मनोहर जोशी नावाचा ‘कोहिनूर’

मनोहर जोशी नावाचा ‘कोहिनूर’

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. नगरसेवक, शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते लोकसभेचे सभापती अशी मजल मारणारा धुरंधर नेता काळाच्या पडद्याआड गेला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या निष्ठा ठाकरे परिवाराशी राहिल्या. उतारवयात उद्धव ठाकरे यांनी केलेला अपमान त्यांनी गिळला. मोठ्या मनाने उद्धव यांना माफ केले. महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवशाहीचे सरकार आले. शिवसेना-भाजपा युती पहिल्यांदा सत्तेवर आली. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठरल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. पक्षाचा नेता स्वत: पद न स्वीकारता पक्षातील एका नेत्याला मुख्यमंत्री पद सोपवतो हे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. या कृतीमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मोठी झाली.

मनोहर जोशी यांच्या कारकीर्दीत एनरॉन कंपनीचा वीज प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातला होता. कंपनीच्या सीईओ रीबेका मार्क यांची मनोहर जोशी यांच्याशी भेट ठरली होती. दिलेली वेळ मार्कबाईंनी पाळली नसल्यामुळे जोशींनी त्यांची भेट रद्द केली. मार्कबाई मातोश्रीवर बाळासाहेबांशी चर्चा करीत असल्यामुळे त्यांना पोहोचायला उशीर झाला होता. मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा आब राखण्यासाठी बैठक रद्द केली, परंतु शिवसेना प्रमुखापर्यंत हा विषय वेगळ्या प्रकारे पोहोचवण्यात आला. खप्पा मर्जी झाल्यामुळे राज्यपालांकडे जाऊन राजीनामा द्या आणि नंतर भेटायला या निरोपाचे शिवसेनाप्रमुखांचे पत्र मनोहर जोशींकडे रवाना झाले. मुख्यमंत्री पदाचा आब सांभाळणाऱ्या मनोहर जोशींनी पक्ष नेत्याची मर्जी आणि पक्षाची निष्ठाही सांभाळली. तातडीने आदेशाची अंमलबजावणी करीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मनोहर जोशींचे विरोधी पक्ष नेते पदही असेच अचानक गेले होते. नव्वदच्या दशकात शिवसेनेत छगन भुजबळ विरुद्ध मनोहर जोशी असा सुप्त संघर्ष होता. शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे भुजबळ दुखावले गेले होते. सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवार आणि मनोहर जोशींचे उत्तम संबंध होते. अनेकदा मनोहर जोशी शरद पवारांच्यासोबत जातील अशी वावड्या उठत होत्या. परंतु १९९१ मध्ये पवारांनी नाराज भुजबळांना गळाला लावले. भुजबळ शिवसेनेच्या आमदारांचा एक गट घेऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे शिवसेनेचे संख्या बळ घटले. भाजपाने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला. मनोहर जोशींचे विरोधी पक्ष नेते पद गेले. शिवसेनाप्रमुखांचा या घटनेमुळे इतका संताप झाला होता की त्यांनी सामनामध्ये अग्रलेख छापला, त्याचे शीर्षक भाजपाचा मुंडा असे होते.
शिवसेनेत मनोहर जोशींनी अनेक उतार चढाव पाहिले, परंतु त्यांनी कधी बाजू बदलली नाही.

या निष्ठेचे बक्षीसही त्यांना मिळाले. लोकसभेचे तिकीट मिळाले. अटलबिहारी वाजपेयी यांचे केंद्रात सरकार असताना लोकसभेचे सभापतीपदही मिळाले. सभागृहाचे वातावरण हलके-फुलके ठेवत त्यांनी ही जबाबदारी लीलया पेलली. अनेकदा ते रामदास आठवले यांचा अचूक वापर करत, त्यांना भाषणाची संधी देत. आठवले यांचे भाषण आणि भाषणातील कविता सुरू झाल्या की सभागृहाचे वातावरण कितीही तापलेले असले तरी ते आपोआप निवळत असे. आठवलेंच्या कवितांची उपयुक्तता मनोहर जोशी यांनीच सर्वप्रथम अधोरेखित केली. नवी दिल्लीत त्यांच्या वावरण्यात नवखेपणा अजिबात जाणवत नव्हता. दिल्लीत त्यांनी स्वत:चा ठसा निर्माण केला.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या तारखा १३ मार्चनंतर जाहीर होण्याची शक्यता

जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळतोय

संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!

चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनची ऐतिहासिक कामगिरी!

शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मुख्यमंत्री पद दिले, मोठे केले. परंतु हे पद काढून घेतल्यानंतरही त्यांची निष्ठा अढळ राहिल्यामुळे ते कायम शिवसेनाप्रमुखांचे विश्वासू राहिले. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना कधीही अंतर दिले नाही. मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, वामनराव महाडीक, लीलाधर डाके, सुधीर जोशी आदी वरीष्ठ नेत्यांना शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना नेतेपद बहाल केले होते. त्यांचे हे नेतेपद तहहयात राहावे ही शिवसेनाप्रमुखांची ईच्छा होती. या नेत्यांच्या योगदानामुळे शिवसेनेत अखेरपर्यंत त्यांचा मान राहावा ही भूमिका त्या मागे होती.

शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना मोडीत काढण्याचे धोरण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले. शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या व्यासपीठावरून मनोहर जोशींना खाली उतरवण्यात आले. त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाली. हे उद्धव ठाकरेंनी ठरवून घडवले असा आरोप झाला. काही शिवसैनिकांना मनोहर जोशी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्याचे निरोप आदल्या दिवशीच गेले होते. सगळी पटकथा आधीच तयार होती. वास्तविक मनोहर जोशींचे वय झाले होते. ते सक्रीय राजकारणातून बाजूला झाले होते. कोणाच्याही स्पर्धेत नव्हते. कोणालाही उपद्रव करण्या इतपत क्षमताही त्यांच्याकडे नव्हती. ठाकरे कुटुंबियांवर त्यांची निष्ठा पातळ झालेली नव्हती. तरीही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. हा अपमान झाल्यानंतर ठाकरे परिवाराबाबत त्यांच्या तोंडून वावगे बोल निघाले नाहीत.

एका वर्तमान पत्राच्या जाहीर कार्यक्रमात मनोहर जोशी या विषयावर सविस्तर बोलले होते…ते म्हणाले होते की, “१९९९ साली अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? १९९५ साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली.  बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहे. तथापि, वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यात गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो.”

अपमान गिळण्यासाठी, अपमान करणाऱ्याला माफ करण्यासाठी मोठं मन लागतं. मनोहर जोशींकडे तेवढे मोठे मन होते. शिवसेनेचा फायदा घेऊन त्यांनी गडगंज पैसा उभा केला. गाव तिथे शाखा ही शिवसेनेची टॅग लाईन होती. शाखा तिथे कोहीनूर, ही टॅगलाईन मनोहर जोशींच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या बदनामीसाठी वापरली. टिकेकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांचा गुण होता. समोरच्याला नामोहरम करण्यासाठी त्यांनी उपाहास, कोपरखळ्या हीच शस्त्र वापरली. परंतु कोणाचा दुस्वास केला नाही.

मराठी तरुणांनी श्रीमंत झाले पाहिजे, असे मत त्यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केले. ते यशस्वी राजकारणी होते, तसे यशस्वी उद्योजकही होते. शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशींना मोठे केले. त्यांना भरभरून दिले. पक्षात मोठी झालेली माणसं ही पक्षाचे भांडवल असते. त्यांच्या मोठेपणाचा, गुणांचा वापर पक्षाच्या वाढीसाठी करायचा असतो, हे उद्धव यांना कधी जमले नाही. त्यांनी कायम मनोहर जोशींचा दुस्वास केला. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना पुन्हा आणण्यासाठी जोशींनी प्रयत्न केले. उद्धव आणि राज एकत्र यावेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती.

संकटाच्या काळातही मनोहर जोशी शिवसेनेसोबत राहिले, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु मनोहर जोशी गेल्यानंतर ही उपरती झालेली आहे. हयात असताना जर मनोहर जोशींना उद्धव ठाकरे यांनी जपले असते तर कदाचित त्यांना बळ मिळाले असते. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे अनेक नेते, कार्यकर्ते आज एकेककरून सोडून गेलेत. मनोहर जोशी यांच्या रूपातील ‘कोहिनूर’ही आता निघून गेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version