काही लोक वाद ओढवून घेत असतात, काही लोकांना वाद येऊन येऊन चिकटत असतात. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यापैकी दुसऱ्या गटातील आहेत. नार्कोटीक ब्युरोचे झोनल डायरेक्टर असताना वानखेडे यांच्या विरोधात मविआचे
मंत्री नबाव मलिक, खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. त्या काळात वानखेडे यांची बरीच होरपळ झाली. आता दिशा सालियन प्रकरणानिमित्त ते पुन्हा प्रकाश झोतात आलेले आहेत. आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्या एकमेकांशी झालेल्या संवादाचे पुरावे वानखेडे यांच्याकडे असल्याचा दावा एड.नीलेश ओझा यांनी केला आहे. एड.ओझा हे दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील आहेत. याप्रकरणात समीर वानखेडे यांच्या वकीलांनी हायकोर्टात
प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
जून २०२० रोजी दिशा सालियन हिची हत्या झाली होती. तिने काही काळ अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक म्हणून काम केले होते. दोघांची चांगली मैत्री होती. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. दिशा सालियन आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूमध्ये काही समान धागे असल्याचा त्यांचा दावा आहे. दोन्ही प्रकरणात ज्या समान धाग्यांची चर्चा होते आहे, त्यातलाच एक महत्वाचा
धागा म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती. ही सुशांत याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. ज्या दिवशी दिशा सालियन हिची हत्या झाली. त्या दिवशी तिने सुशांत सिंह राजपूतचे वांद्रे पश्चिम येथील घर सोडले. त्याच वेळी तिने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला.
दिशा सालियन हिची हत्या आणि सुशांत सिंह राजपूतची हत्या यामध्ये सहा दिवसांचे अंतर आहे. ८ जून २०२० रोजी दिशाची हत्या झाली आणि १४ जून रोजी सुशांतची. या दोन्ही दिवशी आणि दरम्यान रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरे यांना ४४ फोन कॉल केल्याचा दावा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत केला होता. सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येमागे काही ड्रग्जचा एंगल आहे का, हे तपासण्यासाठी रिया चक्रवर्तीची नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोनेही चौकशी केली होती. तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला ड्रग्ज विक्रीप्रकरणी अटकही करण्यात आली होती. तो सुशांतसह काही सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असल्याचा त्याच्यावर संशय होता. समीर वानखेडे त्या काळात एनसीबीचे डायरेक्टर होते.
त्यांच्याकडे रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्या दरम्यान झालेल्या व्हॉट्सअ चॅटचे तपशील असल्याचा दावा सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी केला आहे. ही माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे. वानखेडे हे प्रामाणिक
अधिकारी असल्यामुळे त्यांनाच या तपासाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी एड.ओझा यांनी केलेली आहे. समीर वानखेडे यांचे याप्रकरणात नाव आल्यानंतर याप्रकरणी ते उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. एड.ओझा यांनी जे काही सांगितले आहे ते जर सत्य असेल तर वानखेडे यांची साक्ष याप्रकरणात अत्यंत महत्वाची ठरणार आहे. दिशा आणि समीर यांच्या मृत्यू प्रकरणात काही तरी काळीबेरे निश्चितपणे आहे.
आपण दिशा सालियनच्या घरी त्या दिवशी गेलो नव्हतो, असा दावा आदित्य ठाकरे वारंवार करीत असले तरी ते त्या दिवशी तिथेच होते असे ठामपणे सांगणारे अनेक लोक आहेत. उबाठा शिवसेनेतून नुकतेच हाकलण्यात आलेल्या किशोर तिवारी यांनीही दिशाच्या घरी झालेल्या पार्टीत आदित्य ठाकरे हजर होते, असा दावा केला आहे. ‘आदित्य ठाकरे यांना सालियन प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी काय काय करावे लागले.’, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे. रिया चक्रवर्ती आणि आपली कधीही भेट झाली नाही, असा दावा आदित्य यांनी केला आहे. रिया चक्रवर्तींनेही तसाच दावा केला आहे. ‘आपला आदित्य यांच्याशी कधी संवाद झाला नाही, भेटही झाली नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्याच्या मी कधीही संपर्कात नव्हते. आपल्या कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये ‘AU’ हे नाव आहे. परंतु ज्या ‘AU’ ला आपण फोन केला, ते आदित्य ठाकरे नसून अनन्या उद्धव ही माझी मैत्रीणी आहे.’ दावे-प्रतिदावे बरेच आहेत. त्यामुळे पुरावे काय सांगतात हे महत्वाचे. एड.ओझा यांनी सांगितलेले डिजिटल आणि फोन कॉल्सचे पुरावे जर खरोखर अस्तित्वात
असले तर ते निश्चितपणे नाकारण्यासारखेही नाहीत आणि नष्ट करण्यासारखेही नाहीत. समीर वानखेडे यांच्याकडे असलेले व्हॉट्सअप चॅटचे पुरावे त्याप्रकारचेच आहेत.
हे ही वाचा:
गुणांचा खजिना ‘फालसा’: उन्हाळ्यात आरोग्यासाठी वरदान
नव्या जोशात आणि स्मार्ट रणनीतीसह गुजरात टायटन्स सज्ज
अल्काराझ दुसऱ्या फेरीत गाफिनकडून पराभूत
शशी थरूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत भाजपा नेते का म्हणाले, “एकाच दिशेने प्रवास”
राहुल शेवाळे यांनी रिया आणि आदित्य यांच्यामध्ये झालेल्या ४४ कॉलबाबत जो दावा केला आहे, तोही पडताळून पाहणे फार कठीण नाही. महत्वाचे म्हणजे राहुल शेवाळे यांनी हा दावा मान डोलावणाऱ्या पत्रकारांसमोर केलेला नसून लोकसभेच्या सभागृहात केलेला आहे. तो ऑन रेकॉर्ड केलेला आहे. रिया चक्रवर्तीच्या कॉल डेटा रेकॉर्डवरून ही बाब सहज उघड होऊ शकेल. ८ जून २०२० रोजीचे आदित्य ठाकरे यांचे मोबाईल टॉवर लोकेशन हा तसाच एक पुरावा आहे. दिशा सालियन हिच्या हत्येला पाच वर्षे झाली असली तरी यापैकी एकही पुरावा नष्ट करता येणे शक्य नाही. मुंबई उच्च न्यायालयात हे पुरावे असल्याचा दावा याचिकेद्वारे करणारे एड.नीलेश ओझा निश्चितपणे इतके खुळे नाहीत, की जे
न्यायालयात थापा मारतील.
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लोकांना हवी आहेत. दिशा आणि सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात काही कनेक्शन आहे का? या दोन्ही मृत्यूचा एखाद्या ड्रग्ज कार्टेलशी संबंध आहे का? ज्या दिवशी दिशाच्या घरी पार्टी झाली त्या दिवशी मुंबईत आणखी कोणाच्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्ज, लहान मुलांचा वापर झाला होता का? अशी अनेक प्रकरणे यात गुंतली असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात बड्या धेंडांची नावे गुंतली असल्याने याची उकल होण्यापेक्षा राजकीय सौदेबाजी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अपेक्षा फक्त न्यायालयाकडून आहे. न्यायालयात जे लोक या प्रकरणावर प्रकाश टाकू शकतात, त्यात एक नाव समीर वानखेडे यांचे आहे. एक डॅशिंग अधिकारी असा त्यांचा लौकीक आहे. ते याप्रकरणात त्या लौकीकाला जागतील अशी अपेक्षा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)