गौतम अदाणी २०१४ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. ते २०२२ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कसे आले हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप आहे. अब्जाधीशांच्या यादीत नंबर वन असलेले इलॉन मस्क २०१४ साली पहिल्या शंभरातही नव्हते हे राहुल गांधी यांना ठाऊक नसावे. २०१९ मध्ये राहुल गांधी राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करून सत्तेवर येण्याच्या प्रय़त्नात होते. २०२४ मध्ये अदाणी प्रकरणात त्यांना अशीच आशा वाटू लागली आहे.
हातात ठोस पुरावे नसताना, पुरेशी माहिती नसताना केलेले आरोप काही काळापुरती खळबळ निर्माण करतात, परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊन नाक रगडावे लागते. राहुल गांधी यांनी यापूर्वी राफेल खरेदी प्रकरणात चौकीदार चौर है अशी हाळी दिली. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील. सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला राफेल खरेदी प्रकरणी क्लीनचिट दिलेली असताना राहुल गांधी करीत असलेला चौकीदार चोर है हा प्रचार म्हणजे न्यायालयाची बेअदबी असल्याचा दावा लेखी यांनी आपल्या याचिकेत केला होता. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेतली आणि राहुल गांधी यांना याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी लागली.
गेल्या आठ वर्षात म्हणजे २०१४ ते २०२२ या काळात गौतम अदाणी अब्जाधीशांच्या यादीत ६०९ वरून दुसऱ्या क्रमांकावर कसे आले असा राहुल गांधी यांचा सवाल आहे. २०१४ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत बिल गेट्स पहिले होते २०२३ मध्ये ते पाचव्या स्थानावर आहेत. इलॉन मस्क १५८ व्या स्थानावर होते ते आता पहिल्या स्थानावर आले आहे. जर १५० क्रमांकाच्याही बाहेर असलेले इल़ॉन मस्क पहील्या स्थानावर येत असताना अमेरीकेत त्यांचे कौतूक होते आहे, मग अदाणींबाबत राहुल गांधी यांच्या मनात इतका द्वेष का भरलाय? अफजल गुरू आणि ओसामा बिन लादेन यांचा आदरार्थी उल्लेख करणारे काँग्रेसचे नेते अदाणींसारख्या उद्योजकाचा अपमान का करतायत? हा प्रश्न देशवासियांच्या मनात निश्चितपणे आहे. गौतम अदाणी यांनी त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ६० हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली होती. याची दखल तरी त्यांचा विरोध करणारे घेणार आहेत का?
राहुल गांधी काल संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. जन्माला आल्यानंतर बराच काळ बोलू न शकलेले, हे मुल भविष्यात कधी बोलू शकेल का, अशी शंका असलेले मूल जेव्हा कसं बसं बोबडे बोल बोलू लागते तेव्हा त्याच्या आई-बाबांना जो आनंद होतो, तसाच आनंद काँग्रेसजनांना राहुल गांधी यांच्या भाषणामुळे होत असावा. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलले, तरी बाकं बडवायला आणि मोदी सरकार विरोधीत शेम शेमच्या घोषणा द्यायला काँग्रेसचे खासदार तयार असतात. हे खासदार ज्या मुद्यावर शेम शेमच्या घोषणा देत होते ते ऐकून यांच्या मेंदूचा फ्यूज उडालाय का अशी शंका यावी.
मोदी परदेशात जातात, त्यांच्या सोबत अदाणी जातात. त्यांच्यामुळे अदाणींना ऑस्ट्रेलियात कोळशाच्या खाणी, बांग्लादेशात वीज निर्मिती, श्रीलंकेत पवन ऊर्जेची कंत्राट मिळाली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या खासदारांनी शेम शेम करून याचा निषेध केला. देशातील एका उद्योजकाला परदेशातील कामाचे कंत्राट मिळाले यात शेम शेम करण्यासारखे काय आहे? कोणत्याही देशाचा सर्वोच्च नेता जेव्हा दुसऱ्या देशात जातो, तेव्हा त्याच्यासोबत राजकीय मुत्सद्यांसह उद्योजकांची टीम असते. दुसऱ्या देशातील मोठी कंत्राटे त्या उद्योजकांना मिळावी यासाठी दोन्ही देशांचे नेते अधिकृतपणे वाटाघाटी करतात. अदाणी हे आक्रमकपणे इतर देशात जाऊ कामं मिळवतायत याचे काँग्रेसच्या खासदारांना दु:ख का वाटावे? ही कामे फक्त चीनी कंपन्यांनी करावी आणि त्यांची भरभराट व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे का? अदाणी हे उद्योगपती आहेत. त्यांची बांधिलकी फक्त भाजपासोबत असती, तर त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात राजीव गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत काम केले नसते. आजही ते ममता बॅनर्जी, अशोक गेहलोत, चंद्रशेखर राव या मुख्यमंत्र्यांसोबत काम करतायत. जिथे शक्य असेल तिथे उद्योग वाढवणे हा त्यांचा अजेंण्डा असेल तर त्यात गैर ते काय?
अदाणी यांना विमानतळ विकास आणि संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रात अनुभव नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना संधी दिली, असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. काँग्रेसच्या काळात देशात संरक्षण सामुग्रीच्या निर्मितीमध्ये सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. शस्त्र आय़ात करण्याचे धोरण होते. यातून मोठ्या प्रमाणात लाच मिळत असल्यामुळे ते काँग्रेसच्या सोयीचेही होते. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आयात कमी करून देशाचे चलन वाचवायचे आणि देशाला शस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करायचे या निर्धाराने काम सुरू केले. त्यामुळे काँग्रेसला मोठी पोटदुखी झालेली आहे. राहुल गांधी यांच्या आरोपामुळे यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. टाटा, हिंदुजा, कल्याणी आणि रियालन्ससह देशातील अनेक बडे उद्योजक मोदी सरकारच्या नव्या धोरणांमुळे शस्त्रनिर्मितीत अग्रेसर झालेले दिसतात. देश अनेक शस्त्रांची पहिल्यांदाच निर्यात करतो आहे. नव्या क्षेत्रात जेव्हा एखादी कंपनी पाय ठेवते, तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना गलेलठ्ठ पगार देऊन कंपनीत घेतले जाते. त्यांच्या अनुभवाच्या आधारावर काम सुरू होते. इंटरनेट-टेलि कम्युनिकेशनच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणाऱ्या मुकेश अंबानी यांनी जिओसारखी मोठी कंपनी उभी केली. त्यांना कुठे होता या कंपनीचा अनुभव?
त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप खोडसाळ आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला पात्रता दाखविली!
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?
अदानीचं जबरदस्त पुनरागमन, शेअर्समध्ये बंपर तेजी..जाणून घ्या कोणते शेअर्स किती वाढले
ताज्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या काही घोषणा सुद्धा राहुल गांधी यांनी अदाणी यांच्याशी जोडल्या आहे. अदाणी यांनी ग्रीन हायड्रोजन इंधनाला चालना देण्यासाठी ५० अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा २०२२ मध्ये केली होती. निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रीन हायड्रोजन उद्योगासाठी सरकार १९ हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान देणार असल्याचे जाहीर केले. आता ही घोषणा सरकारने अदाणींसाठी केली असल्याचा राहुल यांचा दावा म्हणजे हा माणूस डोक्यावर पडला असल्याचे लक्षण आहे.
ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठी आधी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ही गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदान देते. ते या क्षेत्रात उतरणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे. राहुल गांधी यांनी उद्या असा एखादा प्रकल्प केला तर त्यांनाही हे अनुदान मिळू शकते. हे माहीत असताना जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो आहे.
देशात बनणारे कोस्टल शिंपिंग झोन, ग्रेन स्टोरेज, ५० नवे विमानतळ या अर्थसंकल्पातील घोषणा सरकारने अदाणी यांच्यासाठीच केल्या आहेत, हा राहुल यांचा दावा आहे. पूर्वी देशात फक्त टाटा आणि रिलायन्स हे मोठे उद्योग समुह होते. यांच्याकडे अब्जावधींची गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. परंतु देश ज्या वेगाने प्रगती करतो आहे, तो वेग कायम ठेवायचा असेल तर अशा आणखी काही कंपन्यांची गरज आहे. त्यामुळे सरकार जर अदाणी यांच्यासारख्या आणखी चार कंपन्यांना हात देत असेल तर राहुल गांधी यांच्या पोटा दुखण्याचे कारण काय? देश प्रगती करतो आहे, देशातील उद्योगपती बाहेर जाऊन कामें मिळवतायत याचा ज्यांना त्रास होतो त्यांना चीनचे एजण्ट का म्हणू नये?