शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर ‘निष्ठावंत शिवसैनिक हेलावलाय’, असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. शिवसेनेचे अनेक नेते पक्षासोबत असल्याच्या आणाभाका घेतायत, ‘त्या’ आमदारांना लाखोली वाहतायत, गद्दारांना इशारे देतायत, त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढतायत, अंत्ययात्रा काढतायत असे चित्र वारंवार पाहायला मिळते आहे. परंतु यातले अनेक, पुढच्या दोन दिवसांत ज्यांना शिव्या घातल्या त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे चित्रही वारंवार दिसते आहे.

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे त्यातले ताजे उदाहरण. शिवसेनेत हे फुटीचे नाट्य सुरू असताना बांगर हे खिंड लढवणाऱ्या बाजी प्रभूच्या भूमिकेत असल्याचा आव आणत होते. काही दिवस त्यांनी जी भावनिक डायलॉगबाजी केली, ती उद्धवजींना मागे काढणारी आहे. हिंगोलीत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चात बांगर ढसाढसा रडले. नटसम्राट मधल्या आप्पा बेलवलकर यांना मोडीत काढतील अशी डायलॉगबाजी त्यांनी केली. ‘माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा आपल्या खांद्यावर दिलाय त्याला आबाद ठेवण्याचे काम आपण सगळ्या जणांनी केलं पाहिजे…’ परंतु मनोमन मात्र भगव्याला आबाद ठेवणे उद्धजींना झेपणार नाही, आदित्याजींना जमणार नाही याची त्यांना खात्री असावी. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना दटावणीच्या स्वरात ‘सुरतला जाणारे आमदार आहोत का आम्ही?’ असा सवाल विचारणारेही तेच होते.

‘महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे आमदार आल्यावर त्यांचे स्वागत सडके टमाटर आणि अंड्यांनी करा. त्यांच्या तोंडाला काळं फासा,’ राणा भीमदेवी थाटात अशी फटकेबाजी करताना त्यांनी काय सुनवायचे बाकी ठेवले? “ज्यांनी पक्षाला सोडलं, त्यांच्या बायका त्यांना सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. बेईमानांची पोरं मुंजे राहतील. बेईमानाच्या पोराला कोणी पोरी देणार नाही,” अशा शब्दांच्या फैरी झाडणारे बांगर अखेर शिंदेना सामील झाले. शिंदे यांच्यासोबत गेले त्याचा विरोध नाही, पण जाण्यापूर्वी बांगर यांनी स्वत:च्या थोबाडाला काळं फासण्याची गरज नव्हती. बाजी प्रभूंचा आव आणण्याची गरज नव्हती.

सत्तेचा आस पुरता शिंदे यांच्या बाजूला कलल्यानंतर बांगर यांचा मुखवटा फाटला. ते नरवीर बाजी नसून निव्वळ पाजी आहेत हे उघड झालं. पण बांगर एकटे नाहीत आणि अखेरचेही नाहीत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार शिवसेनाप्रमुखांच्या नावाने भावनिक आवाहन करतायत, परंतु या आवाहनाला दाद मिळत नसल्याचे दिसते आहे. उद्धवजी जशी भावनिक डायलॉगबाजी करत होते, त्याला तशीच डायलॉगबाजी करून बांगर यांच्यासारखे नेते प्रतिसाद देत होते. दोन्ही बाजूला फक्त शब्दांचे बुडबुडे होते. त्यामुळेच जेव्हा जेव्हा उद्धवजी आवाहन करतात तेव्हा काही जण उठून शिंदेना सामील होतात असे चित्र दिसते आहे. उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन काम करताना दिसत नाही. त्याचा नेमका उलटा प्रभाव पडतोय.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार मोठ्या संख्येने गुवाहाटीला जाऊन बसलेत, असे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे कॅंपमधून बरेच प्रयत्न करण्यात आले. आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आल्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. यातले २०-२२ आमदार संपर्कात असून त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलतायत, असे संजय राऊत वारंवार सांगत होते. परंतु प्रत्यक्षात हे आमदार आलेच नाहीत, जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढत राहीली.

२१ जून रोजी विधान परीषदेचे निकाल जाहीर झाले. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह २९ आमदार नॉट रिचेबल झाले. उद्धव ठाकरे यांना हा पहीला धक्का होता. तेव्हा त्यांनी अडीच वर्षे दाखवलेला ताठा दूर ठेवून भावनिक वातावरण निर्मीतीचा पवित्रा घेतला. २२ जूनला त्यांनी वर्षा निवासस्थान सोडले. त्याच दिवशी फेसबुक लाईव्हवर त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. ‘मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही’, असे वारंवार सांगितले. २३ जूनला शिवसेना आमदार सदा सरवणकर हे रातोरात एकनाथ शिंदे यांना सामील झाले. २१ जूनला प्रभादेवीत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निदर्शने करणारे सरवणकर यांनी मारलेल्या पलटीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते. परंतु शिवसेना आमदारांना जसा जसा नौका बुडण्याच्या अंदाज येत होता, तसे एकनाथ शिंदे यांचे संख्या बळ वाढत होते. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. पुन्हा जनतेला भावनिक साद घातली. पुन्हा आमदार फुटले. आमदार फुटण्याचा सिलसिला सुरूच आहे. दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, उदय सामंत अशी रांग लागली.

संतोष बांगर यांनी मात्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवड आटपेपर्यंत वाट पाहीली. हिशोब सोपा आणि सरळ होता, राजकीय रणधुमाळीत उद्धव ठाकरे विजयी झाले असते तर बांगर यांना निष्ठेचे आणि कडवटपणाचे बक्षीस मिळाले असते. ढसाढसा रडण्याचे, पक्षनिष्ठा व्यक्त करण्याचे. शिंदे गटाच्या आमदारांना बायका सोडून जातील, मुलांची लग्न होणार नाही, असे शिव्याशाप दिल्याचे फायदे उपटता आले असते. शिवसेनेच्या हिशोबाप्रमाणे १६ आमदार अपात्र ठरून शिंदे गटाला दणका बसला असता तर बांगर यांची पत-प्रतिष्ठा किती वाढली असती याची कल्पना करा. पण झालं भलतंच, उद्धव ठाकरे यांनाच एका पाठोपाठ एक दणके बसतायत, असे चित्र स्पष्ट झाले.

मंत्री पद तर दूर की बात, शिंदे यांच्यासोबत गेल्याशिवाय आमदार की वाचवता येणार नाही याची उपरती झाल्यानंतर बांगर यांना जाग आली. नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेले गटनेते अजय चौधरी आणि चौधरी यांनी नियुक्त केलेले व्हीप सुनील प्रभू यांची नियुक्ती बेकायदा ठरवली. त्यानंतर पुढे काय वाढून ठेवले आहे हे बांगर यांच्या लक्षात आले. एका रात्रीत त्यांनी पलटी मारली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मांडलेल्या विश्वास दर्शक ठरावाला बांगर यांनी पाठींबा दिला. या ठरावाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांच्या विरोधात भरत गोगावले यांनी व्हीप बजावलाय. शिवसेनेकडे उरलेल्या १५ पैकी १४ आमदारांना हा व्हीप बजावण्यात आला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचा नातू म्हणून कारवाईतून सुट देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांचे वाढलेले राजकीय वजन आणि उंची कमी करण्यासाठी शिवसेनेकडून गेले काही महीने पद्धतशीर प्रयत्न करण्यात येत होते. बराच काळ ही धूसफूस सुरू होती. विधान परिषद निवडणुकीच्या आधी ट्रायडण्ट हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी खडाजंगी झाली, त्यातून ठिणगी पडली आणि भडका उडाला.

एकनाथ शिंदे यांनी पुरते उट्टे काढून हिशोब चुकता केला. एकीकडे ही पडझड होत असल्यामुळे शिवबंधनाचा धागा कधी शिवसैनिकांच्या मनगटातून गळून पडल्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाली आहे. त्यातून शिवसेना पदाधिकारी आणि नेत्यांकडून निष्ठेचे शपथपत्र भरून घेण्याच्या उचापती सुरू झाल्या. परंतु या कागदाच्या तुकड्याला किंमत नसल्याचे बांगर यांनी शिंदे यांच्या गटात उडी मारून स्पष्ट केले आहे. आणखी तीन-चार आमदार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. गुलाबराव पाटील यांनीही त्याचा पुनरुच्चार केला. विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाल्यानंतर शिवसेनेचे आणखी किती आमदार फुटणार हा सवाल आता टांगत्या तलवारीसारखा शिवसेनेच्या नेतृत्वाला छळतोय.

फेसबुक लाइव्ह करून वेळ मारुन नेता येते, पक्ष चालवता येत नाही. ‘सामना’च्या अग्रलेखातून मर्दपणाचा आव आणता येतो, तो सिद्ध करण्यासाठी मैदान मारावे लागते, त्यासाठी घराबाहेर पडून मैदानात उतरावे लागले. काळ कठीण आलाय, असा अग्रलेख ‘सामना’मध्ये काल प्रसिद्ध झाला. अशा कठीण काळात उद्धव ठाकरे या संकटातून पक्षाला तारू शकतात यावर आता शिवसैनिकांचा विश्वास उरला नाही. ‘सामना’तून छापून आलेल्या मॅरेथॉन मुलाखती, त्यात मारलेल्या अतिशयोक्तीपूर्ण आणि हास्यास्पद थापा उपयोगी पडतील अशी शक्यता नाही. सकाळी संजय राऊतांनी मीडियाला दिलेले बाईट ही गळती रोखण्यापेक्षा वाढवण्याचे काम करणार आहेत.

हे ही वाचा:

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

नुपूर शर्मांवर संतप्त झालेल्या न्यायाधीशांविरोधात माजी न्यायाधीश, आयएएस अधिकारी

मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी; रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती

अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर विक्रम-बेताल नावाची मालिका होती. अत्यंत लोकप्रिय अशा या मालिकेत, बेतालच्या तोंडी एक डायलॉग होता. ‘विक्रम तू बोला, और मै चला…’ संजय राऊत सध्या शिवसेनेत बेतालच्या भूमिकेत आहेत, ‘संजय बोला और आमदार शिंदे कॅंप में चला…’ असे चित्र सध्या शिवसेनेत दिसते आहे.

जी हुजूरी करणारे आदेश बांदेकर, प्रियंका चतुर्वेदी, राहुल कनान यांच्यासारखे नेते फक्त चमकोगिरी पलिकडे काही करण्याच्या स्थितीत नाही. सत्तेच्या गुळामुळे निर्माण झालेली युवा सेना सत्ता गेल्यानंतर दिसेनाशी झालेली आहे, सरकारी भाचे वरुण सरदेसाई यांचे बरेच दिवस दर्शन नाही. ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या १६ अपात्र आमदारांबाबत सुनावणी आहे. त्याची हवा आधीच काढली गेल्यामुळे तिथून काही साध्य होण्याची शक्यता कमीच. अर्थात शिवसेनेकडे जे १५ आमदार उरले आहेत, त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे मान्य करून घालीन लोटांगण… केल्याशिवाय त्यांची आमदारकी टिकणे अशक्य. बांगर यांनी हे उशिरा का होईना ओळखले आणि ते शिंदेना सामील झाले. शिवसेनेच्या कुंपणावर किती बांगर शिल्लक आहेत हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version