परकीय हाताच्या शोधात, एक हसिना, एक दिवाना…

मोदी नावाचा काटा अनेकांच्या पायात खुपतोय. तो काढून फेकण्यासाठी काही लोक उतावीळ आहेत

परकीय हाताच्या शोधात, एक हसिना, एक दिवाना…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पतंपधान शेख हसिना यांना देशातून पलायन करावे लागले. तूर्तास त्या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत. बांगलादेशात उसळलेला हिंसाचार, अस्थिरता आणि त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सद्य़स्थितीबाबत उपस्थितांना माहीती दिली. या बैठकीत बांगलादेशात झालेल्या अराजकामागे परकीय हात आहे काय? असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. हा प्रश्न अत्यंत धारधार आहे.

बांगलादेशात आंदोलनाच्या भडक्यात अनेक मंदिरांची होळी करण्यात आली. हिंदू घरांवर वरवंटा चालला. याचा अर्थ जिहादी मानसिकतेच्या लोकांचा या आंदोलनात भरणा होता. हिंदूंच्या जीवित आणि वित्ताशी खेळणे हा भारतातील अनेकांच्या दृष्टीने दखलपात्र गुन्हाच नाही. त्यांना आनंदाचे भरते आले होते ते शेख हसिना यांना पदच्युत केल्याचे. लोकशाही प्रक्रियेतून सत्तेवर आलेले एखादे सरकार अशा प्रकारे उखडून फेकता येते हे पाहून अनेकांना गुदगुल्या होत आहे.

अनेकांची कल्पनाशक्ती भराऱ्या घेऊ लागली आहे. निवडणुकीच्या राजकारणात वारंवार माती खाणारे नेते, त्यांच्या कच्छपि लागलेला मीडिया, त्यांची इकोसिस्टीम अशा सगळ्यांचा त्यात समावेश आहे. मनोमन भारतात असे काही घडू शकेल का, याची चाचपणी अनेकजण करतायत. कारण मोदी नावाचा काटा अनेकांच्या पायात खुपतोय. तो काढून फेकण्यासाठी काहीही करायला काही लोक उतावीळ आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी याला अपवाद असतील, असे वाटत नाही.

रिपब्लिक या वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी काल या संदर्भात एक विधान केले होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ब्रिटनमध्ये गेलेल्या राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत काही विधाने केली होती. भारतातील लोकशाही वाचवण्यासाठी अमेरिकेने हस्तक्षेप करावा, असे ते म्हणाले होते. बांगलादेशात अमेरीकेच्या डीप असेट्सनी ज्या प्रकारे हस्तक्षेप केला आणि एक लोकनियुक्त पंतप्रधानाला पलायन करण्यास भाग पाडले, तसा हस्तक्षेप राहुल यांना अपेक्षित आहे का, असा थेट सवाल अर्णब यांनी केला होता.

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राहुल यांनी जो सवाल परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना केला. बांगलादेशात जे काही घडले त्यात परकीय हात आहे, का? राजकारणात सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देण्याची पद्धत नसते. मग वळणदार प्रश्नाला सरळ उत्तर कसे मिळेल? त्यात परराष्ट्र मंत्री पदावर जर डॉ.जयशंकर यांच्यासारखा तिरकस आणि तिखट बोलणारा, अत्यंत बुद्धीमान माणूस असल तर हे उत्तर जिलेबी सारखे सरळ असेल. अजून असे काही समोर आलेले नाही, असे सांगून जयशंकर मोकळे झाले.

बांगलादेशसारख्या छोट्या देशांमध्ये सरकारविरुद्ध अशाप्रकारचा उठाव परकीय हाताशिवाय शक्य नसतो. किंबहुना छोट्या देशातील जे नेते आपल्या इशाऱ्यावर नाचत नाहीत, त्यांची सरकारे उलथवणे हा महासत्तांचा आवडता छंदच असतो. बांगलादेशाने भारत आणि चीनसोबत संबंध ठेवताना समतोल राखला होता. भारताच्या हिताआड येईल असे एकही पाऊल बांगलादेश उचलत नसल्यामुळे चीन अस्वस्थ होता. अमेरिकेला बांगलादेशात सैन्य तळ हवा होता, जो देण्यास शेख हसिना यांचा विरोध होता. बांगलादेशचे धार्मिक आधारावर विभाजन करण्याचे षडयंत्र एका देशा मार्फत शिजवले जात असल्याचा उघड आरोप करत शेख हसिना यांनी थेट अमेरीकेकडे बोट दाखवले होते. जोपर्यंत भारताशी जवळचे संबंध असलेल्या शेख हसीना पंतप्रधान पदावर आहेत, तोपर्यंत चीन आणि अमेरीकेची मनमानी शक्य नव्हती. म्हणून त्यांना हटवण्यात आले.
त्यामुळे बांगलादेशात जे काही घडले त्यामागे परकीय हात आहे, ही बाब उघड आहे. ही बाब राहुल गांधी यांना समजण्याच्या पलिकडची असली तरी त्यांची भाषणे लिहून देणारे त्यांच्या पक्षातील जे विद्वान आहेत, त्यांना हे माहीत असायला हवे. त्यांनी ते राहुलना सांगितलेही असण्याची शक्यता आहे. परंतु राहुल गांधी यांना या प्रश्नाचे उत्तर थेट हॉर्सेस माऊथमधून हवे असेल, म्हणूनच त्यांना डॉ.एस.जयशंकर यांना प्रश्न विचारला.

बांगलादेशातील या घडामोडींनंतर भारतात एखाद्या असंतुष्ट वर्गाला हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्याची कल्पना अनेकांच्या सुपीक डोक्यात आली असेल. अशा प्रकारचे प्रयत्न मोदी ०.२ मध्ये झालेलेही आहेत. परंतु केंद्र सरकारने हा प्रश्न व्यवस्थित हाताळला. लोकशाही प्रक्रियेनुसार घेतलेल्या निवडणुकीत ज्यांनी पराभवाची चव चाखली, असे पक्ष अलिकडे लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या नावाखाली अराजकाचे हे प्रयोग करणाऱ्यांना बळ देण्याचे प्रयत्न करीत असतात. परंतु भारतासारख्या खंडप्राय देशात हे इतके सोपे नाही. भारत बांगलादेश, नेपाळ किंवा मालदीव नाही. त्यामुळे जॉर्ज सोरोसचा पैसा, महासत्तासाठी काम करणाऱ्या खतरनाक गुप्तचर यंत्रणा, त्यांची आखीव रेखीव ष़डयंत्र असे सगळे योग जुळून आल्यानंतर देशातील अस्तनीतल्या निखाऱ्यांना फक्त त्यांचा चेहरा बनण्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो. परकीय हातांनी तयार केलेली स्क्रीप्ट वाचून दाखवायची असते.

हे ही वाचा:

नीरज चोप्रा ‘नंबर वन’

उधमपूरमध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले!

अगदी कमी वेळेत हसिना यांनी केली भारतातील आश्रयाबद्दल विनंती

न्यूयॉर्कमध्ये आंदोलकांचा बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला

यापूर्वी परकीय हातांनी अशा अनेक कामगिरी फत्ते केलेल्या आहेत, हे राहुल गांधी यांना ठाऊक नसेल? ब्रिटनमध्ये बोलताना भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी अमेरिकेने हस्तक्षेप करावा असे मत व्यक्त केले होते. ते केवळ एक विधान नव्हते. तो महासत्तांना इशारा होता, आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त हात द्या. काँग्रेसचे एक पाकपिसाट नेते मणिशंकर अय्यर यांनी तर थेट पाकिस्तानला आवाहन केले होते की, मोदींनी हटवण्यासाठी आम्हाला मदत करा. मणिशंकर हे गांधी घराण्याचे पाळीव असून अत्यंत विश्वासू आहेत. या अर्थ स्पष्ट आहे. काँग्रेस अशा परकीय हाताच्या शोधात बऱ्याच काळापासून आहे. बांगलादेशात अशाच एखाद्या किंवा एका पेक्षा जास्त परकीय हातांनी कामगिरी फत्ते केली हे पाहील्यानंतर तो हात कोणता हे जाऊन घेण्यात राहुल गांधी यांना प्रचंड रस असणे स्वाभाविक आहे. एकदा का ओळख पटली तर या हाताशी हातमिळवणी करणे सोपे होईल, असे त्यांना वाटले असावे. अर्थात केंद्रात बसलेले मोदी सरकार विरोधकांचा इरादा न ओळखण्या इतके दुधखुळे नाही. ते सक्षम आहेत, सावध आहेत आणि सक्रीय सुद्धा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version