चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

काँग्रेस, त्यांचे बलगबच्चे, डावे पक्ष आणि विकले गेलेले पत्रकार यांचे साटेलोटे

चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

भारतात काही वर्तमानपत्र, चॅनल, वेबसाईट कायम केंद्र सरकारच्या विरोधात असतात? सरकारची एखादी चांगली बाजू त्यांना का दिसत नाही? वेळप्रसंगी ही माध्यमं केंद्र सरकारच्या विरोधात चीनची तळी उचलण्यासाठी का तत्पर असतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न्यूज क्लीक या वेबसाईटबाबत जो भांडाफोड झालाय त्यातून मिळालेली आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानंतर काँग्रेस, त्यांचे बलगबच्चे, डावे पक्ष आणि विकले गेलेले पत्रकार यांचे साटेलोटे उघड होते आहे.

 

 

२०२१ मध्ये न्यूज क्लीक या वेबपोर्टल विरुद्ध ईडीने कारवाई केली होती. त्यावेळी राणा अयूब छाप अनेक पत्रकारांनी भारतातील पत्रकारिता आणि लोकशाही एकदम धोक्यात आल्याची ओरड सुरू केली होती. तपासानंतर ही वेबसाईट भारतविरोधी प्रचारात सामील आहे. चिनी पैशावर ही वेबसाईट पोसली जाते आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा कच्चाचिठ्ठा जनतेसमोर मांडला.

 

 

जानेवारी २०१८ मध्ये पीपीके न्यूज क्लीक स्टुडीयो प्रा.लि. ही कंपनी सुरू झाली. पुढे अवघ्या तीन महिन्यात म्हणजे एप्रिल २०१८ मध्ये कंपनीला वर्ल्डवाईड मीडिया होल्डींग या अमेरिकी कंपनीकडून ९ कोटी रुपये आले. ही रक्कम परकीय गुंतवणुकीच्या स्वरुपात आली. न्यूज क्लीकचा १० रुपयांचा शेअर अमेरिकी कंपनीने ११५१० रुपयांना विकत घेतला. अवघ्या तीन महिन्यात एका नवख्या कंपनीच्या शेअरला एक हजार पट किंमत का यावी? जे भाग्य अदाणी आणि अंबानी यांच्या शेअरच्या वाट्याला आजवर आलेले नाही ते भाग्य ज्या वेबसाईटबाबत देशात फारशी चर्चा नाही, त्याच्या मालक कंपनीच्या वाट्याला कसे आले? न्यूज क्लीकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या धनदांडग्याचे नाव होते. नेविल रॉय सिंघम. अमेरिकेत स्थायिक झालेला हा इसम मूळचा श्रीलंकेचा आहे. थॉट वर्क या आयटी कंपनीचा संस्थापक. चीन कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचार युद्धातला एक प्रमुख मोहरा. २०१८ ते २०२१ या काळात या इसमाने न्यूज क्लीकला त्याच्या अन्य काही संस्थांमार्फत एकूण ३८ कोटी रुपये पुरवले.

 

 

याची पत्नी ज्युडी एवान ही अमेरिकी आहे. ती कोड पिंक या संस्थेची संस्थापक आहे. तीही या कारवायांमध्ये सामील आहे. नेविलचा मुक्काम शांघायमध्ये असतो. तो चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचार शाखेसाठी काम करतो. त्यांच्यासाठी प्रचार साहित्य बनवतो. जगभरात चिनी धोरणांना पोषक बातम्या पेरणे, चीन विरोधकांच्या विरोधात प्रचाराची मोहीम हा रॉय सिंघम राबवत असतो. अनेक देशांमध्ये चिनी प्रचाराला बळ मिळेल, अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यासाठी न्यूज क्लीकसारख्या वेबसाईटला अर्थ पुरवठाही करतो. तो काही शिक्षण, न्याय, मानवी हक्कांना वाहिलेल्या समाजसेवी संस्थाही चालवतो. अर्थात या संस्थाही चिनी पैशांवर पोसलेल्या असण्याची शक्यता आहे. चीनच्या माध्यमातून अन्य देशातील त्यांच्या हस्तकांना पैसा पुरवण्याची सोय या संस्थांच्या माध्यमातून होत असावी असा संशय आहे.

 

 

न्यूज क्लीकवर झालेल्या कारवाईतून काही धक्कादायक माहिती समोर आली. त्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे. या न्यूज क्लीकला पुरवण्यात आलेल्या रकमेतील काही भाग अर्बन नक्षलवादी गौतम नवलखा यालाही पुरवण्यात आली होती. गौतम नवलखा हा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत सहभागी झाला होता. या एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात दंगली झाल्या होत्या. नवलखाला एनआयएने अटक केल्यानंतर त्याचे आणि न्यूज क्लीकचा मुख्य संपादन प्रबीर पुरकायस्थचे संबंध आहेत, असे तपासादरम्यान उघड झाले होते.

 

 

भाजपाचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत याप्रकरणी केलेला एक गौप्यस्फोट खूप महत्वाचा आहे. भाकपाचे माजी सरचिटणीस प्रकाश कारात आणि न्यूज क्लीकचा संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यात गेल्या काही काळात एक हजार ई-मेलचे आदान प्रदान झालेले आहे. न्यूज क्लीकचा भांडाभोड झाल्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. अभिसार शर्मा हा पत्रकार आणि न्यूज क्लीक हे माध्यम कायम मोदींविरोधी प्रचार का करीत होते? चीनला पोषक बातम्या का पेरत होते? या मीडिया कंपनीवर कारवाई झाल्यामुळे काँग्रेसने इतका थयथयाट का केला?

हे ही वाचा:

सेप्टिक टॅंकमधील मृतदेहाचे गूढ उकलले; एकाला अटक

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२ रेल्वे स्थानके चमकणार

बलुचिस्तानमध्ये सुरुंगस्फोट; युनियन कौन्सिलच्या अध्यक्षासह सात जणांचा मृत्यू

भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

 

या कंपनीला जो चिनी पैसा मिळाला आहे, त्याचे डावे कनेक्शन नेमके काय हे, निशिकांत दुबे यांनी प्रकाश कारात यांचे नाव घेऊन स्पष्ट केले आहे. न्यूज क्लीकला पैसे मिळावेत म्हणून प्रकाश कारात यांनी मध्यस्थी केली असण्याची दाट शक्यता आहेत. या दोघांचे हजार मेल आपल्याकडे उपलब्ध आहेत. आवश्यकता वाटल्यास मी ते सदनासमोर ठेवू शकतो असे दुबे म्हणाले आहेत.

 

 

अर्बन नक्षली, डावे पक्ष, पत्रकार, चीन यांचे साटेलोटे या प्रकरणामुळे लोकांच्या समोर आलेले आहे. सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेले काँग्रेसचे नेते चीनच्या ओंजळीने पाणी पितात हे डोकलाम संघर्षाच्या वेळी उघड झाले. भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना राहुल गांधी यांनी चिनी राजदूताची भेट घेतली होती. भारताच्या भूमीवर डोळा ठेवून असलेल्या चीनवर प्रहार करण्याचे सोडून राहूल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार का करीत आहेत, याचे त्यावेळी लोकांना प्रचंड आश्चर्य होते. २००८ मध्ये काँग्रेसने चीनी कम्युनिस्ट पार्टीशी केलेल्या सहकार्य करार झाला होता. त्यातूनच हे घडत असल्याचा अनेकांना संशय होता. न्यूज क्लीकचा पर्दाफाश झाल्यामुळे आता भविष्यात त्या कड्याही हळूहळू जुळू लागतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचे समर्थन करणाऱ्या माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवण्याचे काम कायम काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केले. प्रत्यक्षात ते हिणवणारेच चीनच्या मांडीवर बसलेत आणि त्यांचा खुराक खाऊन देशाविरोधात गरळ ओकतायत हे आता स्पष्ट होते आहे. भारतात चिनी पे-रोल वर असलेले असे किती अभिसार शर्मा आणि प्रबीर पुरकायस्थ आहेत, याची छाननी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात असे न्यूज क्लीक किती याचा तपास झाला पाहिजे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version