दोघांच्या तंट्यात तिसऱ्याच्या तोंडी लोण्याचा गोळा…

जागावाटपावरून शरद पवारांनाच अधिक लाभ

दोघांच्या तंट्यात तिसऱ्याच्या तोंडी लोण्याचा गोळा…

महाविकास आघाडीचे जागा वाटप काल अखेर जाहीर झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीशप आणि उबाठा शिवसेना प्रत्येकी ८५ जागा लढवणार. १८ जागा मित्र पक्षांना सोडणार, असे संजय राऊतांनी जाहीर केले. हे जागा वाटप जाहीर केल्यानंतर उबाठा शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीचे काय असा सवाल होताच. तोही विषय राऊतांनी स्पष्ट केला. त्या यादीत काही दुरुस्त्या असल्याची कबुली दिली. याचा अर्थ गोंधळ पुरता सरलेला नाही. १५ जागांचे झोंबडे असून शिल्लक आहे. या जागांवर वाद  असल्यामुळे त्या जाहीर करण्यात आल्या नाहीत, असे मानायला वाव आहे. काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या भानगडीत फायदा झाला तो राष्ट्रवादीशपचा ८० जागांची अपेक्षा बाळगणाऱ्या या पक्षाला पाच जागांचा बोनस मिळाला.

मविआचे नेते जयंत पाटील, नाना पटोल आणि संजय राऊत यांच्या उपस्थित काल २७३ जागांचे भवितव्य निश्चित झाले. १५ जागांवर अजून चर्चा सुरू आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापली पहिली यादी जाहीर केल्यामुळे मविआवर दबाव होतात. जागावाटपाचा घोळ फार लांबला तर उमेदवारांना प्रचारासाठी फार वेळ मिळणार नाही आणि निवडणूक जड जाईल असा विचार करून दोन टप्प्यात जागा वाटप जाहीर करण्याचा विचार पुढे आला असावा. सुरूवातीला जे आकडे बाहेर आले होते त्यात काँग्रेस १०५, उबाठा शिवसेना ९० आणि राष्ट्रवादी ८० जागा लढवणार असे संकेत मिळत होते. काल जे जागा वाटप जाहीर झाले, त्यात शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेले दिसते. मविआतील दोन पक्ष भांडत असताना पवार शांत बसून होते. हे दोन बोके लढत असताना जागा वाटपाच्या लोण्याचा सगळ्यात मोठा तुकडा, पवारांनी दोघांच्या न कळत तोंडात टाकला. अजूनही उरलेल्या १५ जागांवर साठमारी बाकी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि उबाठा शिवसेना हे दोन पक्ष आतून नक्कीच कष्टी झालेले आहेत. त्यांची

घोर निराशा झालेली आहे. उरलेल्या १५ जागांपैकी मोठा वाटा काँग्रेसच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. एखाद दुसरी जागा उबाठा शिवसेनेच्या वाट्याला येईल. याचा अर्थ ९० जागा सुद्धा ठाकरेंना मिळण्याची शक्यता नाही. भाजपा सोबत मोठा भाऊ, छोटा भाऊचा खेळ खेळणाऱ्या ठाकरेंना या जागा वाटपामुळे मोठा झटका बसला आहे. ९० च्या आत जर त्यांचा हिशोब आटोपला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक मेसेज जाणार हे निश्चित.

हे ही वाचा:

अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला

पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक

बारामुल्लामधील न्यायालयात पुरावा म्हणून आणलेल्या ग्रेनेडचा स्फोट

अतुल भातखळकर ‘विजयी भव’…

विदर्भात उबाठा शिवसेनेची मोठी निराशा होणार असे स्पष्ट दिसते आहे. इथे काँग्रेसला इतर पक्षांना फार वाव देण्याची इच्छा नाही. विदर्भातून दणदणीत यश मिळवत सत्ता काबीज करण्याची काँग्रेसची रणनीती आहे. ४२ ते ४३ जागा लढवणार असे विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेले आहे. हरीयाणाच्या निकालातून मविआने धडा घेतलेला दिसतो. तिथे काँग्रेसने स्वबळाचा हट्ट धरून पायावर धोंडा मारून घेतला. ती चूक इथे नको म्हणून मित्र पक्षांचा विचार करण्याची उपरती काँग्रेसला झालेली आहे. मित्र पक्षही खूप आग्रही दिसतात. सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात याची झलक पाहायला मिळाली. त्यांनी कोणाशीही चर्चा न करता एकतर्फी पाच जागांची घोषणा करून टाकली. या जागा अर्थातच मुस्लीमबहुल क्षेत्रांतील आहेत.

इतरांनीही हाच कित्ता गिरवला तर ज़ड जाईल, हे लक्षात आल्यामुळे सपा, शेकाप, डावे पक्ष आणि आम आदमी पार्टीसाठीही जागा सोडण्याची घोषणा राऊत यांनी केलेली आहे. घसघशीत १८ जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. मविआमध्ये आधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून राडा करून पाहीला. हाती काहीच लागले नाही. मूग गिळून गप्प राहावे लागले. जागा वाटपावरून काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेची झोंबाझोंबी सुरू होती. शरद पवार मध्यस्थीचा आव आणत होते. परंतु प्रत्यक्ष जागा वाटप जाहीर झाल्यानंतर तेच अपेक्षेपेक्षा जास्त जागा घेऊन गेले. मुख्यमंत्रीपदावरून सुद्धा हेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस आणि उबाठा शिवसेना भांडत बसतील आणि मुख्यमंत्री पदाच्या लोण्याचा गोळा पवार घेऊन जातील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version