मनसेकडून उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव अशी बातमी आज ‘सूत्रांच्या हवाल्या’ने चालवण्यात आली. हे सूत्रांचा हवाला देणारे तेच आहेत, ज्यांना गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील एकाही मोठ्या राजकीय घडामोडींचा थांगपत्ता नव्हता. मविआ जाणार हे कळले नाही, शिंदे-फडणवीस येणार हे कळले नाही, ना शिवसेनेतील फुटीची बातमी होती, ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्या म्हणजे पेरलेल्या आणि पुरवलेल्या बातम्याच असतात. परंतु जे काही दळणदळले जातेय त्याचा अर्थ एवढाच की, मविआची बोट कधी बुडणार हे लक्षात आल्यामुळे उद्धव ठाकरे आता पर्याय शोधतायत.
मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी आज शिउबाठाचे नेते प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. एवढ्याशा सुतावरून माध्यमांनी आज राज-उद्धव एकत्र येणार असा अर्थ काढत स्वर्ग गाठला. पानसे यांचे राऊतांशी जुने संबंध आहेत. राऊतांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमाचे दिग्दर्शन पानसे यांनीच केले होते. तेव्हाही पानसे मनसेत होते. सामनाच्या कार्यालयात पानसे यांची उठबस जुनी आहे. पानसे आज राऊत यांना भेटले. ही भेट वैयक्तिक कारणांसाठी होती, असे त्यांनी सांगितले. भेटीत मनसेच्या कोणत्याही प्रस्तावाबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले, तरीही चर्चा घडवण्यात आली. कारण तसे ठरले होते. राऊतांची भेट आटोपल्यानंतर पानसे शिवतीर्थवर गेले आणि संजय राऊत मातोश्री निवासस्थानी गेले. एवढ्या एका मुद्द्यावरून मनसे आणि शिउबाठा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.
दोन-चार दिवसांपूर्वी शिवाजी पार्क परीसरात राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असे आवाहन करणारे बॅनर लागले होते. ही बॅनरबाजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती, अशी चर्चा झाली. ही भावना तशी नवी नाही. राज ठाकरे शिवसेनेतून बाजूला झाल्यापासून अशा प्रकारचे आवाहन अनेकांनी अनेकदा केलेले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला झाल्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे आवाहन नव्याने करण्यात आले आहे. ही जी काही चर्चा सुरू आहे, ती पेरलेली आहे. शिउबाठाच्या नेत्याने ही चर्चा पेरली असण्याची शक्यता अजिबातच नाकारता येणार नाही. कारण कार्यकर्ते जेव्हा संभ्रमात आणि निराश असतात, तेव्हा अशा चर्चा घडवून त्यांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न होतोच. या मधाच्या बोटाची सध्या शिउबाठाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड गरज आहे. कारण राज यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. परंतु उद्धव यांनी बरेच गमावले असले तरी अजूनही बरेच शिल्लक आहे.
हे ही वाचा:
भारतासह पाच देशांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक; विकसित देशांच्या गुंतवणुकीत मात्र घट
एकनाथ शिंदेंबाबतच्या बातम्या पसरविणाऱ्यांचे मनसुबे उधळू!
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर गुप्तहेर असल्याचा संशय
‘वंदे भारत’च्या चढ्या तिकीटदराचा पुन्हा घेणार आढावा
दोन दिवसांपूर्वी शिउबाठाची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीत शिउबाठाने एकला चालो… अशी भूमिका घेऊन पुढे जावे असे सूचवले. विनायक राऊत यांच्या मनात हा विचार आला त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सुकाणूची भूमिका पार पाडत होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आणि ७५ टक्के पक्ष, पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आता जे काही उरले आहे, तो निव्वळ सांगाडा आहे. हा सांगाडा मविआच्या काहीच कामाचा नाही. शरद पवारांचे नेतृत्व या पुढे कितपत करिष्मा करू शकेल, याबाबत शिउबाठाच्या मनात असलेली साशंकता विनायक राऊत यांच्या तोंडून एकला चालो… या सूचनेच्या रुपात बाहेर पडली.
परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे टीम उरलेली नाही. एकट्याच्या बळावर पक्ष गाळातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही. याच आगतिकतेतून मनसे आणि शिउबाठाने एकत्र यावे असे पिल्लू सोडण्यात आले असावे. उद्धव ठाकरेंनी असा खरोखरच विचार केला असेल, तर राज यांच्यासोबत जाण्यासाठी ते मविआतून बाहेर पडणार आहेत का? हा सवाल आहेच. आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे शिंदे-फडणवीसांसोबत जातील अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरे यांच्याशी वारंवार भेटी होत असल्यामुळे या तिघांमध्ये काही तरी शिजतंय अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु अजित पवार आता शिंदे-फडणवीसांना सामील झाल्यामुळे सगळी गणितच बदललेली आहेत. या तीन पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. राज ठाकरे या तिघांसोबत जाणार की नाही हे अद्यापि त्यांनी स्पष्ट केले नसल्यामुळे शिउबाठाच्या बाजूने सूत्रांचे पिल्लू सोडून चाचपणी झालेली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव बाजूला झाले तेव्हा त्याचे खापर संजय राऊत यांच्यावर फोडण्यात आले होते. संतापलेल्या राज समर्थकांनी संजय राऊतांची गाडी फोडली होती. इतका संताप राऊतांबद्दल त्यावेळीही होता आणि आजही आहे. राजही त्याला अपवाद नाहीत. त्या संजय राऊतांकडे राज एकत्र येण्याचा प्रस्ताव पाठवतील याची सुतराम शक्यता नाही. उद्धव ठाकरेंबाबत राज यांच्या मनात फार ममत्व नसले तरी एकत्र यायचे असते तर त्यांनी थेट फोन करून विचारले असते. अखेर त्यांचे रक्ताचे नाते आहे, जुने ऋणानुबंध आहेत. परंतु मुळातच या सूत्रांच्या बातमीत काही दम नव्हता. स्वत: राज यांनीच हा खुलासा केलेला आहे. असा काहीही प्रस्ताव आपल्या बाजूने गेलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात महाराष्ट्राचे राजकारण इतक्या झपाट्याने रंग बदलते आहे की आज झाले नाही, ते उद्या होणारच नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. आज एकमेकांच्या उरावर बसलेले उद्या मिठ्या मारताना महाराष्ट्राने पाहिलेले आहे.
राजकारणातील युत्या आणि आघाड्या या फायद्यासाठीच होतात. नंतर त्यांना तत्वाचा किंवा विकासाच्या राजकारणाचा मुलामा दिला जातो. त्यामुळे राज आणि उद्धव हे दोन्ही नेते एकत्र येऊन त्यांना राजकीयदृष्ट्या काही फायदा होईल काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. लोकसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही. कारण शिंदे-फडणवीस-पवार एकत्र आल्यामुळे निर्माण झालेली ताकद मोठी आहे. मनुष्यबळ, साधन-सामुग्री आणि रणनीतीच्या बाबतीत त्यांना आव्हान देऊ शकेल अशी शक्ती आज तरी महाराष्ट्रात दिसत नाही.
लोकसभा निवडणूक असो हा विधानसभा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडतील अशी शक्यता कमी आहे. फक्त भाजपासोबत जायचे असेल तरच उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना सोडू शकतात. परंतु राज यांच्यासोबत जाण्यासाठी उद्धव या दोन मित्रांना सोडू शकत नाहीत. काँग्रेसशी आघाडी करून राज तोंड काळे करतील, अशी अजिबात शक्यता नाही. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार ही सूत्रांच्या हवाल्याने दिलेली एक बिनबुडाची आणि पेरलेली बातमी आहे. राज यांनीच या बातमीचे क्रियाकर्म केलेले आहे. मविआमध्ये आता काही दम राहिलेला नाही, एवढाच या बातमीचा मतितार्थ आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)