सुनक आणि सोनिया…

सुनक हेच ब्रिटनचे पंतप्रधान होणार हे निश्चित झाल्यावर समाजवादी, लिबरल्सना आता त्यांची तुलना सोनिया गांधी यांच्याशी करण्याचा मोह होतो आहे.

सुनक आणि सोनिया…

ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर ऋषी सुनक विराजमान होणार आहेत. ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्यापासून भारतातील समाजवाद्यांच्या पोटात गोळा आला आहे. ब्रिटनच्या कॉन्झर्नेटीव पार्टीच्या लीज ट्रस यांनी त्यांना प्रारंभिक शर्यतीत मात दिली. तेव्हा गाईचे पूजन करणारे सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले नाहीत म्हणून अनेकांना आनंदाचे भरते आले होते. आता लीज ट्रस यांच्या राजीमान्यानंतर सुनक हेच ब्रिटनचे पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे. तोंडावर पडलेल्या समाजवादी, लिबरल्सना आता त्यांची तुलना सोनिया गांधी यांच्याशी करण्याचा मोह अनावर होतो आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया यांना विदेशी मुद्यावरून हिणवणाऱ्यांना आता सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार म्हणून हर्षोन्माद चढलाय, अशी कुत्सित टिप्पणी या मंडळींकडून समाज माध्यमांवर करण्यात येते आहे. अल्पसंख्यांक समाजातून अमेरिकेत कमला हॅरीस आणि आता ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांची निवड सर्वोच्च पदावर करण्यात आली. भारतात बहुसंख्यकांचे राजकारण करणाऱ्यांनी यातून धडा घ्यायला हवा, असे ट्वीट काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केले आहे.

काँग्रेसचे संपूर्ण राजकारणही थापा आणि दिशाभूल या दोन अस्त्रांवर चाललेले आहे. सुनक यांच्यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतात मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजातील अनेक महत्वाच्या व्यक्तिंनी सर्वोच्च पदे भूषविली आहेत. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कमाल, उपराष्ट्रपती डॉ.झाकीर हुसेन, मोहम्मद हिदायतुल्ला, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, देशाचे पहीले शिक्षणमंत्री अब्दुल कलाम आझाद, केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर, दिवंगत मुख्यमंत्री ए.आर.अंतुले, आंध्रचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी, दिवंगत मुख्यमंत्री अजित जोगी अशी अनेक नावे घेता येतील. सध्या महत्वाच्या पदावर असलेले असे अनेक नेते आहेत ज्यांची नावे तर हिंदू आहेत, परंतु धर्म ख्रिस्ती आहेत.

त्यामुळे चिदंबरम यांनी भारतीयांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. सहिष्णूता भारतीयांच्या रक्तात आहे. आता राहिला मुद्दा सोनिया गांधींचा. १९६८ मध्ये सोनियांचा राजीव गांधी यांच्याशी विवाह झाला. सुनक यांनी कधी काळी वेटर म्हणून काम केले आहे, या पलिकडे त्यांच्या आणि सोनियांमध्ये काहीच साम्य नाही.

भारतात आल्यानंतर अनेक वर्षे सोनिया यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले नव्हते. समाजकारणात आणि राजकारणात त्यांचे काडीचे योगदान नव्हते. सोनिया या उच्च विद्याविभूषित नाहीत. त्यांच्याकडे धड संवाद कौशल्यही नाही. आजही त्यांचे इंग्रजी आणि हिंदीवर प्रभूत्व नाही. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होण्यापूर्वी त्यांचे देशाच्या प्रगतीत वाटचालीत नेमके काय योगदान होते हे कोणालाही ठाऊक नाही. त्यामुळे सुनक यांच्याशी त्यांची तुलना अनाठायी ठरते. सुनक हे गेली अनेक वर्षे कॉन्झर्वेटीव पार्टीचे नेते आहेत. पक्षात अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष ते पक्षात उमेदवारी करतायत. पक्षाचे काम करताना कधी त्यांना आपला आपल्या कुटुंबियांचा धर्म लपवण्याची गरज वाटली नाही. गाईला चारा देणे, मंदिरात जाऊन दर्शन घेणे, इस्कॉनमध्ये भगवी वस्त्र नेसलेल्या संन्याश्यांसमोर नतमस्तक होणे यात त्यांना कधी लाज वाटली नाही.

आज ब्रिटन कधी नव्हे इतक्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पंतप्रधान पदी नियुक्ती झाल्यानंतरही ही परिस्थिती आपण आटोक्यात आणता येणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे लीज ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा दिला, त्यावरून तिथली परीस्थिती काय असेल याची आपण कल्पना करू शकतो. हे अस्तित्वावर आलेले संकट आहे, त्यामुळे आपल्याकडे दोनच मार्ग आहेत, संघटित होऊन मुकाबला करा किंवा मरा, अशी हाक सुनक यांनी दिली आहे. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा ब्रिटनला होईल, या आशेने त्यांची पंतप्रधान पदावर वर्णी लागली आहे. ब्रिटीश जनता त्यांच्याकडे तारणहार म्हणून पाहाते आहे. ते पंतप्रधानपदावर येणार याची चाहूल लागताच ब्रिटनचे सरकारी बॉण्ड तेजीत आले. सुनक हे इन्फोसिसच्या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई म्हणून त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान बनवण्यात आलेले नाही. सोनिया आणि सुनक यांच्यात नेमका हाच फरक आहे.

हे ही वाचा:

मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

युनिलिव्हर कंपनीच्या ड्राय शॅम्पूपासून कॅन्सरचा धोका

पहाटे झालेल्या हल्ल्यात बिबट्याने घेतला चिमुरडीचा बळी

गडचिरोतील दुर्गम भागात मुख्यमंत्री शिंदे पोलिसांसोबत साजरी करणार दिवाळी

 

सुनक यांच्या क्षमतांशी तुलना केली तर सोनिया गांधी कुठे उभ्या राहतात? कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी सून म्हणून सोनिया राजकारणात आल्या. सहानुभूती हेच त्यांचे भांडवल राहीले. आजही त्या नवरा आणि सासू यांच्या बलिदानाच्या कहाण्या सांगून मत मागत असतात. भाजपामुळे देशात फूट पडेल, देशाचे तुकडे होतील, अल्पसंख्यकांचे जीवित धोक्यात येईल असा बागुलबुवा दाखवून मत मागताना दिसतात. २००४ ते २०२४ ही दहा वर्षे या देशात डॉ.मनमोहन सिंह हे नामधारी पंतप्रधान होते. नॅशनल एडवायजरी काऊंसिलच्या नावाखाली देशाची सूत्र सोनियांच्या हातीच होती. या काळात देशात फक्त भ्रष्टाचारचे किस्से चर्चिले जात होते. सोनिया, त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रा भ्रष्टाचारात आकंठ बुडाले होते. त्यामुळे आज सोनिया गांधी कोणत्याही जाहीर सभेत यूपीएच्या काळातील विकास किंवा उपलब्धींवर बोलत नाहीत. त्या भाजपाविरोधाचेच पाल्हाळ लावत असतात.

सुनक हे मूळ भारतीय वंशाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या काळात भारताशी ब्रिटनचे संबंध मधुर राहतील की नाही, याची ठाम शाश्वती कोणी देऊ शकणार नाही. ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले असल्यामुळे त्या देशाचे भले करणाऱ्या उपाययोजना त्यांनी कराव्यात असे अपेक्षित आहे. परंतु ब्रिटनचा पंतप्रधान कोणीही झाला तरी त्याला भारताशी संबंध उत्तम ठेवावे लागतील, इतकी भारताची परिस्थिती भक्कम आहे. स्वहिताचे रक्षण भारत स्वत:च्या क्षमतांच्या आधारावर करू शकतो, त्यासाठी तो कोण्या व्यक्तिवर अबलंबून नाही. भारताचे कोणत्याही देशाशी संबंध कोणाच्या व्यक्तिगत मेहरबानीवर आणि कृपादृष्टीवर आधारलेले नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version