24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयआमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकले...

आमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकले…

Google News Follow

Related

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि बुजर्ग नेते छगन भुजबळ यांची जुंपली होती, किंवा तसे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्दयामुळे मराठा समाज महायुतीपासून काही प्रमाणात दुरावला. ओबीसी समाजाच्या बाजूने भुजबळ खिंड लढवतायत असे चित्र निर्माण झाले होते. आता तेच भुजबळ घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. जरांगेंना कोणाचे आशीर्वाद आहेत हे उघडच आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांना सहानुभूती आहे, असे भुजबळ वारंवार का बोलत होते, याचाही उलगडा लवकच होण्याची शक्यता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाचे मसीहा, दोघेही मविआच्या बाजूने कललेले दिसतायत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान भुजबळांनी नाशिकमध्ये फारसे लक्ष दिले नाही. ते प्रचारातही उतरले नाहीत. उलट शरद पवारांना राज्यात सहानुभूती आहे, अशी विधाने करून ते महायुतीचे नुकसान करीत होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीची जी पडझड झाली त्यात हे घरचे भेदी कारणीभूत ठरले असण्याची शक्यता आहे.

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या चर्चेमुळे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. ते अजित पवारांची साथ सोडून एक तर उबाठा शिवसेनेत दाखल होतील किंवा स्वत:चा पक्ष काढतील, अशी चर्चा सध्या जोरात आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देणार नाही, असे शरद पवारांनी जाहीर विधान केलेले आहे. त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार नाहीत. परंतु भुजबळ उबाठा शिवसेनेत स्थिरस्थावर झाले तर शरद पवारांना आक्षेप असण्याचे काही कारण नाही. उलट अजित पवार कमजोर होत असल्यामुळे ते मदतच करतील. निवडणुका तोंडावर असल्यामुळे भुजबळ समता परीषदेचे रुपांतर राजकीय पक्षात करण्याची शक्यता मात्र अजिबातच नाही.

भुजबळ मात्र नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगतायत. मी कुठे म्हणालो की नाराज आहे? असे भुजबळांचे विधान आहे. राजकारणात नाराजी शब्दातून व्यक्त करायची नसते, ते काम समर्थकांचे. नेते मात्र कृतीतून दाखवत असतात. भुजबळांना दिल्लीत जाण्याची इच्छा होती. त्यांना नाशिकमधून लोकसभा लढवायची होती. त्यांनी तयारीही सुरू केली होती. परंतु शिवसेनेने विरोध केला. इथून हेमंत गोडसेसेंना उमेदवारी मिळाली. गोडेसे इथून लढले आणि पडले. राज्यसभा तरी मिळेल या आशेवर ते होते, तिथे सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्यामुळे भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेला ऊत आला. आता अजित पवार यांच्याकडे राज्यसभेची आणखी एक जागा आहे. त्यावर भुजबळांचा डोळा आहे. ती मिळेपर्यंत ते नाराजीची पिपाणी वाजवतायत, की आधीच काही निर्णय घेतात हे पाहावे लागले.

लोकसभा निवडणुकीत मविआचे बळ वाढल्यामुळे रंगल्या तोंडाचा मुका घेण्याची इच्छा बऱ्याच जणांना असणार. नाराजीची पुरेशी चर्चा घडवून भुजबळ बाहरे पडतील ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. राज्यात मुद्द्यावरून काय राजकारण आऱक्षणाच्या खेळले गेले लक्षात घ्या. या खेळात दोन्ही बाजूने उतरलेली माणसं शरद पवारांचीच होती. मनोज जरांगेंनी त्यांच्या आंदोलना दरम्यान वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणारी विधाने केली. मराठा आरक्षणाचे घनघोर विरोधक असलेल्या पवारांबद्दल मात्र एकही वावगा शब्द त्यांनी कधीही उच्चारला नाही. त्याचा फटका महायुतीला बसला.

आताही जरांगे ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार असा हट्ट धरतायत. असा हट्ट जो आजवर चार आयोगांनी नाकारलेला आहे. कारण त्यांना मुळात आरक्षण नकोच आहे, महायुती सरकारच्या डोक्याला ताप व्हावा तो वाढावा, मराठा समाज त्यांच्याविरोधात जावा इतका माफक त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे राज्यात मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देऊनही आंदोलन संपत नाही.

ओबीसी समाज आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसी आरक्षणला धक्का लागू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. याच मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी त्यांनी सरकारकडून लिखित हमी हवी आहे. भुजबळांनी त्यांचे समर्थन केले आहे. जरांगेंनी उपोषण केले तर त्यांना रेड कार्पेट मिळते. आमच्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी जाहीर नाराजी हाके यांनी व्यक्त केली आहे. ती सत्यही आहे. जरांगेंची भेट मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी घेतली, परंतु हाकेंच्या उपोषणाची कोणीही दखल घेतली जात नाही. मीडियाही त्यांना फार प्रसिद्धी देताना दिसत नाही. अर्थात राज्यात जो राजकीय सारीपाठ मांडण्यात आलेला आहे. मीडियाही त्याचा एक भाग आहे.

हे ही वाचा:

गोहत्येच्या संशयामुळे दोन गटात राडा!

गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!

पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले ५० लाख रुपये

राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात जे काही राजकीय नाट्य झाले त्यातले भुजबळ हे महत्वाचे पात्र आहे. ओबीसींचे मसिहा म्हणून मैदानात उतरले होते. जरांगेंच्या उर्मटपणाला ते तितक्याच उर्मटपणे उत्तर देत होते. त्यामुळे भुजबळांची लोकप्रियता ओबीसींमध्ये प्रचंड वाढला. आता गंमत अशी आहे, मराठा आरक्षणामुळे मसीहा पदाला प्राप्त झालेले मनोज जरांगे हे सुद्धा शरद पवारांचे परम चाहते आहेत. साहेबांच्या ऊर्जेमुळे प्रचंड भारावलेला त्यांचा चेहरा अवघ्या महाराष्ट्राने पाहीलेला आहे. त्यांचा कडाडून विरोध करणारे भुजबळ, ओबीसींचे मसीहा झाले. तेही लोकसभा निवडणुकी दरम्यान शरद पवारांना सहानुभूती असल्याची वक्तव्य करत होते. म्हणजे दोन्ही मसीहांना ओढ शरद पवारांचीच आहे. ओबीसी हा आमचा डीएनए आहे, असे असे म्हणणारे भाजपा नेत्यांच्या हाती मात्र हे राजकीय नाट्य मुकाटपणे पाहण्याच्या व्यक्तिरीक्त सध्याच्या घडीला तरी दुसरे काही दिसत नाही. सरकारने लक्ष्मण हाके यांच्या हाका ऐकण्याची आणि त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा