भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वैयक्तिक टीकेची राळ उडवली जाते. विरोधकांचे कट-कारस्थान टिपेला पोहोचलेले असते. फडणवीस या विखाराला मंद स्मित करत उत्तर देतात, तेव्हा राजकारणाच्या आखाड्यात काय काय होते याचा अनुभव गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राने अनेकदा घेतला आहे.
अंतरावलीचे पोप मनोज जरांगे गेले काही दिवस मेंदूवर पडल्यासारखे बोलतायत. फडणवीसांना लक्ष्य करतायत. पाचवी पास माणूस फडणवीसांचा एकेरी उल्लेख करतोय. जातीवरून टीका करतोय, तरीही फडणवीसांचे मंद स्मित ढळलेले नाही, याचच अर्थ तिसरा पेन ड्राईव्ह तयार ठेवून फडणवीस सज्ज आहेत.
गेल्या काही महिन्यात जातीवरून महाराष्ट्र पेटवण्याच्या कामाला काही लोक लागलेले आहे. हे लोक एका विशिष्ट जमातीचे आहेत. १९९९ पासून महाराष्ट्रात ब्रिगेडी नावाची ही जमात निर्माण झालेली आहे. मराठा आणि ब्राह्मणांच्या विरोधात विद्वेष बाळगणारी, तेढ वाढवणारी, आग लावणारी ही जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पवित्र नाव ही जात वारंवार घेते ते त्यांचे फंडे लोकांमध्ये रुजवण्यासाठी. हे फंडे ब्राह्मण द्वेषाचे, मुस्लीम आक्रमकांची भलामण करणारे आहेत. हे सांगतात की औरंगजेब धर्मवेडा नव्हता, अफजलखान हिंदू द्वेष्टा नव्हता, तो फक्त त्याचा मुलूख वाढवण्यासाठी महाराष्ट्रात आला होता, छत्रपती शिवरायांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लीम होते. हा पिवळा इतिहास महाराष्ट्राच्या गळ्यात मारणे हे या जमातीचे धंदे आहेत.
मनोज जरांगे हीच भाषा बोलत आहेत. फडणवीस ब्राह्मण असल्याचा जरांगेना प्रॉब्लेम असण्याचे कारण काय? बामणीकाव्याची भाषा ते कशाला करतात? मराठा आरक्षणाच्या त्यांच्या आंदोलनात मुस्लीमांचा सहभाग कसा? मुस्लीमांना आरक्षण मिळावे म्हणून जरांगे आवाज का उठवतात?
त्याचे एकमेव कारण म्हणजे जरांगे हे त्याच ब्रिगेडी जमातीचे आहेत. या जमातीचा पसारा महाराष्ट्रात ज्या डोलीवाल्या साहेबाने वाढवला जरांगे त्याचेच पिल्लू आहे. जरांगे साहेबांचे भक्त आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना शिव्या घालणारे जरांगे डोलीवाल्या साहेबांच्याविरोधात आजवर एक शब्दही बोललेले नाहीत.
देवेंद्र फडणवीस यांनी नेमके यावरच बोट ठेवले आहे. ‘जरांगे, पवार आणि ठाकरेंची स्क्रीप्ट बोलतायत’, असा स्पष्ट आरोप केला आहे. आशिष देशमुख आणि विजय वडेट्टीवार हे नेतेही नाव न घेता पवारांकडे बोट दाखवत आहेत.
‘जरांगेच्या पाठीशी कोण आहे, याची आपल्याला कल्पना असून योग्य वेळी ते बाहेर येईल’, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. हे विधान करताना फडणवीस यांच्या चेहऱ्यावर तेच मंद स्मित होते, जे मंद स्मित महाराष्ट्राच्या जनतेने राजकीय हाणामाऱ्यांच्या दरम्यान अनेकदा पाहिलेले आहे. हे स्मित किती भयंकर असते याचा अनुभव माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सरकारी वकील प्रवीण चव्हाण, उद्धव ठाकरे, अनिल परब यांनी घेतलेला आहे.
मविआची सत्ता असताना बदल्यांचा पेन ड्राईव्ह बाहेर आला. गिरीश महाजनांवर निशाणा साधून फडणवीसांचा गेम करण्याचे षडयंत्र शिजत होते, तेव्हा आणखी एक पेन ड्राईव्ह आला. मास्टर ब्लास्टर सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि फडणवीसांचा पेन ड्राईव्ह रोखण्याच्या पलिकडचा असतो.
जेव्हा फडणवीसांवर वैयक्तिक हल्ले होतात, तेव्हा फडणवीस त्याचे कसे उत्तर देतात ते नवाब मलिक यांनी अनुभवलेले आहे, शरद पवारांनीही अनुभवले आहे. मनोज जरांगे या नेत्यांपेक्षा मोठे आहेत का?
‘योग्य वेळी गोष्टी उघड होतील’ हे फडणवीसांचे विधान आरक्षणाचा आगडोंब पेटवून राजकीय पोळ्या शेकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ईशारा आहे. हे विधान यापूर्वी फडणवीसांनी केले आहे. ज्यांच्यासाठी यापूर्वी त्यांनी हे विधान केले होते, हे विधान ऐकल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पाठीच्या मणक्यातून थंड शिरशिरी आल्याचा भास झाला असणार.
काय होऊ शकते याचा अंदाज संजय राऊतांना आलेला आहे. ‘जरांगेंचे फोन टॅप करा, रश्मी शुक्लांना याचा अनुभव आहेच’, असे राऊत म्हणाले आहेत. राऊतांना न मागता सल्ला देण्याची सवय आहे. काय करावे, कसे करावे हे सल्ले त्यांनी उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांना गरज आहे. फडणवीसांना काही करण्यासाठी राऊतांच्या सल्ल्याची वाट पाहण्याचे कारण नाही.
अंतरावलीमध्ये संचारबंदी जारी करण्यात आली आहे. इंटरनेट बंद करण्यात आले आहे. एसटीची जाळपोळ करण्याच्या घटनांमुळे सरकारने ही उपाययोजना केली. जरांगेंच्या आततायीपणाचा फटका ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना बसतोय. एसटी बंद आहे, इंटरनेट बंद आहे.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये काँग्रेस खासदारांची संख्या झाली शून्य!
शाहजहान शेखला ताबडतोब अटक करा!
ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड
सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या जरांगेंना मागे फिरावे लागले. त्यानंतर जरांगे ज्या प्रकारे पिसाटले आहेत, त्यातून दोन शक्यता निर्माण होतात. एक तर डाव फसल्याची त्यांना जाणीव झालेली आहे, किंवा आपली मानगुट आता कुणाच्या तरी हाती गेलेली असल्याची त्यांना जाणीव झालेली आहे.
मराठा समाजातील काही लोक आता जरांगेंच्या विरोधात उघड आरोप करतात. मराठा आरक्षण हे जरांगेंचे लक्ष्य कधीच नव्हते. ते असते तर फक्त सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे आकडे ऐकून त्यांनी फडणवीसांनी मराठा समाजाच्या विकासासाठी दिलेले योगदान त्यांनी उघडपणे मान्य केले असते.
जरांगेंना मराठा समाजाच्या विकासाशी घेणे देणे नाही. ते फक्त मालकाच्या हुकमाचे ताबेदार आहेत. मालकाने घरगड्याला धू म्हटले की धुवावे लागते. जरांगे रात्री चोरून दुध-भात खातात का? कोण महिला त्यांचे पाय चेपते? कोणाला त्यांनी आमदारकीचे आश्वासन दिलेले आहे? या प्रश्नांमध्ये महाराष्ट्राला स्वारस्य नाही. त्यांना जातीचा वणवा पेटवण्याची सुपारी कोणी दिली, तेवढं मात्र उघड होऊ द्या.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)