पवारांची सौ सुनार की झाली, आता एक लोहार की झेला…

पवारांची सौ सुनार की झाली, आता एक लोहार की झेला…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाने मविआला आस्मान दाखवले. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उन्मत्त झालेले नेते जमीनीवर आले. परंतु जनादेश नम्रपणे स्वीकारायचा सोडून ईव्हीएमच्या नावाने बोंबलायला सुरूवात केलेली आहे. मारकडवाडीतील जनतेने बॅलेटवर मतदानाची मागणी केली आहे, अशी हवा निर्माण केली जाते आहे. शरद पवार यांनी या तथाकथित मागणीला जाहीर पाठींबा देत, ‘हा मारकडवाडी पॅटर्न देशाला दिशा दाखवेल’, असे वक्तव्य केले आहे. मारकडवाडीचे तुणतुणे वाजवणाऱ्यांना गोपीचंद पडळकर, राम सातपुते आणि सदाभाऊ खोत या त्रयींनी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर शैलीत उत्तर दिले. मारकडवाडीत स्थानिकांची भव्य जाहीरसभा घेतली. विरोधकांच्या आरोपांच्या चिंधड्या उडवल्या.

लोकसभा निवडणुकीत विजय झाला तेव्हा पवारांसह मविआच्या तमाम नेत्यांना लोकशाहीचा विजय झाल्याची उपरती झाली होती. आता विधानसभेत मतदारांनी तुडवले तेव्हा ईव्हीएम सूचले. एका बाजूला लोकशाही आणि संविधानाचा उदोउदो करायचा, दुसऱ्या बाजूला संसद, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या लोकशाहीच्या स्तंभाना बदनाम करत राहायचे. लोकांचा लोकशाहीवरून विश्वास उडेल आणि अराजक निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करायचा. पवार या खेळात माहीर आहेत. वर्षोनुवर्षे पोसलेलल्या ईको सिस्टीमच्या माध्यमातून अशी आंदोलने उभी करणे आणि पेटवणे यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या ते मारकडवाडी पेटवण्याचा प्रयत्न करतायत, जेणे करून ही आग देशभरात पोहोचवता येईल.

शरद पवार यांच्याशी पडळकर यांचा असलेला पंगा नवा नाही. यापूर्वी चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून ते पवारांना भिडले होते. पवार यांच्या अपवित्र हातांनी या पुतळ्याचे अनावरण होऊ नये म्हणून त्यांनी आधीच या पुतळ्याचे अनावरण केले होते. पडळकरांचे पवारांवर असलेले हे प्रेम मारकडवाडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आले आहे. मारकडवाडीच्या आडून पवार कोणते राजकारण खेळतायत, त्याचा भांडाफोड पडळकरांनी थेट मारकडवाडीत येऊनच केला. मारकडवाडी पॅटर्नच्या नावाने ज्याचा गवगवा केला जातो आहे, तो खरोखरच मारकडवाडीचा आवाज आहे का, हा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण बाहेरून माणसं आणून गर्दी जमवणे हा काही मोठा विषय राहीलेला नाही. राष्ट्रवादी शपचे नेते यात मुरलेले आहेत. निवडणुकीच्या काळात सभा, मोर्चांना दिवसाला पाचशे रुपयांच्या बोलीवर कशी महीलांची गर्दी जमवण्यात येत होती, आशेने आलेल्या महीलांना पैसे न देता कसे फूटवण्यात येत होते, अशा अनेक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या काळात व्हायरल झाल्या होत्या. मारकडवाडीबाबत लोकांच्या मनात जो प्रश्न आहे, त्याचे उत्तर मारकडवाडीतच जाऊन मिळणार होते. ते मिळवण्यासाठीच पडळकर, सातपुते आणि खोत यांनी मारकडवाडी या सभेचे आयोजन केले होते. सभेला गर्दी झाली होती. लोक कॅमेरासमोर आधारकार्ड झळकवून सांगत होते की आम्ही स्थानिक आहोत. आम्ही ईव्हीएमवर मतदान केलेले आहे. आमचा ईव्हीएमवर विश्वास आहे.

मारकडवाडीला पुढे करण्या मागेही पवार जातीचे राजकारण करत असल्याचा घणाघात आज पडळकर यांनी केला. मारकडवाडीत इथल्या स्थानिकांच्या उपस्थिती पडळकर यांनी हा दावा केला. मारकडवाडीत ८० टक्के धनगर समाजाची वस्ती आहे. त्यांना पुढे करून धनगर समाजाचा लोकशाहीवर विश्वास नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पवार करीत आहेत. म्हणूनच त्यांनी या धनगर बहुल गावाची या आंदोलनासाठी निवड केली. धनगर समाज हा परंपरागत भाजपाचा मतदार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची प्रतिक्रीया म्हणून हा समाज अधिक ताकदीने भाजपाच्या पाठीशी उभा राहीला. ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी तसे जाहीरपणे सांगितले आहे. मारकडवाडी पॅटर्नच्या निमित्ताने धनगर समाजाला बदनाम करण्याचा पवार प्रयत्न करत आहेत. हेच कारण आहे, ज्यासाठी शंभर गावातून पवार यांनी या आंदोलनासाठी मारकडवाडीची निवड केल्याचा आरोप पडळकर यांनी केला.

मारकडवाडी माळशिरस मतदार संघातील एक गाव. इथे धनगरांची संख्या मोठी आहे. इथून विजयी झालेले उत्तम जानकर धनगर समाजाचे आहेत. त्यांच्या विरोधात पराभूत झालेले राम सातपुते चर्मकार समाजाचे आहेत. परंतु त्यांना मारकडवाडीत चांगली मते पडली, त्यामुळे तिरमिरलेल्या जानकरांनी हा बॅलेटचा फंडा काढला. मुळात या लोकांना विधानसभा निवडणुकीत ‘एक है तो सेफ’ या घोषणेचा प्रभाव किती गडद होता हे ना पवारांना कळले ना जानकरांना. मतदारांनी जात विसरून हिंदू म्हणून महायुतीला मतदान केले. हे ठिकठिकाणी घडले तसे मारकडवाडीतही घडले, धनगरांनी सातपुतेंना मतदान केले. पवारांच्या जातवादी राजकारणाचा पराभव जसा महाराष्ट्रभरात झाला तसा तो, मारकडवाडीतही झाला. पवार मारकडवाडी प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न करतायत त्याचे कारण हेच आहे. जातवादी राजकारणाचा पराभव झाला नसून ईव्हीएममुळे आम्ही हरलो, हे भासवण्यासाठी त्यांना मारकडवाडी पॅटर्न उपयुक्त वाटतो आहे. अन्यथा एका किरकोळ आंदोलनाची दखल घेऊन पवार मारकडवाडी का गेले असते. तिथल्या लोकांचे त्यांनी तोंडभरून कौतूक का केले असते?

हे ही वाचा : 

ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार

शरद पवारांचा पक्ष म्हणजे गुंड, लुटारुंची टोळी; ते गाडायचे काम देवाभाऊने केले

भूसुरुंग स्फोटात सुरक्षा जवान हुतात्मा!

दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिर!

महाराष्ट्रात पानिपत झाल्यानंतर पवारांचे राजकारण संपल्यात जमा आहे. देशभरात त्यांची नाचक्की झाली ती वेगळीच. मराठा स्ट्राँग मॅन म्हणून मिरवायचे दिवस संपले हे लक्षात आल्यानंतर मारकडवाडी पॅटर्नवर स्वार होऊन पवार पुन्हा गमावलेली पत मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. या मुद्द्यावर त्यांनी दिल्लीतील त्यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. आपल्या भाषणात गोपीचंद पडळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील किस्सा सांगितला तो ऐकल्यानंतर पवारांसारख्या नेत्यांना बॅलेटवर मतदान का हवे आहे, त्याचा उलगडा होऊ शकतो. ज्या निवडणुकीत बाबासाहेब १७ हजार मतांनी पराभूत झाले होते. त्या मतदार संघातील ७२ हजार मते अवैध ठरवण्यात आली होती. हा खरा घोटाळा होता. विरोधकांना बॅलेटच्या नावाने ज्या उचक्या येतायत त्याचे कारण हेच आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version