25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरसंपादकीयबाजारात तुरी... पण संपत नाही हाणामारी

बाजारात तुरी… पण संपत नाही हाणामारी

मविआमध्येही विविध मुद्द्यांवर अशीच खडाजंगी सुरू आहे.

Google News Follow

Related

मविआतील तीन पक्ष भाजपाशी लढण्याची तयारी करीत आहेत, परंतु यांच्या आपसांतल्या हाणामाऱ्या संपण्याचे नाव नाही. शिउबाठाकडे शिल्लक असलेल्या मुठभर नेत्यांपैकी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी जोरदार जुंपलेली आहे. छत्रपती संभाजी नगरची लोकसभा लढवण्याची दोघांची इच्छा आहे. त्यावरून दोघेही एकमेकांना भिडलेले आहेत. मविआमध्येही विविध मुद्द्यांवर अशीच खडाजंगी सुरू आहे. तिघांचे तीन सूर लागलेले असताना आघाडी बाहेर असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मविआला रोज नवे दणके देतायत.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या पुढे बोलण्याची कोणाची टाप नव्हती. उमेदवारांची यादी अनेकदा सामनामध्ये प्रसिद्ध व्हायची. जो उमेदवार जाहीर करण्यात आला, तो शिरसावंद्य मानून शिवसैनिक कामाला लागायचे. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची स्थिती खूपच वाईट झाली आहे. नेतृत्व कमजोर झाल्यामुळे पक्षात लाथाळ्या वाढल्या आहेत.

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर मतदार संघातून शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. अवघ्या ४९९२ मतांनी पराभव झाला होता. खैरे यांना ३८४५५० तर जलील यांना ३८९०४२ मतं मिळाली होती. अत्यंत थोडक्या मतांनी विजय हुकल्यामुळे पराभव खैरेंच्या वर्मी लागला. हा मतदार संघ पुन्हा खेचून घेता येईल अशी शक्यता वाटत असल्यामुळे खैरे पुन्हा इथून इच्छुक आहेत.

 

खैरे हे राज्यात आलेल्या पहिल्या शिवशाही सरकारमध्ये मंत्री होते. एका रात्री त्यांना मातोश्रीवरून फोन आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वीय सहायक असलेला थापा दुसऱ्या बाजूने बोलत होता. तुम्ही १० मिनिटात मातोश्रीवर पोहोचा. ११ व्या मिनिटाला आलात तर मंत्र्याचे माजी मंत्री व्हाल असा शिवसेनाप्रमुखांचा निरोप आहे, असा निरोप देऊन त्याने फोन ठेवला. रात्री ज्या मोकळ्या कपड्यांवर खैरे झोपले होते, त्या कपड्यांवर ते मातोश्रीवर दाखल झाले. खैरेंची निष्ठा ही अशी आहे. गेल्या वेळी खैरे यांचा पराभव झाला असल्यामुळे आपल्याला तिकीट मिळेल या आशेवर अंबादास दानवे बसलेले आहेत. ‘मी लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे’, अशी जाहीर घोषणा दानवे यांनी केली. खैरेंना त्यामुळे स्वाभाविकपणे मिरच्या झोंबल्या. ‘इच्छा असून काय होते आहे, नशीबात सुद्धा असावे लागते ना’, या शब्दात खैरेंनी दानवेंची हवा काढण्याचा प्रयत्न केला.

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दानवे ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीले. निष्ठेच्या मोबदल्यात विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते पद त्यांनी पदरात पाडून घेतले. भाजपाच्या विरोधात दानवे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. ते ठाकरेंच्या जवळ असतात. कारण ते ठाकरेंसाठी जास्त उपयुक्त आहेत. खैरे काहीही बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ‘शिवसैनिकांचा मेंदू गुढग्यात असतो’, हे त्यांचे विधान चांगलेच गाजले होते. या विधानावरून विरोधकांनी शिउबाठाला चांगलेच ट्रोल केले होते. खैरेंची वाट्टेल ते बोलण्याची खोड आणि वाढते वय यामुळे दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

 

दानवे जेव्हा म्हणाले की, ‘मी गेली दहा वर्षे या जागेसाठी इच्छूक आहे’, त्यावर खैरेंनी प्रतिक्रीया दिली की, ‘त्यामुळेच मी पडलो’. आपला पराभव दानवेंमुळे झाला असे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगून टाकले. लोकसभा निवडणुकीवरून दोघांमध्ये अशी रस्सीखेच सुरू झाल्यामुळे पक्षप्रमुखांना या विषयात लक्ष घालावे लागले आहे. छत्रपती संभाजी नगरच्या वादाबाबत ठाकरेंनी बैठक घेतली. त्या बैठकीत दानवे आणि खैरे दोघांना बाहेर ठेवण्यात आले. दानवे असो खैरे असो वा ठाकरे, ‘बाजारात तुरी, संपत नाही हाणामारी’ अशीच या सगळ्यांची स्थिती आहे. मुळात मविआमध्ये जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ संपलेले नाही. बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला मविआमध्ये सामावून घ्यावे की न घ्यावे याबाबत अजूनही निर्णय जाहीर झालेला नाही. आघाडीत घेतले तर वंचितची जागांची अपेक्षा मोठी आहे.

हे ही वाचा:

पुण्यातील विमाननगर भागात १० सिलिंडर फुटले!

मुस्लीम लीग जम्मू काश्मीर संघटनेवर बंदी

मराठी माणसाच्या घरांचे कट-कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही!

एकीकडे अपघात झाला आणि दुसरीकडे कोंबड्या पळवल्या!

अलिकडेच वंचित आघाडीची संभाजीनगरात बैठक झाली. त्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी नवा फॉर्म्यूला सादर केला. ‘मविआतील दोन पक्ष फुटलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. म्हणून शिउबाठा, काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडीने प्रत्येकी १२ जागा लढवाव्या’, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. ‘प्रत्येकाला मिळालेल्या १२ जागांपैकी ३ उमेदवार मुस्लीम असावे’, अशी महत्वपूर्ण सूचनाही त्यांनी केलेली आहे. रेखा ठाकूर यांची मागणी त्यांच्या पक्षाच्या आकाराच्या तुलनेत अवाजवी वाटू शकते. परंतु ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षात जे काही शिल्लक आहे, ते पाहाता, त्यांचे म्हणणे अगदीच मोडीत काढण्यासारखे निश्चितच नाही. संभाजी ब्रिगेडनेही ठाकरेंसोबत युती केलेली आहे. त्यांनी तर अद्यापि तोंड उघडलेले नाही.

 

‘कशात नाही काय आणि फाटक्यात पाय’, अशी या पक्षांची अवस्था झालेली आहे. प्रत्येक पक्ष हवेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी फिस्कटली तर वंचित आणि शिउबाठाने एकत्र येऊन २४-२४ जागा लढवाव्या अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. कोणीही यावे काहीही बोलावे, अशी ठाकरेंच्या पक्षाची स्थिती झालेली आहे. उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणारे संजय राऊत, प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात तोंड उचकटण्याचे धाडस दाखवत नाहीत. ठाकरेंच्या बुडत्या तारुला हा तिनके का सहारा वाचवू शकेल, असा त्यांचाही समज आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना किमान शरद पवारांचा रिमोट चालायचा. आता पक्ष फुटल्यानंतर त्यांचीही बॅटरी डाऊन झालेली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी परीस्थिती. लोकसभा निवडणुकीपर्यंत हे मनोरंजन सुरू राहील ही अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा