजपा सत्तेवर आल्यापासून यांची दुकाने बंद झाली आहेत, वाट्या मिळेनाशा झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपा आणि भाजपाचे बलस्थान असलेल्या संघाबद्दल यांच्या मनात पराकोटीचा द्वेष आहे. कुरुलकर प्रकरणामुळे तो उफाळून आलेला आहे. कुरुलकर हे संघाच्या संपर्कात होते, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात येत आहेत. काही मीडियाने तशा बातम्याही प्रसारित केल्या आहेत.

 

संघ देशात १९२५ पासून कार्यरत आहे. संघाची विचारसरणी जाज्ज्वल्य देशभक्तीची आहे. या देशात फक्त अजमेरला जाऊन दर्ग्यात चादर चढवणारे विविध पक्षांचे नेते अलिकडे मंदिरात जाऊन आरत्या ओवाळतात त्याचे कारण संघाची गेल्या ९८ वर्षांची तपश्चर्या आहे. संघाचा हा प्रभाव अनेकांच्या पोटदुखीचे कारण बनलेला आहे. कुरुलकरांच्या निमित्ताने संघाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न अनेकजण करतायत. काँग्रेसच्या कारवाया जर देशविरोधी असतील तर संघ सुद्धा वेगळा नाही, हे सांगण्यासाठी हा आटापिटा आहे.

 

कुरुलकरला अटक केली पुणे एटीएसने. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार आहे. संघाचा स्वयंसेवक असलेला, दरवर्षी पूर्ण गणवेशात संघाच्या दसरा संचलनात उपस्थित राहाणारा नेता महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे. त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. केंद्रात सुद्धा भाजपाचे सरकार आहे. कुरुलकर संघाच्या संपर्कात होता, हे क्षणभर गृहितही धरले तरी कोणीही ही कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला नाही. संघाने ही कारवाई झाली म्हणून आगपाखड केली नाही. कारवाईत कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही संघावर चिखलफेक सुरू आहे.

हे ही वाचा:

मॉलमध्ये खरेदी करताना भारतीय वंशाच्या महिलेला लागली गोळी आणि…

पश्चिम बंगालच्या केरळ स्टोरीवरील बंदीविरोधात निर्माते गेले सर्वोच्च न्यायालयात

लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

थॅलियम, आर्सेनिक देऊन पती, सासूला मारणाऱ्या महिलेला जामीन नाही

 

कुरुलकर हे डीआरडीओसारख्या मान्यताप्राप्त संघटनेत कामाला होते. ते डान्सबारमध्ये किंवा मटक्याच्या अड्ड्यावर काम करत नव्हते. त्यांना संघाच्या व्यासपीठावर आमंत्रित करणे गैर कसे काय ठरू शकते. ते संघाशी संबंधित होते हे मान्य केले तरी त्यामुळे संघावर शेणगोळे कसे काय फेकता येतील? काँग्रेसच्या जन्मापासून केलेल्या कारवाया मोजल्या तर देशविरोधी कारवायांची जंत्री सांगता येईल. परंतु अगदी सोनियांच्या काळातील इतिहास चाळला तर काँग्रेस हा देशद्रोही कारवायांनी नखशिखांत माखलेला पक्ष आहे. वानगीदाखल फक्त एक किस्सा पुरेसा आहे.

 

२००८ मध्ये देशावर पाकिस्तान पुरस्कृत हल्ला झाला होता. हल्ल्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने तीन महिन्यांत केंद्रातील यूपीए सरकारला अहवाल दिला. या अहवालात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, केंद्रीय यंत्रणामध्ये असलेल्या एका अस्तनीतील निखाऱ्याने २६/११ च्या हल्ल्यातील आरोपींची मदत केली. हा हस्तक मुंबईतील होता. हे फक्त राम प्रधान यांनी सांगितलेले नाही. ॲड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या दोन ब्रिटीश पत्रकारांनी लिहीलेल्या ‘द सीज’ या पुस्तकात भारतीय सुरक्षा यंत्रणामध्ये असलेल्या एका घरभेद्याने या हल्ल्यात पाकिस्तानची मदत केली होती, असे म्हटले आहे. डेव्हीड हेडली या डबल एजण्टला जेव्हा अमेरिकेने ताब्यात घेतले तेव्हा त्यानेही याला दुजोरा दिला. पाकिस्तानचा हा हस्तक सहज सापडू शकेल इतका तपशील राम प्रधान यांनी दिलेला होता. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना या संदर्भात त्यांनी १५-२० ओळींचे टिपण दिले होते.

 

पाच वर्षांनंतर एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रधान यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्या भारतीय सुरक्षा यंत्रणांमध्ये बसलेल्या त्या पाकिस्तानी हस्तकावर कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत केंद्रीय यंत्रणांकडे, केंद्रीय गृहमंत्र्याकडे पाठपुरावा करून कारवाई झाली नाही. केंद्रीय यंत्रणांची भूमिका अडेलतट्टू होती. केंद्राने या संपूर्ण प्रकरणात आयबी आणि रॉ या गुप्तचर यंत्रणांना बाहेर ठेवले. प्रधान यांनी जे काही सांगितले आहे, त्याचा अर्थ स्पष्ट आहे. त्या पाकिस्तानी हस्तकाला काँग्रेसने वाचवले. केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी त्याला सुरक्षा कवच दिले. १६६ जणांचा बळी घेणाऱ्या ३०० पेक्षा जास्त जणांना जखमी करणाऱ्या या भीषण हल्ल्यातील एका आरोपीला काँग्रेसच्या काळात का वाचवण्यात आले असेल? याची कल्पना करा.

 

प्रकरण इथे फक्त थांबत नाही. कसाब जर जिवंत सापडला नसता तर हा हल्ला संघाच्या नावावर खपवण्यासाठी काँग्रेसने पूर्ण वातावरण निर्मिती केली होती. पुस्तकं लिहून तयार होती. हिंदू दहशतवादाचा ढोल पिटून आधीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती. या हल्ल्याच्या निमित्ताने संघाला दहशतवादी आणि देशद्रोही ठरवण्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यासाठी काँग्रेसला क्लीनचीट देण्याचीही काँग्रेसची तयारी होती.

 

काँग्रेसच्या देशद्रोही इतिहासातील हे फक्त एक पान आहे. अशा अनेक घटना आहे. २००८ मध्ये काँग्रेसने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी केलेला करार. त्यानंतर राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणग्या. लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी दौलतबेग ओल्डी ही हवाईपट्टी न वापरण्याची चीनला दिलेली हमी. या काळात भारतीय जमिनीची झालेली वाटमारी. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना हटवण्यासाठी पाकिस्तानकडे केलेली मदतीची याचना. काँग्रेसच्या देशद्रोही कारवायांवर ग्रंथ लिहीता येईल.

 

जे लोक आज डॉ.कुरुलकरच्या मुद्यावरून संघाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ते काँग्रेसची पांप इमाने इतबारे झाकणारे पत्रकार विचारवंत आहेत. हमाम मे सब नंगे आहेत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. काँग्रेस जर देशविघातक कारवायांमध्ये लिप्त आहे तर संघही काही धुतल्या तांदळासारखा नाही हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात गेल्या ९८ वर्षांत संघाला बदनाम करण्याच्या अनेक मोहीमा झाल्या. जनतेने त्या नाकारल्या. यावेळीही ही मंडळी तोंडावर पडतील यात शंका नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा