श्रीराम सेनेतील महाबलींनी रावणच्या साम्राज्याचा नि:पात केला, लंका उद्ध्वस्त केली. परंतु बिभिषण नसता तर रावणाचा सर्वनाश होऊ शकला नसता. रावणाचा अंत शक्य नसता. तिथे फक्त एक बिभीषण होता, उबाठा शिवसेनेत तर डझनभर बिभीषण बाहेर पडले आहेत. नीलम गोऱ्हे, किशोर तिवारी रोज उद्धव ठाकरेंचे नवनवे प्रताप लोकांसमोर आणतायत. मर्सिडीजनंतर आता रोलेक्सची घड्याळे, डायमंडचे नेकलेस बाहेर पडतायत. कालपर्यंत जी फक्त कुजबुज होती, तिचा आता गलका झालेला दिसतो. इथे प्रश्न हा निर्माण होतो, झाकली मूठ ठेवणे जर शरद पवारांना जमू शकते तर ते ठाकरेंना का जमलेले नाही.
मविआच्या सत्ताकाळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जेष्ठ नेते शरद पवार एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सत्ता गेल्यानंतरही सतत होणाऱ्या बैठका, वाटाघाटीनिमित्त दोन्ही नेत्यांची अनेकदा चर्चा होत होती. इतका काळ जवळ राहून सुद्धा ठाकरे यांना पवारांकडून काही शिकता आले नाही. मूठ झाकली ठेवणे जमले नाही. त्यामुळे कधीकाळी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांकडून कपडे फाडून घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
बिभिषण किती उत्पात निर्माण करू शकतात, हे समजणारे शहाणे नेते त्याच्या नादाला कधी लागत नाहीत. प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे अनेक वर्षे भाजपामध्ये होते, पक्षाने मंत्रिपद दिले नाही, ही सल असल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांवर धोरणांवर सडकून टीका करायचे. इतकी टीका केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी एका शब्दाने त्यांना कधी उत्तर दिले नाही. ना भाजपाच्या कोणत्या नेत्याने त्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. आज बोलून बोलून सिन्हा शांत झाले आहेत.
खासदारकी टिकवण्यासाठी सिन्हा यांनी टर्म संपेपर्यंत पक्ष सोडला नाही. पक्षात राहून ते पक्षाला हाणत राहिले. उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी सध्या तेच करतायत. फरक एवढाच आहे की त्यांना पक्षाने हाकलले असताना आजही मी ठाकरेंसोबत आहे, असे म्हणत ते रोज ठाकरेंची नवी कुलंगडी बाहेर काढतायत. ‘उबाठा शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळते’, हे विधान विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे लोकांना माहीत नव्हते असे नाही, कुजबुज होतीच. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झालेले नव्हते. गोऱ्हे यांच्या गौप्यस्फोटानंतर खोके, खोके म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांच्या विरोधात ओरडणाऱ्या लोकांचे चेहरे उघड झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र स्वीकारल्यानंतर पक्षात पैशाचे महत्व प्रचंड वाढले. पदांचा आणि निवडणुकीच्या काळात तिकिटांचा बाजार सुरू झाला. पैशासाठी सत्ता राबवायची हेच सूत्र बनले. ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर, त्यांचे बळ आटल्यानंतर, या पक्षाला अभूतपूर्व अशी ओहोटी लागल्यानंतर ही चर्चा आवश्यक आहे का? असा सवाल कोणी करू शकेल. परंतु ही चर्चा आवश्यक आहे. फळा-फुलांनी बहरलेले झाड अचानक वठायला कसे लागते? १९९५, २०१९ मध्ये महाराष्ट्राला ज्यांनी मुख्यमंत्री दिला, तो पक्ष महाराष्ट्रात शेवटून पहिला येण्या इतपत का घसरला? या प्रश्नाची उत्तरे कदाचित या चर्चेतून मिळू शकतील.
मातोश्रीवर पैसे कसे गोळा केले जातात? पैसा जमा करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? काय काय गिफ्ट घेतल्या जातात? हे किशोर तिवारी यांनी सविस्तर सांगितले आहे. हे कमी की काय म्हणून त्यांनी सल्लाही दिला आहे, की नीलम गोऱ्हेंना दुखावू नका. त्यांनी सगळे बाहेर काढले तर तुमची किती गळचेपी होईल? बिभीषण काय करू शकतो, हे सर्वांना ठाऊक असते. त्यातून धडा कोणीच घेत नाही. उबाठा शिवसेनेत तर असा एकही नेता नाही. किशोर तिवारी आणि नीलम गोऱ्हे या दोन्ही नेत्यांच्या टिकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी त्यांची लक्तरे काढली. गोऱ्हे यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल तिवारी म्हणाले, त्या २५ वर्षे पक्षात राहिल्या आहेत. त्यांना दुखावू नका, या विधानाचा अर्थ ठाकरेंना कळायला हवा. मातोश्रीच्या भानगडी चव्हाट्यावर आणण्यासाठी गोऱ्हेंच्या हाती कोलीत देऊ नका, असे ते सुचवतायत.
हे ही वाचा:
ग्रीन कार्डच्या धर्तीवर जाहीर केलेली ट्रम्प यांची ‘गोल्ड कार्ड’ योजना काय आहे?
दिल्ली विधानसभेत आज कॅग अहवाल सदर होणार
पाकिस्तानात पोलिसांचे बंड; म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफीत काम करणार नाही!
‘दिल्ली लुटली’, कॅगच्या अहवालानंतर भाजपचा ‘आप’वर निशाणा!
तिवारी आता मोकळे आहेत, ते रोज बोलत राहणार. सतत ठाकरेंवर टीका करणार. त्यांनी ठाकरेंना जो इशारा गोऱ्हेंबाबत दिला आहे, तो त्यांनी स्वत:बद्दलही दिलेला आहे. फार दुखावू नका, अडचणीत याल. कारण गोऱ्हे आणि त्यांचे दु:ख काही वेगळे नाही. जे काही बाहेर आले आहे, ते केवळ हिमनगाचे टोक आहे. अजून एकनाथ शिंदे यांनी तोंड उघडलेले नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी विधान केले होते. लखनौ पासून लंडनपर्यंत असलेल्या मालमत्तांबाबत योग्य वेळी बोलेन असे ते म्हणाले होते.
या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो, हे फक्त ठाकरेंबाबत का होते आहे? गुपित फक्त ठाकरेंची असतात, असे नाही. प्रत्येक नेत्याची आणि प्रत्येक पक्षाची गुपितं असतात. जशी ठाकरेंची शिवसेना फुटली, तशी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. परंतु एकानेही शरद पवारांच्या व्यक्तिगत बाबी चव्हाट्यावर मांडल्या नाहीत. एकही नेत्याने पवारांच्या संपत्तीबाबत उघडपणे चर्चा केली नाही. पवारांची मूठ पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांनीही झाकली ठेवली. मग, ठाकरेंना ते का जमले नाही? याचा विचार कधी तरी ते आणि त्यांचे शिलेदार करणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर फार कठीण नाही. पवारांचा पक्ष सोडून जे बाहेर पडले, त्यांच्यावर पवारांनी कधीही जहरी टीका केली नाही. गद्दार, गद्दार म्हणून कधी हिणवले नाही. पक्ष सोडून गेलेले लोकही पवारांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात. संवाद कायम ठेवण्यासाठी जो काही किमान संयम ठेवावा लागतो, तो नेत्याला राखावाच लागतो. ठाकरेंनी हे समजून घेण्याची वेळ कधीच गेलेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)