देशातील थोर दार्शनिक आणि विचारवंत राहुल गांधी यांनी सांगून ठेवलेले आहे. तपस्या का मतलब शरीर मे गर्मी पैदा
करना… या तपस्येसाठी ते अनेकदा बँकॉकचा दौरा करत असतात. अशीच तपस्या करण्यासाठी बॅंकॉकला रवाना
झालेल्या ऋषीराज सावंत यांना पित्याच्या अट्टहासामुळे हवेतून परतावे लागले. मुलाची तपस्या भंग केल्याचे पाप माजी मंत्री, शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या माथ्यावर आले आहे.
महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. अत्यंत नम्र वागण्या-बोलण्यामुळे ते कायम चर्चेत असायचे. त्यांच्या याच विनम्रतेमुळे बहुधा त्यांना महायुती-२ सरकारमधून खड्यासारखे वगळण्यात आले. मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गावी जाऊन त्यांची गाठभेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना भेट मिळाली नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सावंत दुखावल्याची चर्चा होती. नारळ मिळाल्यानंतर त्यांनी विनम्रपणे आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही हटवली. त्यानंतर ते चर्चेत आले, त्यांच्या सुपुत्रामुळे. कालपासून या प्रकरणाची चर्चा आहे.
तानाजी सावंत यांनी आपला मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण झाल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे नोंदवल्याचे वृत्त काल जेव्हा बाहेर आले तेव्हा सावंतांचा मुलगा शाळकरी असेल असे अनेकांना वाटले. लोक हळहळले. परंतु नंतर हाती आलेले वृत्त अगदीच विचित्र. कारच्या चालकाने पोलिसांना माहिती दिली की, ऋषीराज मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकला रवाना झाले आहेत. लोक बँकॉकमध्ये कशाला जातात हे सगळ्यांना ठाऊक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बँकॉकची इतकी जाहिरात केली आहे. की खरे तर थायलंड सरकारने त्यांना बँकॉकचे ब्रँड एम्बॅसिडर जाहीर करायला हवे.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे लक्षद्वीपला गेले होते तेव्हा लक्षद्वीप एक पर्यटनस्थळ म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. राहुल गांधी यांनी तेच काम बँकॉकसाठी केले आहे. ते सतत विपश्यना आणि तपस्येसाठी बँकॉकला जात असतात. ऋषीराजही बहुधा तपस्येसाठी बँकॉकला रवाना होत होते. त्यांनाही राहुल गांधी यांच्या प्रमाणे अंगात गर्मी निर्माण करणारी तपस्या करायची होती. पूर्वीच्या काळी अशी तपस्या उधळण्यासाठी इंद्रादी देवांना रंभा आणि मेनकांसारख्या अप्सरांचा आधार असायचा आता त्यांची गरज उरलेली नाही. तानाजी सावंत यांनी नेतेगिरीचा पुरेपूर वापर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मदत घेतली.
मुलगा ऋषीराज याचे चार्टर्ड विमान चेन्नईतच रोखण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत प्रवीण उपाध्याय, संदीप वासेकर हे दोन
मित्र होते. तो बँकॉकला फिरायला जात होता, अशी माहिती तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऋषीराज यांचे
बंधू गिरीराज यांनी मात्र तो बँकॉकला बिझनेस निमित्त जात होता, असे सांगितले आहे. अर्थात बँकॉक वारीचे नेमके कारण
काय, याबाबत ऋषीराजचे बंधू आणि पिता दोघेही गोंधळलेले आहेत. तपस्या हेच कारण असावे, ते ऋषीराज यांनी आपल्या
विनम्र पित्याला कळवले नसावे. परंतु राजकारणी पित्याला सूत्रांकडून त्याची माहीती मिळाल्यामुळे सुरू होण्याआधीच
ऋषीराजची तपस्या भंग झाली.
हे ही वाचा:
मुस्लिम जमावाकडून तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तक विक्री स्टॉलची तोडफोड
तंत्रज्ञान नोकऱ्या हिसकावून घेत नाही, रोजगाराचे स्वरूप बदलते
भांडूप-मुलुंड लिंक रोडवरील मशिदींच्या भोंग्यांच्या मोठ्या आवाजामुळे होतंय प्रदूषण!
यावर्षीचा भोपळा मागच्या भोपळ्यापेक्षा वेगळा
ज्या चार्टर्ड विमानाने ऋषीराज दोन मित्रांसह फिरायला, किंवा बिझनेससाठी किंवा तपस्येसाठी जात होता, त्यासाठी त्याने
फक्त ६८ लाख रुपये खर्च केले, अशी माहीती काही माध्यमांनी पुरवलेली आहे. या व्यवसायात असलेल्या लोकांनी या रकमेची पुष्ठी केली आहे. बँकॉकला चार्टर्ड विमानाने जायचे असेल तर येता जाता, त्याचा खर्च सुमारे ७० लाखाच्या
आसपास असतो. त्यात वेटींग चार्जेसचा समावेश असतो. कोणाला असे वाटू शकेल की तानाजी सावंत हे मंत्री होते.
त्याच काळात मुलगा चार्टर्ड विमानाने फिरेल, एवढे उद्योग त्यांनी आरोग्य मंत्रालयात केले, अस कुणाला वाटू शकेल, परंतु
त्यात तथ्य नसावे असे आम्हाला पाठवले. सावंत हे उद्योजक आहेत. राजकारणात ते केवळ विनम्रपणे काम करण्यासाठीच
आले आहेत. त्यांचे उद्योग पुढे नेण्यासाठी त्यांचे चिरंजीव चार्टर्ड विमानाने जगभरात फिरत असतात. तेही मित्रांसोबत.
काही दिवसांपूर्वी ते असेच दुबईला जाऊन आले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला इकॉनॉमी
क्लास अर्थात कॅटल क्लासने जातात, अशी एक बातमी आली होती. फडणवीसांनी सुद्धा तानाजी सावंत यांच्यासारखे उद्योग
सुरू केले पाहिजेत, जेणे करून ते सुद्धा चार्टर्ड विमानाने फिरू शकतील.
मुलाने तपस्येसाठी म्हणा, उद्योगासाठी म्हणा… बँकॉकपर्यंत जाऊ नये. जे काही उद्योग आणि तपस्या आहे, ती महाराष्ट्रातच करावी अशी तानाजी सावंत यांची इच्छा असावी. त्यातूनच ऋषीराज यांची तपस्या सुरू होण्यापूर्वीच उधळली
गेली. बँकॉक पेक्षा चांगली तपस्या कुंभमेळ्यात होऊ शकली असती, तिथे सध्या हिमालयातील भरपूर तपस्वी आलेले आहेत. परंतु हा पर्याय त्यांना सुचलाच नसावा. त्यापेक्षा चार्टर्ड विमानाचे ६८ लाख वाया गेल्याचे दु:ख आम्हाला जास्त आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)