28.4 C
Mumbai
Thursday, April 17, 2025
घरसंपादकीयचिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

राम प्रधान यांच्या मुलाखतीने केले सगळे उघड

Google News Follow

Related

गेली १७ वर्ष ज्या खतरनाक दहशतवाद्याचा ताबा घेण्यासाठी भारत प्रयत्न करतोय तो क्षण अखेर काल गुरुवारी आला. २६/११ रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वरू हुसेन राणा याची अमेरिकेतून भारतात पाठवणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेला शब्द पाळला. राणा भारतात आल्यानंतर देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी लगेच नसलेल्या मिशांना पिळ देऊन हे श्रेय आमचेचे असा दावा केला.

बथ्थड डोक्याच्या माणसाचाही यावर विश्वास बसणार नाही कारण, यूपीएच्या काळात देशात जेव्हा दहशतवाद्यांचे तांडव सुरू होते, सरकारच्या रडारवर दहशतवादी नव्हतेच. सगळ्या तोफा भाजपाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात वळवण्यात आल्या होत्या. २६/११ च्या षडयंत्राचा उलगडा करेल असा एक अत्यंत महत्वाचा पुरावा स्वत: चिदंबरम यांनी नष्ट केला होता. दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया आमच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती, असा दावा चिदंबरम करू शकतात, कारण काँग्रेसच्या नेत्यांची कातडी गेंड्यालाही लाज वाटावी इतकी निबर असते. अमेरिकी न्यायालयाने २०११ मध्ये २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणातून राणाला निर्दोष
ठरवल्यानंतर यूपीए सरकारला जाग आली. त्यानंतर अमेरिकेकडे तहव्वूर राणाचे हस्तांतरण करण्याची मागणी करण्यात आली. कारण नाईलाज होता. सगळ्या जगात बोंब झाली होती. हे केले नसते तर थोबाड आणखी काळे झाले असते.

चिदंबरम तहव्वरूच्या अटकेचे श्रेय घ्यायला पुढे आले आहेत, मग हल्ल्याचे श्रेय कोणी घ्यायचे? २६/११ चा हल्ला काँग्रेसच्या नपुंसक धोरणामुळे घडला होता. देशभरात बॉम्बस्फोट होत होते, असा तो काळ होता. मुंबईत रेल्वे, बस सगळीकडे स्फोटांचा सिलसिला सुरू होता. घरातून सकाळी कामधंद्यासाठी बाहेर गेलेला माणूस परतेल की नाही, अशी शंका प्रत्येक आईला, प्रत्येक पत्नीला असायची. देशात भयाचे वातावरण होते. हे अशासाठी घडत होते कारण सरकार सोनिया गांधी यांच्या तालावर नाचत होते. त्यांना मतपेढी मजबूत करायची होती. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यात दहशतवादी बाजूला राहिले, तपास यंत्रणांच्या रडारवर हिंदुत्ववादी संघटना आल्या. सीबीआय, एनआयए, एटीएस सगळेच त्यांच्या मागे लागले. हिंदुत्ववाद्यांना एकदा का संपवले की मुस्लीम मतपेढीच्या आधारावर अनंतकाळ देशावर राज्य करायचे असा गेम प्लान होता.

पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह, पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, अहमद पटेल असे सगळे नेते यात सामील होते. सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास निष्कंटक करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू होता. गुजरातमध्ये कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख याच्या एन्काऊंटर प्रकरणाचा वापर करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी
यांचा काटा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपा नेते अमित शाह यांना झालेली अटक त्याच दिशेने केलेली कारवाई होती. नरेंद्र मोदींना संपवण्याचे प्रयत्न का सुरू होते, याचे उत्तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतून देशाला मिळाले.

महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांचा वेळ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, स्वामी असीमानंद यांना गुंतवण्यात जात होता. दहशतवाद्यांना मिठ्या मारण्यात नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. दिग्विजय सिंह डॉ झाकीर नाईक नावाच्या मनोरुग्ण जिहादीवर मेहरबान झाले होते. स्वत: सोनिया गांधी बाटला हाऊस एन्काऊंटर नंतर दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळत होत्या. इथे शरद पवार इशरत जहाच्या नावाने गळा काढत होते. हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना ठार करणारा दहशतवादी यासिन मलिक २००६ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पंतप्रधान निवासात भेटला. त्याच्यासाठी लाल गालिचे पसरण्यात आले होते. त्यानंतर फक्त दोन वर्षांनी २६/११ घडले. पाकिस्तानने हे धाडस केले त्याचे कारण यूपीए सरकारचे नपुंसक धोरण त्यांना ठाऊक होते.

काँग्रेसची कातडी किती निबर होती, हे २६/११ च्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते नेमके काय करत होते पाहा. केंद्रीय गृहमंत्री पदावर त्यावेळी शिवराज पाटील होते. हल्ल्याच्या दिवशी शिवराज पाटलांचे बाईट घेताना मीडियाच्या लक्षात आले की प्रत्येक बाईटसाठी हे महाशय नवा सूट घालून येतायत. देशावर इतके मोठे संकट असताना हे गृहस्थ चमकोगिरीत व्यस्त होते, कपडे बदलण्यात यांचा वेळ वाया घालवत होते. जनतेच प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. शिवराज पाटील यांची हकालपट्टी झाली आणि त्यांच्या जागी चिदंबरम आले. महाराष्ट्राचे हसतमुख मुख्यमंत्री विलासराव देशमुख या हल्ल्यानंतर सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मा याच्या सोबत ताजमध्ये गेले होते. प्रचंड गदारोळ माजला. देश या हल्ल्यात बळी पडलेल्या १६६ निरापराधांसाठी हळहळत असताना विलासराव या विषयावर सिनेमा कसा बनेल या चिंतेत होते. त्यांनाही जनक्षोभामुळे राजीनामा द्यावा लागला. पुढे याच दिग्दर्शकाने २६/११वर सिनेमाही काढला. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटलांना त्यांची हिंदीतली डायलॉगबाजी नडली. तेही पदावरून गेले. एका पेक्षा एक सरस. एकाला झाकावे, दुसऱ्याला काढावे.

तहव्वरूच्या अटकेमुळे काही प्रश्नांवर पडदा उठणार आहे. द हिंदू या वृत्तपत्रात २०२१ मध्ये निवृत्त गृहसचिव राम प्रधान यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. वरिष्ठ पत्रकार प्रियांका काकोडकर यांनी ही मुलाखत घेतलेली ही मुलाखत खळबळजनक होती. चिदंबरम यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण करणारी होती. २६/११ च्या हल्ल्यानंतर राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष म्हणून एक अत्यंत महत्वाची माहिती प्रधान यांनी तत्कालिन गृहमंत्री पी.चिदंबरम यांना दिली होती. यावर तातडीने कारवाई करण्याची गरज होती. झटपट पाऊल उचलण्यात आले असते तर एक मोठा मासा, कदाचित लांडग्यांचा एक कळपच, तपास यंत्रणांच्या हाती आला असता. एक स्लीपर सेल उद्ध्वस्त झाले असते. या षडयंत्रात सामील असलेल्या अनेकांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम झाला असता. परंतु तो व्हावा ही बहुधा चिदंबरम यांची इच्छा नसावी.

हे ही वाचा:

“कॅप्टन की रन मशीन?”

आयपीएलच्या इतिहासात रचला “विराट” विक्रम

शेख हसिनांसह मुलगी आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी!

‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!

हा हल्ला झाला तेव्हा मुंबईत असलेला एक पाकिस्तानी हस्तक हल्लेखोरांना मदत करत होता, असा दावा प्रधान यांनी केला होता. ही केवळ शंका नव्हती. आपला दावा सिद्ध करणारे पुरावेही त्यांनी चिदंबरम यांना दिले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करून हे प्रकरण तात्काळ खणून काढायला हवे, असे प्रधान यांनी चिदंबरम यांना सांगितले होते. मी दिलेली माहिती पुरेशी होती. परंतु चिदंबरम यांनी काहीही हालचाल केली नाही. एका बाजूला महाराष्ट्र सरकार या अहवालाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचा दावा करत असताना हा दावा खोटा असल्याचे प्रधान यांनी या मुलाखतीत उघड केले. या संदर्भात तपास करताना केंद्रीय तपास यंत्रणांनी आपल्याला निराश केले. सातत्याने पाठपुरावा करून आम्हाला माहिती देण्यात आली नाही, असे अनेक धक्कादायक दावे त्यांनी या मुलाखतीत केले आहेत.

चिदंबरम आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारचे पितळ उघडे पाडण्यासाठी ही एक मुलाखतच पुरेशी आहे. चिदंबरम यांनी एका महत्वाच्या पुराव्याकडे दुर्लक्ष केले. तहव्वूर राणा हाती येण्यापूर्वी २६/११ च्या हल्ल्याचा तपशील कदाचित प्रधान
ज्याच्याकडे बोट दाखवत होते, त्या पाकिस्तानी हस्तकाकडून मिळू शकला असता. परंतु चिदंबरम यांना बहुधा हे नको होते. कारण कदाचित ते काँग्रेसच्या तत्कालीन राजकीय एजेंड्यासाठी सोयीचे नसावे. कोण होता तो हस्तक? सरकारी अधिकारी होता की राजकीय पक्षाचा नेता? की एका विशिष्ट धर्माचा कट्टरवादी? चिदंबरम यांना त्याला पकडण्यात का रस
नव्हता? कि चिदंबरम यांच्या राजकीय बॉसेसना त्याची अटक नको होती? असे अनेक सवाल आहेत, त्याची उत्तरे चिदंबरमच देऊ शकतात.

तहव्वूर भारतात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केले आहे, ते म्हणतात कसाबला जशी बचावाची संधी मिळाली तशी ती तहव्वूर राणालाही मिळावी. काँग्रेस नेत्यांचे मन असे कायम दहशतवाद्यांसाठी हळहळत
असते, कधी अफजल गुरू कधी, बुरहान वाणी, कधी, याकूब मेमन, कधी तहव्वूर राणा. देशाच्या जनतेने यांची जोड्यानेच पूजा केली पाहिजे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा