नक्षली कोबाड घँडीच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादाला दिलेला पुरस्कार परत घेण्यावरून सध्या विचारवंत आणि साहित्यिक पेटलेले आहेत. मिळेल त्या काडीच्या आधाराचा सतत शोध घेणाऱ्या शिवसेना उबाठाच्या मुखपत्रात या घँडीबाबावर अग्रलेख पाडण्यात आला आहे. सरकार आणि पक्ष एकाच मुहूर्तावर गाळात गेल्यापासून उद्धव ठाकरे मिळेल त्याला सोबत घेतायत. हिंदुत्ववाद्यांची पोटदुखी असलेला कोणीही ठाकरेंना चालून जातो.
पाठिंब्याच्या या देवाण घेवाणीतून एक नवा संकरित घँडीवाद जन्माला येतोय. उद्धव ठाकरे यांची साथ कशी करू शकतात? अमक्याला पाठिंबा कसा काय देऊ शकतात? तमक्याचा पाठिंबा कसा काय घेऊ शकतात? असे प्रश्न लोकांना काही काळापूर्वी पडायचे. परंतु आता भाजपाला विरोध करण्यासाठी ते कोणालाही खांद्यावर घेऊ शकतात याबाबत जनचेचीही खात्री झालेली आहे. कधी काळी पोलिसांच्या विरोधात सामनात सहसा लिहिले जायचे नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना चालवण्यासाठी जे डूज एण्ड डोण्ट्स निश्चित केले त्यात हा सगळ्यात मोठा निकष होता.पोलिसांच्या समस्यांना वाचा फोडणारे व्यासपीठ म्हणून सामनाकडे पाहिले जायचे. पोलिसांच्या कामगिरीची एखादी बातमी आली तर त्यात कामगिरीत सामील असलेल्या प्रत्येक पोलिसाचे नाव आवर्जून छापले जाई. परंतु आता कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेल्या ठाकरेंनी पोलिसांनाही सोडलेले नाही. वनवासी क्षेत्रात पोलिसांच्या अत्याचाराविरोधात लढणाऱ्यांना माओवादी किंवा नक्षलवादी ठरवून मारले जाते, असा नक्षली प्रपोगंडा सामनातून सुरू केलेला आहे.
निसरड्या जमीनीवरून माणूस एकदा का घसरायला लागला की किती घसरायचे हे त्याच्या हाती उरत नाही. ठाकरेंचेही असेच झालेले आहे. कोबाड गांधी या नक्षलवाद्याने लिहिलेल्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनघा लेले यांनी केलेल्या अनुवादाला राज्य सरकारने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर केला होता. परंतु अशा प्रकारचा पुरस्कार नक्षलवादाला प्रतिष्ठा देऊ शकतो असा विचार करून राज्य सरकारने हा पुरस्कार रद्द केला.
ज्या विरुद्ध तथाकथित विचारवंत एकवटले. त्यांना लोकशाहीची हत्या झाल्याचा भास झाला आणि त्यांनी सरकारचा विरोध सुरू केला. या प्रकरणात सरकारने महाराष्ट्राचा स्वतंत्र लोकशाहीवादी विचार मारला आहे, असा दावा सामनाच्या अग्रलेखात केलेला आहे. सामनाच्या कार्यकारींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे ठाऊक नाही. त्यांनी उगाच लोकशाही वैगेरेसारखे न झेपणारे शब्द बोलू नये. कोथळा, खंजीर, वाघनख इथपर्यंतच तुमची झेप. शिवसेना उबाठा हा पक्ष, त्यांचे मुखपत्र एका कुटुंबाची खासगी मालमत्ता आहे. पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री, संपादक सगळं काही या कुटुंबातच फिरत असते. त्यांनी लोकशाहीच्या गप्पा न मारलेल्या बऱ्या. हुकूमशाही डरपोक पायावर उभी असते. एका पुस्तकाला सरकार घाबरले असे बिनडोक तर्क गुडघ्यात मेंदू असलेल्यांच्याच टाळ्या मिळवू शकतात.
हे ही वाचा:
७१ वर्षीय आजोबा शेतात गेले ; नंतर सापडले त्यांचे तुकडे च
क्क एलोन मस्क तोट्यात, ते ही इतके डॉलर?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात लोकांमध्ये संताप
छपरा विषारी दारु दुर्घटनेतील मृतांची संख्या ५० वर
बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा, त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेले कडवे हिंदुत्ववादी तरुण कधी काळी अवघ्या देशभरात होते. ही मंडळी मातोश्रीवर बाळासाहेबांचे दर्शन घेऊन जात. आज उद्धव ठाकरे यांना मानणारे असे किती लोक उरले आहेत? लोक जेव्हा नेत्याच्या पाठीशी उभे राहात नाहीत तेव्हा गर्दी जमवावी लागते. हवशे गवशे एकत्र करून संख्याबळ दाखवावे लागले. कधी काळी बाळासाहेबांच्या विरोधात उभे ठाकलेल्या प्रत्येक विचाराला उद्धव ठाकरे कवटाळत चालले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केला. संभाजी ब्रिगेडसोबत चूल माडली. कम्युनिस्टांचा पाठिंबा घेतला. ज्यांना आयुष्यभर शिव्या घातल्या त्या प्रकाश आंबेडकरांच्या वळचणीला गेले. आता नक्षलवाद्यांचाही यांना पुळका आला आहे.
वनवासींचे ब्रेनवॉश करून त्यांच्या हाती हत्यारं देणाऱे त्यांना देशविरोधी कारवाया करायला भाग पाडणाऱ्या नक्षलवाद्यांशी सामनाकार रा.स्व.संघाशी तुलना करतायत. वैचारीक कडेलोट म्हणतात तो यालाच. पुरस्कार रद्द करण्याच्या मुद्यावरून प्रज्ञा पवार, नीरजा, हेरंब कुलकर्णी, डॉ. सुहास पळशीकर आदी डाव्या साहित्यिकांनी अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या मुद्यावरून विविध सरकारी समित्यांतील पदांचे राजीनामे दिले आहेत. संजय राऊत आणि अजित पवार यांनी अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्या नक्षलवादी विचारसरणीमुळे सुकमा, दंतेवाडासारख्या नक्षलग्रस्त भागांमध्ये आजवर शेकडो पोलिसांचे, नागरीकांचे बळी गेले, त्या नक्षलवादी विचारसरणीच्या नेत्यासाठी साहित्यिक आवाज उठवतायत.
ज्या नक्षलवाद्यांची प्रेरणा माओवाद आहे, त्या विचारसरणीच्या विरोधात कारवाई केल्यामुळे लोकशाही कशी काय धोक्यात येऊ शकते? कारण माओवादाचे लोकशाहीशी काहीही देणे घेणे असते तर चीनमध्ये लोकशाही नांदली नसती का? परंतु भाजपाविरोधाची कावीळ असलेल्यांना कोणाचाही पुळका येऊ शकतो.
अफजल गुरूची भलामण करणाऱ्या कोबाड घँडीचा सुद्धा. भाजपाच्या विरोधात असलेल्यांना एकत्र करण्याचा जो कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही काळात हाती घेतलाय. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात गोल जाळीदार टोप्या घातलेल्या, दाढ्या वाढवलेल्या मुस्लीम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसू लागलेली आहे. ठाकरेंच्या नव घँडीवादाचे हे फळ आहे. परंतु सरकारने लोकशाहीच्या मुळावर उठलेल्यांची तळी उचलणाऱ्या साहित्यिकांच्या विरोधाची फार पर्वा करण्याची गरज नाही. घँडीवादाचे कलेवर खांद्यावर घेणाऱ्या ठाकरेंच्या विरोधाला सुद्धा किंमत देण्याची गरज नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारतातील सुजाण जनता सक्षम आहे. बापाच्या नावाने कारकीर्द चालवणाऱ्यांच्या वैचारिक मार्गदर्शनाची लोकशाहीला गरज नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)