पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

देशात २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आली. २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. २०२४ मध्ये त्यांची हॅट्रीक होणार अशी शक्यता आहे. भाजपाची आगेकूच सुरू आहे. एण्टी इंकम्बन्सी भाजपाला शिवताना दिसत नाही. विरोधकांकडे याचे एकच उत्तर आहे. ‘ईव्हीएम हॅक करून भाजपा सत्ता मिळवते आहे’. एखाद्या गोष्टीचे आकलन चुकीचे असेल तर त्यातून काढण्यात येणारा निष्कर्ष बरोबर कसा असू शकेल? नेमकं काय हॅक होतेय, याचा विरोधकांना अंदाजच येत नाही. यावेळी भाजपाने ४०० चा आकडा पार केला तर फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अलिकडे झालेल्या पाच विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये घसघशीत विजय मिळाला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार याबाबत आता कुणाच्या मनात शंका उरलेली नाही. महायुती सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, अब की बार ४०० पार.

सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात महायुतीला जेमतेम १९ ते २० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात असताना, महायुतीच्या नेत्यांना अजिबात टेन्शन नाही. ते ४८ पैकी किमान ४० जागा मिळवतील असा दावा करतायत. हा विश्वास हवेतून आलेला नाही.

जनता मोदी सरकारच्या पाठीशी का उभी आहे. याची कारणे अनेक आहेत. काँग्रेसचे शासन असलेल्या सहा दशकांच्या काळात घडल्या नाहीत अशा अनेक गोष्टी गेल्या दहा वर्षांच्या काळात घडलेल्या दिसतात. यामध्ये देशातील गोरगरिबाचे जीवनमान उंचावण्यासाठी युद्धपातळीवर काम झाले. महिला कल्याणाच्या योजना मिशन म्हणून राबवण्यात आल्या. माध्यमांना आज याची दखल घ्यावी लागते आहे. दै. लोकमत हे काही भाजपा धार्जिणे वर्तमानपत्र नाही. आज लोकमतमध्ये केंद्र सरकारने महिलांच्या डोक्यावरून पाण्याचा हंडा उतरवला… असा मथळा असलेली बातमी आहे. ईव्हीएम का हॅक होतायत, त्याची छोटीशी झलक या बातमीत आहे.

२०१९ मध्ये ग्रामीण भागातील १६.८१ टक्के घरात पाण्याचे नळ होते. केंद्र सरकारने ‘हर घर जल’ या योजनेद्वारे घरा घरात नळाद्वारे पाणी पोचवण्याचा प्रयत्न केला. सरकारचा इरादा पक्का असेल तर योजना अपयशी होण्याचे कारणच नसते. मोठ्या प्रमाणात काम झाले. आज अशी परीस्थिती आहे की ग्रामीण भागातील ७२.२९ टक्के घरांमध्ये नळ जोडण्या आल्या आहेत. गेल्या पाच वर्षात नळ जोडण्याची संख्या चौपट झाली आहे. ग्रामीण भागातील एकूण १९ कोटी २५ लाख घरांपैकी १३ कोटी ९१ लाख घरांमध्ये नळातून पाणी येतेय. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत घरांची संख्या फक्त ३ कोटी २३ लाख होती. किती मोठं काम गेल्या पाच वर्षात झालंय याची कल्पना करा. घरात पाणी आणण्यासाठी ज्या महीलांना मैलोन मैल पायपीट करावी लागायची, डोक्यावर पाण्याचे हंडे आणावे लागायचे, त्या महीलांचे किती कष्ट वाचले असतील.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर राबवलेल्या योजनांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की महिलांचे आयुष्य थोडे सुखावह होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उज्वला योजना, घरोघरी शौचालय, पक्के घरं, हर घर जल, प्रत्येक घरात वीज, जनधन योजना. या सगळ्या योजनांचा मोठा फायदा महिलांना झालेला आहे. त्यांच्या आयुष्याचा स्तर उंचावला आहे. त्यांचे कष्ट कमी झालेले आहेत.

देश स्वतंत्र झाल्यानंतर महिलांना शौचासाठी बाहेर जावे लागावे, याची खंत वाटणारा एक पंतप्रधान यायला २०१४ साल उजाडावे लागले. हा प्रश्न फक्त स्वच्छतेशी संबंधित नसून महिलांच्या स्वाभिमानाशी संबंधित आहे, याचा पूर्वी किती जणांनी विचार केला असेल? विचार झाला असेल तर ही कमतरता दूर करण्यासाठी किती जणांनी पावले उचलली? चुली फुंकून महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते आहे, स्वच्छ पाणी घरोघरी उपलब्ध व्हायला हवे, याचा विचार करणारा नेता देशाला मिळाला. योजना कदाचित कालही असतील. परंतु, त्या कागदावर होत्या. आज त्या प्रत्यक्षात आलेल्या पाहायला मिळतात. महाराष्ट्रात नळाद्वारे घरी पाणी मिळते अशा घरांचा टक्का ८२.६४ झाला आहे. आता कल्पना करा, उद्या जेव्हा लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा केंद्र सरकारच्या योजनांमुळे सुखावलेल्या महिला कोणाला मतदान करतील?

मध्य प्रदेशात भाजपाला मिळालेल्या यशात लाडली बहना या योजनेचा वाटा मोठा होता. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे देशातील जनतेमध्ये सरकारबद्दल सकारात्मक असा सुप्त प्रवाह आहे. ज्याचा अंदाज देशात सर्व्हेक्षण करणाऱ्या एकाही एजन्सीला येत नाही. प्रत्यक्षात जेव्हा मतदान होते तेव्हा महिला घराबाहेर पडून मतांचे दान भाजपाच्या पारड्यात भरभरून टाकतात.

मध्य प्रदेशात भाजपाला समर्थन करणाऱ्या एका महिलेला तिच्या घरच्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. राज्यात मिळालेल्या भव्य विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह त्या महिलेला जाऊन भेटले. ही घटना बोलकी आहे. एखादी महिला मुस्लीम असली, घरच्यांचा भाजपाला विरोध असला, भाजपाचा विरोध करण्याचा त्या महीलेवर दबाव असला तरी तो दबाव झुगारून देण्याची मानसिकता या महिलांनी बनवलेली आहे. देशातला मुस्लीम समाज हा भाजपाचा मतदार नाही. परंतु मुस्लीम महिलांचे मत भाजपाबाबत अनुकूल दिसते. कारण, त्या या परिवर्तनाच्या साक्षी आहेत, योजनांच्या लाभार्थी आहेत. ज्या महिलेला हक्काचे पक्के घर मिळाले, तिच्यासाठी मोदी हा देवच आहे. फेसबुक आणि ट्वीटरवर किंवा माध्यमांसमोर गरळ ओकणाऱ्या लिब्रांडूंच्या मताला तिच्या लेखी काय किंमत असणार?

हे ही वाचा:

बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

आग्र्याची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!

रोज सकाळी उठून माध्यमांच्या बूम आणि कॅमेरासमोर पिटपिट करणाऱ्या नेत्यांना हा अंडर करंट जाणवत नाही कारण त्यांनी डोळ्यावर भाजपाद्वेषाच्या पट्ट्या बांधल्या आहेत. मग ते काँग्रेस नेते राहुल गांधी असो, विश्व प्रवक्ते संजय राऊत असो वा पक्ष प्रमुख उदधव ठाकरे. अलिकडे त्यांच्याच पक्षातले लोक या नेत्यांची लाज काढू लागले आहेत. मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते लक्ष्मण सिंह जे दिग्विजय सिंह यांचे बंधू आहेत, त्यांनी राहुल गांधी हे काही मोठे नेते नाहीत, अशा प्रकारचे विधान केले आहे.

प्रत्येक निवडणुकीत विरोधी दलांचे नेते जेव्हा पंतप्रधान मोदींचे अर्वाच्च शब्दात वाभाडे काढतात तेव्हा त्याचा नेमका उलट परिणाम होतो. लोकांची सहानुभूती भाजपाला मिळते. मोदींचे काम विरोधकांना दिसत नाही, अशातला भाग नाही, पण ते स्वीकारले तरी मरण आणि नाही स्वीकारले तरी मरण अशी त्यांची परीस्थिती झालेली आहे. ईव्हीएम हॅकची ढाल पुढे करण्याशिवाय विरोधकांकडे तोंड लपवण्याचा दुसरा पर्यायच नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version