एक मुरलेला नेता दुसरा उरलेला…

काही प्रमाणात असलेला जनाधार, प्रशासनावर पकड, राजकारणाची समज या घटकांमुळे नीतिश दीर्घ काळ राजकारण करू शकले.

एक मुरलेला नेता दुसरा उरलेला…

बिहारमध्ये भाजपाने खेला केला. ‘इंडी आघाडी’ला लोकसभेपूर्वी मोठा दणका दिला. जिथे या आघाडीची पहिली बैठक झाली तिथेच भाजपाने पाचर मारली. आता इंडी आघाडीतून किती नीतिश बाहेर पडतात? अशी चर्चा सुरू आहे. काही वाहिन्यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचा नंबर आहे, असे छातीवर हात ठेवून सांगतायत. राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरुपी मित्र किंवा शत्रू नसतो, हे तत्व मान्य केले तरी ते अकाली दलाला लागू होऊ शकते, ठाकरेंबाबत हे त्रिवार अशक्य आहे.

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतिश नवव्यांदा शपथ घेत आहेत. आता परिस्थिती अशी आहे की राज्यपालांनी त्यांना शपथ वाचून दाखवण्याचीही गरज नाही. नऊ वेळा शपथ घेऊन ही शपथ त्यांना तोंडपाठ झाली असेल. मुख्यमंत्रीपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी मारलेल्या पलट्यांची खरे तर गिनेज बुकात नोंद व्हावी.

नीतिश यांच्या संधीसाधूपणावर त्यांचे जुने समाजवादी साथी प्रचंड तोंडसुख घेतायत. भाजपा समर्थकांनाही नीतिश यांची साथ खटकते आहे. राजद आणि भाजपाला नीतिश यांच्या बाबतीत कितीही आकस असला तरी नीतीश यांना पर्याय नाही, हे दोघांनाही चांगलेच ठाऊक आहे. नीतिश यांच्याशिवाय या दोघांचे गाडे अडते आहे. राजकारणात कोणी कोणावर उपकार करत नाहीत. जोपर्यंत तुमचा जनाधार आहे, तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे.

जे नीतिश यांना शक्य झाले ते उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत शक्य का होत नाही? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. ठाकरे आणि नीतिश कुमार ही राजकारणाची दोन टोकं आहेत. एक राजकारणात उरलेला आहे तर दुसरा मुरलेला. एक अनुभव हीन तर एक मुरब्बी. एक संघर्ष करून नेता बनलेला तर दुसरा पित्याच्या पुण्याईवर. हा फरक इथेच संपत नाही.

कधी राजद तर कधी भाजपासोबत संसार थाटताना नीतीश यांनी त्या त्या वेळी असलेल्या विरोधकांबाबत बोलताना कायम संयम पाळला. टीका फक्त धोरणांबाबत, विचारधारेबाबत मर्यादित ठेवली. कधीही व्यक्तिगत किंवा पातळी सोडून टीका केली नाही. त्यामुळे एका आघाडीतून दुसऱ्या आघाडीत सतत उड्या मारताना त्यांना फार अडचण आली नाही.

नीतिश यांनी बिहारमध्ये कायम सोयीचे राजकारण केले, मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी किंवा पंतप्रधान पदाकडे डोळा ठेवून सतत कोलांट्या मारल्या हे सत्य आहे. परंतु नीतिश यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. नीतिश विरोधात गेल्यानंतरही भाजपाने त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. नीतिश यांनी सत्तेचा वापर करून कधी तळघरं भरण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा मातोश्री उभारल्या नाहीत. ईडीमुळे देशातील अनेक विरोधकांनी हाय खाल्ली आहे. भले भले गर्भगळीत झाले आहेत. परंतु केंद्र सरकारला कधीही नीतिश यांच्याविरोधात ईडीचा प्रयोग करावासा वाटला नाही किंवा करता आला नाही. कारण नीतिश यांचे हात साफ आहेत.

दुसऱ्या बाजूला नीतिश यांनीही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराने आरोप केले नाहीत. राजकारणात विरोधी नेत्यांबाबतही आदर बाळगता येतो हे कधी उद्धव ठाकरे यांना कळले नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भाषा वापरायला गेले. परंतु ही भाषा वापरूनही विरोधकांशी मैत्री जपण्याची ना उद्धव यांच्याकडे हातोटी होती, ना तेवढे विशाल मन. राहुल गांधी यांच्या नादाला लागून उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएम केअर फंडाच्या निमित्ताने शरसंधान करण्याचा प्रय़त्न केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
एकवेळ भाजपा नेते कोथळा, खंजीर, वाघनखं, मावळे, कावळे, मर्द सगळं विसरले असते. परंतु विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलेली वैयक्तिक टीका विसरणे शक्य नाही.

मोदींवर वैयक्तिक टीका करणाऱ्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाची साथ केली हेही नाकारता येत नाही. परंतु ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत होणे शक्य नाही. कारण जेव्हा जवळचे वार करतात त्याचे तेव्हा घाव खोलवर असतो. शिवसेना भाजपाची युती २५ वर्ष जुनी होती.कारण उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार, नगरसेवक गमावले, जनाधार गमावला आहे, पक्ष गमावला, चिन्ह गमावले, विचारधारा गमावली. आपण हिंदुत्व सोडलेले नाही, असे त्यांना सतत स्पष्टीकरण द्यावे लागते आहे.

त्यामुळे उपयुक्तता या निकषावर उद्धव ठाकरे आता टिकण्याची शक्यता कमी. नीतिश यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात विशेष करून भाजपासोबत असताना त्यांनी बिहारमधले जंगलराज मोडून काढले. राज्यात सुशासन आणले. काही काळ तरी त्यांचे सुशासन बाबू म्हणून कौतुक झाले. कुर्मी असल्यामुळे नीतिश यांना समाजाचे समर्थन आहे.

काही प्रमाणात असलेला जनाधार, प्रशासनावर पकड, राजकारणाची समज या घटकांमुळे नीतिश दीर्घ काळ राजकारण करू शकले. उपयुक्तता टिकवू शकले. वयाच्या ७३ वर्षांपर्यंत राजकारणावर मांड ठोकून बसण्याची क्षमता त्यांनी गमावलेली नाही. म्हणून ते रालोआत परतू शकले. पुन्हा ते पलटी मारणारच नाहीत याची खात्री नसताना भाजपाने त्यांना जवळ घेतले. इंडी आघाडीला बत्ती लावली.

हे ही वाचा:

सीबीआयकडून अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटेविरुद्ध गुन्हा दाखल

रणजित सावरकरांच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येवर प्रश्नचिन्ह

‘मम्मी, पापा, मी जेईई पास होऊ शकत नाही, राजस्थान येथील १८ वर्षीय मुलीची आत्महत्या!

लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!

नीतिश भाजपाच्या गोटात त्यांच्या उपयुक्ततेमुळेच आहेत, असे ठामपणे म्हणता येईल. उद्धव ठाकरेंची उपयुक्ता उरली आहे का असा प्रश्न त्यांच्याच पक्षातील नेत्यांना पडलेला म्हणूनच शिवसेना फुटली. आता उबाठा गटातील नेत्यांची मानसिकता यापेक्षा वेगळी नसणार. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लवकरच मविआत दाखल होणार अशी चर्चा आहे. उबाठा गटाशी त्यांनी आधी युती केली. परंतु आंबेडकरांनाही ठाकरे मजबूत होण्यापेक्षा एकनाथ शिंदे मजबूत व्हावेत, त्यांचा पक्ष वाढावा असे वाटते. हा उद्धव ठाकरे यांचा पराभव आहे.

उद्या उद्धव ठाकरेंना उपरती झाली आणि त्यांना रालोआत प्रवेश घ्यावासा वाटला तरी ते शक्य होणार नाही, कारण त्यांच्या झारीत संजय राऊत नावाचे शुक्राचार्य बसलेले आहेत. भाजपा आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला एकतर्फी पाठींबा जाहीर केला होता, ही बाब ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितली होती. हा दुरावा निर्माण करण्यासाठी त्यांनी संजय राऊतांना सुपारी दिली होती, ही बाब काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपाकडे जाणाऱ्या ठाकरेंच्या सगळ्या वाटा राऊतांनी धूर्तपणे बंद करून टाकल्या. दोन्ही पक्षांमध्ये इतका कडवटपणा निर्माण केला की ठाकरे कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चरणी कायम लीन राहतील. त्यामुळे उद्धव यांना पलटी मारण्याची संधी मिळण्याची शक्यता नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version