काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते, गौरव गोगोई यांच्या विदेशी पत्नीची, तिच्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांचे लग्न ही आता खासगी बाब राहिली नसून मामला चव्हाट्यावर आलेला आहे. इलिझाबेथ यांचा गौरव गोगोई यांच्याशी विवाह झाला २०१३ मध्ये. बाई गेली ११ वर्षे भारतात राहतायत. अजून भारताचे नागरिकत्व घेण्याची इच्छा त्यांना झालेली नाही. अजूनही त्या ब्रिटीश नागरिक आहेत, परंतु गोगोई यांच्या कालियाबोर मतदारसंघात त्या प्रचाराला मात्र उतरतात. काँग्रेसमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे.
विदेशी महिलेशी विवाह करणारे गोगोई हे काही पहिले नाहीत. परंतु जेव्हा महिला विदेशी असते आणि तिचे शत्रू राष्ट्राशी प्रेमाचे संबंध असतात, तेव्हा त्यावर चर्चा होणे स्वाभाविक असते. भारताच्या परराष्ट्र सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना विदेशी महिलेशी विवाह करण्याची परवानगी असते. परंतु, त्या महिलेला सहा महिन्यात भारताचे नागरिकत्व घ्यावे लागले. ही अट बहुधा खासदारांना लागू नसावी. नागरिकत्वाशिवाय भारतात वर्षोनुवर्षे राहणाऱ्या इलिझाबेथ कोलबर्न गोगोई या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या विद्यार्थीनी. क्लायमेट एण्ड डेवलपमेंट नॉलेज नेटवर्क (सीडीकेएन) या संस्थेत त्या २०११ ते २०१५ या काळात कार्यरत होत्या. या काळात त्यांनी पाकिस्तानात बरेच दौरे केले. तिथे त्यांचा मुक्कामही असे. जलवायू परिवर्तन या विषयाशी संबंधित असलेल्या इलिझाबेथ यांनी युरोपियन युनियन, अमेरेकी सिनेट, तसेच संयुक्त राष्ट्र संघाशी संबंधित संस्थांसाठी टांझानिया आणि युरोपमध्ये काम केलेले आहे. याच कामाच्या संदर्भात ‘लीड पाकिस्तान’ ही एनजीओ चालवणाऱ्या अली तौकीर शेख या इसमाशी इलिझाबेथ यांचा संपर्क निर्माण झाला. त्यांच्यासोबत त्यांनी काम करायला सुरूवात केली. हा इसम कधी काळी पाकिस्तानी नियोजन आयोगाचा सदस्य होता.
अली तौकीर आणि इलिझाबेथचे संबंध केवळ व्यावसायिक राहिले नाहीत. जर ते असते तर हा तौकीर विविध गाठीभेटी निमित्त भारतात सतत आला गेला नसता. गोगोई यांच्या सरकारी संबंधांचा वापर करून अनेक पाकिस्तानी व्यक्तींनी भारताचा दौरा केला. पाकिस्तानींना भारताचा व्हीसा मिळणे सोपे नसते. परंतु, गोगोई यांच्या कृपेमुळे हे शक्य होत असे. अली तौकीरचे त्याचे पाकिस्तानच्या आयएसआयशी घट्ट संबंध असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यूपीएच्या कार्यकाळात तो सुमारे १८ वेळा भारतात आला होता.
भारतातील अंतर्गत घडामोडींबाबत त्याने त्याच्या एक्स अकाऊंटवर सतत नकारात्म पोस्ट केलेल्या आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, सीएए कायदा याबाबत त्याने भारत सरकारवर कडवट टीका केली असून दिल्ली दंगलीबाबत गौरव गोगोई यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे तोंड भरून कौतुक केले आहे. या सगळ्या पोस्टमध्ये त्याने इलिझाबेथ आणि काही वेळा गौगर यांनाही टॅग केले आहे.
देशात मोदी सरकार आल्यानंतर शिष्टाचारानुसार परराष्ट्र मंत्रालयाला माहिती न देता काही तरुणांसह गौरव गोगोई २०१५ मध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भेटायला गेले होते. ते परराष्ट्र व्यवहार संबंधित संसदीय समितीचे सदस्य नाहीत. त्यामुळे एका शत्रू देशाच्या उच्चायुक्तालयात जाताना त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत सुचित करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासीत यांची भेट झाल्यानंतर गोगोई यांनी संसदेत त्यांनी सागरी सुरक्षा, रडार यंत्रणा, शस्त्र निर्मितीचे कारखाने, भारत- ईराण यांचा नेमका व्यापार मार्ग आणि एकूणच सुरक्षेच्या संदर्भात अत्यंत संवेदनशील माहिती संसदेत सातत्याने विचारली होती. या सगळ्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्मासर्मा यांनी प्रश्नचिन्ह लावले आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणाही केली आहे.
गौरव गोगोई यांनी इलिझाबेथ यांचा आयएसआयशी संबंध जोडण्याचे भाजपाचे प्रयत्न हास्यास्पद असल्याचे सांगून इलिझाबेथ जर आयएसआय असतील तर मी रॉ आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचा सगळा उपद्व्याप आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष्य ठेवून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोप ऐकल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात काही प्रश्न निश्चितपणे निर्माण होतात. गोगोईंवर आरोप करणे हा राजकारणाचा मामला असू शकतो. परंतु, तरीही काही महत्वाचे प्रश्न उरतातच.
पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे. या देशाने भारतावर आजवर चार युद्ध लादली आहेत, देशाची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानने दहशतवादाचा बुरखा पांघरून भारताशी कायम छुपे युद्ध सुरू ठेवलेले आहेत. अशा देशात पत्नीचे सतत येणे-जाणे खासदार असलेल्या काँग्रेस नेत्याच्या संशयास्पद का वाटले नाही? अली तौकीर शेख एका बाजूला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असताना गोगोईंची इतकी प्रशंसा का करतो? विवाहानंतर गेली ११ वर्षे भारतात राहणाऱ्या इलिझाबेथ यांना भारताचे नागरिकत्व घेण्याची इच्छा का झाली नाही? की त्यांनी सोनिया गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. त्या सुद्धा विवाहानंतर बरीच वर्षे भारता राहिल्या परंतु त्यांनी सुरुवातीची अनेक वर्षे भारताचे नागरिकत्व स्वीकारले नव्हते.
हे ही वाचा..
उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!
सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनधिकृत थडग्यावर पालिकेची कारवाई
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक
एनजीओंच्या माध्यमातून भारताच्या अंतर्गतबाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, की विदेशातून पैसा पुरवल्या जाणाऱ्या एनजीओशी संबंधित लोकांबाबत संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. चळवळ्या उद्योगपती जॉर्ज सोरोस याच्या ओपन सोसायटीमार्फत इलिझाबेथ यांच्या संस्थेला धनलाभ झाल्याचा भाजपाचा आरोप आहे. अशा अनेक एनजीओचे कर्ते भारताची कड घेण्यापेक्षा शत्रूंची भलामण करताना जास्त दिसतात. काँग्रेसचे पाळीव सॅम पित्रोदा हे ग्लोबल नॉलेज इनिशिएटीव्ह नावाची एनजीओ चालवतात. चीन भारताचा शत्रू नाही, भारत विनाकारण चीनबाबत आक्रमक आहे. असे विधान त्यांनी केले होते. मणिशंकर अय्यर हे तर पाकिस्तानचे उघड भक्त होते. मुळात जिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी चीनी कम्युनिस्ट पक्षाशी करार करून मोकळे झाले आहेत आणि त्याबाबत १६ वर्षांनंतरही जे गुढ मौन पाळून आहेत, तिथे पक्षाच्या अन्य नेत्यांची काय कथा? गांधी परिवाराच्या राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या अनेक देणग्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. भाजपाने काँग्रेसच्या अशा अनेक नेत्यांचे बुरखे फाडले आहेत. परंतु एखाद्या नेत्याचे सार्वजनिकरीत्या वस्त्रहरण करून त्याला तसेच सोडून देण्याचे काम भाजपाचे नेते करतायत. अशा प्रकारचे आरोप यापूर्वी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा झालेले आहेत. गोगोई प्रकरण खणून काढण्यासाठी आसाम सरकारने एसआयटीची स्थापना केलेली आहे. हे प्रकरण तरी धसास लागावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)