सिंह आक्रमक झालाय का?

सिंह आक्रमक झालाय का?

नव्या संसद भवनावर सारनाथ येथील अशोक स्तंभाची प्रतिकृती असलेल्या आणि भारताने राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलेल्या अशोकस्तंभाच्या भव्य प्रतिकृतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. ख्यातनाम मूर्तिकार सुनील देवरे यांनी साडे सहा मीटर उंचीच्या आणि सुमारे साडे नऊशे किलो वजनाच्या या प्रतिकृतीची निर्मिती केली आहे. विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी या कलाकृतीवर टीकेचे बाण सोडायला सुरूवात केली आहे.

सरकारवर टीका करणे हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे. त्यामुळे त्यांची भूमिका सरकारला विरोध करण्याची असली तर त्यात कुणाला वावगे वाटण्याचे कारण नाही. सत्ताधाऱ्यांना सत्तेवर उखडून सत्ता प्राप्त करायची हे विरोधी पक्षांचे धोरणच असते. त्यावरही कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु जिथे देश हिताचा किंवा देश गौरवाचा विषय येतो तिथे एकमत असायला काहीच हरकत नसावी.

सेंट्रल विस्टा प्रकल्पाबाबत तेच घडते आहे. संसदेच्या या इमारतीवर स्थापित करण्यात आलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती यातून कशी सुटेल? विरोधकांनी यावर घेतलेले आक्षेप बालिश आहेत. सिंहाची छाती जरा जास्तच भरदार आहे. सुळे अधिक अणुकुचीदार आहेत. चेहऱ्यावरचे भाव जास्त हिंस्त्र आणि आक्रमक आहेत. मूळ अशोकस्तंभातील सिंहाच्या चेहऱ्यावरील शांत संयमी भावाची नव्या प्रतिकृतीत माती करण्यात आली आहे. हे भाव पूर्णपणे बदलण्यात आले आहेत, असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे.

मूर्तिकार सुनील देवरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे काम आपल्याला टाटा प्रोजेक्ट लि. या कंपनीकडून मिळाले, त्यात भाजपा सरकारची काही भूमिका नाही. भाजपा नेत्यांकडून याबाबत कोणत्याही सूचना करण्यात आल्या नव्हत्या, असे देवरे यांनी स्पष्ट केले आहे. मूळ अशोकस्तंभात आणि संसदेवर स्थापित करण्यात आलेल्या प्रतिकृतीत काहीही फरक नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

अर्थात या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांनी आपले मुद्दे रेटणे बंद केलेले नाही. राष्ट्रीय कोलाटीं सम्राट अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे खासदार असलेल्या संजय सिंह यांनी नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. सारनाथच्या अशोक स्तंभातील सिंहाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत तर नव्या प्रतिकृतीतील सिंह नरभक्षक वाटत असून मनात दहशत निर्माण करणारे आहेत, असा आक्षेप घेतला आहे. नरभक्षक सिंहांच्या चेहऱ्यावरील भावाचा विशेष अभ्यास असल्याच्या थाटात संजय सिंह बोलत आहेत. सिंह नरभक्षक असो वा नसो त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव कसे असतात हे सिंह यांनी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. नरभक्षक नसलेले सिंह पालेभाज्या आणि फळफळावळ खाऊन राहतात असा संजय सिंह यांचा समज झालेला दिसतो.

तृणूमूल काँग्रेसचे नेते जवाहर सरकार यांनीही या सिंहाच्या चेहऱ्यावर अनावश्यक आक्रमक भाव असल्याची टीका केली आहे. जिहादी घटनातज्ज्ञ असदुद्दीन ओवेसी यांनी ‘संसद ही सरकारच्या अधीन नसते, त्यामुळे या प्रतिकृतीचे अनावरण लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हायला हवे होते, पंतप्रधानांनी हा मान घेतल्यामुळे घटनेचा अवमान झाला आहे,’ अशी टीका केली आहे.

काँग्रेसचे जयराम रमेश यांनीही या राष्ट्रीय चिन्हावर आक्षेप घेऊन नाक मुरडले आहे. पंतप्रधान मोदींनी सेंट्रल विस्टा प्रकल्प सुरू केल्यापासून विरोधक या प्रकल्पाच्या नावाने बोटं मोडतायत. जणू काही मोदी नव्या संसदेची निर्मिती करत नसून स्वत:साठी एण्टालिया उभारत आहेत, अशा प्रकारे विरोधकांनी या प्रकल्पावर सुरूवातीपासून टीकेची धार धरली आहे. मोदींनी काहीही केलं की त्याच्या विरोधात बोलायचे हे जणू ठरलेलेच आहे. परंतु, आक्षेप घेताना तर्क तरी खणखणीत द्यायला हवेत. इथे तर्काच्या नावाने बोंब आहे.

अशोक स्तभांवरच्या सिंहाचे चेहरे आक्रमक आहेत हा आक्षेप कसा घेतला जाऊ शकतो? सिंह हे शक्तीचे प्रतीक आहे. प्राण्यांचा राजा, वनराज अशी उपाधी मिरवणारा मिळमिळीत कसा असू शकेल? सिंह आक्रमक नसेल तर काय ससा आणि बारशिंगा आक्रमक असणार काय? कसले हे बिनडोक आक्षेप! छाती रुंदावलेली नको तर काय रोडावलेली हवी? सिंहाचे सूळे दिसतायत यावर आक्षेप घेतला गेलाय, मग सिंहाने सुळे तोडून कवळी लावावी अशी विरोधकांची अपेक्षा आहे काय?
सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या मूळ कृतीत काही सूक्ष्म बदल झाले असल्याचे मान्यही केले तर त्यात कुणाला वाईट वाटण्याचे कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा नवा भारत आहे. कोणी कुरापत काढली तर घरात घुसून मारणारा भारत आहे. अशा नव्या भारताच्या नव्या संसदेवर विराजमान होणाऱ्या सिंहाच्या चेहऱ्यावर आक्रमक भाव दिसले तर त्यात विरोधकांच्या पोटात गोळा येण्याचे कारण काय? गोळा आला तर तो देशाच्या शत्रूंच्या पोटात येऊ दे ना.

सिंहाचा दरारा असायलाच हवा. सिंह म्हणजे राहुल गांधींचा पिडी असून कसा चालेल? की कोणी बिस्कीटं टाकली की हा शेपूट हलवायला लागला किंवा कोणीही आलं आणि गोंजारून गेलं. सिंह म्हटलं की सिंहाचा दराराही असायला हवा. तो दरारा दिसायलाही हवा.

हे ही वाचा:

पोक्सो अंतर्गत तक्रार आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश

मुंद्रा बंदरावर ३७६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

राज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक कडवट अनुभव घेऊन भारत नव्याने कात टाकतोय. जगात भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. हा अरे ला कारे करणारा भारत आहे, हा अमेरिकेसोबतही बरोबरीच्या नात्याने बोलणारा भारत आहे, हा महासत्तांच्या दबावासमोर न झुकणारा भारत आहे. हा चीन-पाकिस्तानच्या कुरापतींना मुहंतोड जबाब देणारा भारत आहे.

भारतीय नेत्यांच्या एकूणच जागतिक वावरात आमुलाग्र बदल जाणवतोय. जागतिक नेत्यांनी भारतावर काही खुळचट आक्षेप घेतले की तिखट भाषेत त्यांचा समाचार घेणारे आमचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची कित्येक उदाहरणं देता येतील. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील उर्मटपणा वाटतो. ताज्या ब्रिटन दौऱ्यात राहुल गांधीनी हे मत नोंदवले होते. त्यावर भरपूर टीकाही झाली होती. सिंहाच्या आक्रमक भावांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांची मानसिकता राहुल गांधींपेक्षा वेगळी नाही.

भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभातील सिंहांच्या चेहऱ्यावर फक्त त्या बदलांची सूक्ष्म झलक दिसू लागली असेल तर त्यात काहूर माजवण्यासारखे काय आहे? सिंह सिंहासारखा दिसू लागलाय याचे तर स्वागत झाले पाहिजे. समस्या एवढीच आहे की आता या सिंहाला आता गोंजारता येणार नाही, खेळवता येणार नाही, कारण हा सिंह आता डरकाळ्या फोडू लागलाय.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version