27 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरसंपादकीयशोक आणि शॉक तेराव्यानंतर तरी संपणार काय?

शोक आणि शॉक तेराव्यानंतर तरी संपणार काय?

न्यायालयाने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तुमचे थोबाड फोडले, तरी तुमचे डोके ठिकाणावर येत नाही

Google News Follow

Related

महाराष्ट्रात महायुतीचा झालेला विजय म्हणजे मविआचे अवघड जागेचे दुखणे झालेले आहे. अनाकलनीय, चमत्कार वगैरे वगेरे शब्द वापरून या विजयाचा उपहास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही रड केंद्रापासून सुरू आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश दिल्लीत बसून रडतायत. नाना पटोले, उद्धव ठाकरे, पवार कुटुंबिय महाराष्ट्रात गळा काढतायत. ही उर बडवेगिरी आणखी किती दिवस चालणार? आपल्याकडे तेरा दिवसानंतर शोक विसरण्याची प्रथा
आहे. मविआचे नेते १३ दिवसांवर थांबतील असे काही दिसत नाही. लोकशाहीच्या बाता करणाऱ्यांना एक हार पचवता येत नाही, असे चित्र दिसते आहे. सहा महीन्यांपूर्वी महायुतीचा पराभव झाला होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी हा पराभव किती खिलाडूपणे स्वीकारला होता, हे तरी या रडूगँगने आठवून पहावे.

महायुतीला मिळालेले भव्य यश जनतेने दिलेले नाही, ते इव्हीएमच्या कृपेमुळे मिळाले असा नरेटीव्ह मविआचे नेते आणि पाळीव पत्रकार सेट करण्याचा प्रयत्न करतायत. सहा महीन्यांपूर्वी लोकसभेत घसघशीत जागा मिळाल्या तेव्हा सगळे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंचा जयजयकार करत होते. शरद पवारांच्या डावपेचांचे कौतिक करत होते. योग्य रणनीती वापरून हे डावपेच अवघ्या सहा महीन्यात ज्यांनी उद्ध्वस्त केले, त्यांच खरे तर किती कौतूक व्हायला हवे होते. पाळीव पत्रकारांना यात एव्हीएम दिसायला लागले आहे. पत्रकारांची पण राहुल गांधी, आदित्य, शरद पवारांनी गोची करून ठेवलेली आहे. आडवा तिडवा प्रश्न विचारला तर पत्रकार परिषदेतून बाहेर काढायचे, संपादकांना फोन करून त्याच्या नोकरीवर गदा येईल अशी व्यवस्था करायची, तुम्ही भाजपाची सुपारी घेतली आहे का असा सवाल करायचा, हे सर्रास सुरू आहे. त्यामुळे पत्रकार परीषदेत फक्त लाळचाटे प्रश्न केले जातात. मविआच्या नेत्यांनी वाट्टेल ते बोलायचे, पत्रकारांनी ऐकून घ्यायचे. हेच ईव्हीएम वापरून २००४ ते २०१४ या काळात देशात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवली. तेव्हा तो जनतेचा कौल होता. आज अचानक हे निकाल काँग्रेसच्या नेत्यांना अनाकलनीय का वाटतायत? जयराम रमेश यांनी अनाकलनीय आणि धक्कादायक असे शब्द वापरले आहेत.

महाराष्ट्रात भाजपाला २००९ मध्ये फक्त ४६ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये हा आकडा १२२ झाला. म्हणजे जवळ जवळ अडीच पट जागा मिळाल्या. जनता जेव्हा डोक्यावर घ्यायचे तेव्हा डोक्यावर घेते. मिजासखोरांना पायदळी तुडवते. २०१४ मध्ये भाजपाने १२२ पर्यंत मजल मारली, हा आकडा २०२४ मध्ये दहाने वाढला तर इतका धक्का बसण्याचे कारण काय?
‘प्रचारा दरम्यान आम्ही पण ग्राऊंड लेव्हलवर फिरलो, लोकांशी बोललो, काय वातावरण होते आम्ही पाहीले. महायुतीच्या विरोधात जनमानस असताना असे निकाल लागतील असे वाटले नव्हते.’ असे भाव व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, नाना पटोले, रोहीत पवार, सुप्रिया सुळे हे सगळेच नेते देत आहेत. अशा किती लोकांशी मविआचे नेते बोलले? ज्यांना मविआच्या नेत्यांना उचलून आपटायचे आहे, ते निवडणुकीच्या आधी यांच्या कानात येऊन सांगणार का? आम्ही ना तुमच्या विरोधात मतदान करतोय, कारण तुमची आघाडी हिंदूंवर वरवंटा चालवण्यासाठीच निर्माण झालेली आहे. की ठाकरेंना सांगणार तुम्ही आलात तर घरी बसाल आणि फेसबुकवर कोमट पाणी पिण्याचा सल्ला द्याल. मतदार शहाणा आहे. प्रत्येकाला जागा दाखवत असतो.

संजय राऊत यांची उलट सुलट विधाने ऐका. एका बाजूला ते म्हणतात संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले आणि त्यांनी विषारी प्रचार केला. याचा अर्थ असा आहे, जे राऊतांना विषारी वाटते ते केवळ आणि केवळ सत्य असल्याचे लोकांना पटले. कारण संघावर लोकांचा तितका विश्वास आहे. संघावर लोकांनी विश्वास ठेवला तुम्हाला नाकारले हे स्वीकारा आणि पराभव मान्य करा ना! हरियाणा निवडणुकीनंतर राऊतांची प्रतिक्रीया होती, काँग्रेसच्या बाजूने वातावरण होते, परंतु भाजपाने योग्य रणनीती राबवली, भाजपाचे नेते, कार्य़कर्ते लोकांपर्यंत गेले आणि विजय खेचून आणला. राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपाचे कौतूक केले होते. कारण हरियाणाचे आकडे दाखवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला दाबता येईल. जास्त जागा पदरात पाडता येतील, कदाचित मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा लकडा लावता येईल असा त्यांचा होरा होता.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

ईव्हीएमच्या वापरापासून काँग्रेसनेच सर्वाधिक विजय मिळविले, तेव्हा आता लाज बाळगा!

संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश

आम्हाला संसद चालवायची आहे

महाराष्ट्रात माती खाल्ल्यानंतर त्यांनी खरे तर तोच सुर लावायला हवा होता. परंतु त्यांची भाषा बदलली. लाडकी बहीण योजनेमुळे मविआचे नेते धास्तावले होते. त्यामुळे ही योजना बंद पाडण्यासाठी जमेल तितक्या काड्या त्यांनी केल्या. कोर्टबाजी केली. हे पैसे म्हणजे लाच आहे, बहीणींना विकत घेण्याचा प्रकार आहे, अशी चिखल फेक केली. काही उपयोग झाला नाही, तेव्हा आम्हीही तीन हजार देऊ अशी घोषणा केली. मविआच्या नेत्यांची नियत बहिणींच्या लक्षात आली आणि त्यांचा दणदणीत पराभव केला तेव्हा आता हे ईव्हीएमवर घसरले आहेत. प्रचारासाठी राष्ट्रवादी शपच्या नेत्या सुप्रिया सुळे रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीची घोषणा देत होत्या. ही मंडळी लोकांना मूर्ख समजतात काय? संकष्टीच्या दिवशी मटण खातानाचे फोटो टाकायचे रामकृष्ण हरीच्या घोषणा द्यायच्या? पवारांच्या समोर कवडी दमडीचे लोक गणपती दारु पितो, स्वामी समर्थ लंगोटीवर फिरतात अशी वक्तव्य केली जातात, पवार मख्खपणे बसून ऐकतात. मी देवाचा बाप आहे, अशी डायलॉगबाजी करतात. मटण खाऊन गणपतीच्या दर्शनाला जातात. सज्जाद नोमानीला कडेवर घेतात.

राहुल गांधी तर हिंदू समाजाला तोडण्यासाठी सुपारी घेतल्यासारखे बोलत असतात, जे बोलतात त्यात बुद्धीचा काहीही संबंध नसतो. तालकटोरावर झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात माईक बंद झाला. हे म्हणतात मी दलित, आदिवासींच्या बाजूने बोलायला लागलो की माझा माईक बंद केला जातो. अरे तुझ्या पक्षाच्या कार्यक्रमात मोदी आणि त्यांचे समर्थक येणार आहेत का माईक बंद करायला. लोकांना मुर्ख बडबड ऐकून वात आलाय, त्यामुळे वैतागून कोणी केला असेल. असा आचरटपणा सकाळ संध्याकाळ करायचा. तरीही लोकांनी तुम्हाला मतदान करावे अशी तुमची इच्छा असते. तुम्ही हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या, त्यांनी तुम्हाला तुडवले हिशोब चुकता केला, आता इव्हीएमच्या नावाने रडताय कशाला? सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तुमचे थोबाड फोडले, तरी तुमचे डोके ठिकाणावर येत नाही. त्यामुळे काळजी घ्या, बरे व्हा, नाही तर जनमताचा अपमान केल्याबद्दल लोकच रस्त्या रस्त्यात तुमचा हिशोब करतील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा