30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
घरसंपादकीयकाँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे...

काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…

अध्यक्षपदाच्या निवडीवरून रालोआला उकळी फुटायला लागेल या विरोधकांच्या अपेक्षेवर पाणी पडले

Google News Follow

Related

लोकसभा अध्यक्षपदी आज ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. इंडी आघाडीने त्यांच्या विरोधात के.सुरेश यांना उमेदवारी दिली होती. परंतु आवाजी मतांनी बिर्ला यांची निवड झाल्यानंतर विरोधकांनी मत विभाजनाची मागणी केली नाही. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर केंद्रातील सत्तेच्या चाव्या पूर्णपणे भाजपाच्या हाती आहेत, हे स्पष्ट झाले. पहिल्याच भाषणात लोकसभा अध्यक्षांनी देशावर आणीबाणी लादण्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकशाही बुडव्या कृत्याचा सभागृहाच्या वतीने निषेध केला आणि संविधान वाचवण्याच्या बाता करणाऱ्या विरोधकांना आरसा दाखवला.

लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून रालोआतील मित्रपक्ष या पदासाठी भाजपाच्या उरावर बसतील अशी अपेक्षा बाळगून असलेल्या विरोधकांची या निमित्ताने चांगलीच निराशा झाली आहे. रालोआत कोणताही वाद नसून जदयू आणि तेलगू देशम् हे पक्ष भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे पुन्हा एकवार स्पष्ट झालेले आहे. खासदारकीची शपथ घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान दाखवणाऱ्या राहुल गांधीना आज झटका तेव्हा बसला जेव्हा आणीबाणीची आठवण करून देत लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या कृत्याची सभागृहाला आठवण करून दिला. आणीबाणीचा धिक्कार केला.

हे सरकार फार काळ चालणार नाही, टिकणार नाही, कोसळणार अशा प्रकारच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनी अध्यक्षपदी सहजपणे झालेली ओम बिर्ला यांची निवड निश्चितपणे झोंबली असणार. हे सरकार स्थिर नाही, असा दावा करणाऱ्या विरोधकांनी आवाजी मतदानानंतर मतविभाजनाची मागणी केली नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे. रालोआमध्ये कोणतीही तडा नाही, रालोआची जमीन भुसभुशीत नाही, याची जाणीव विरोधकांना झालेली आहे. मत विभाजन घेतले तर रालोआतील फुट दिसण्या ऐवजी आपल्यातीलच मतभेद समोर येतील, हे बहुधा विरोधकांच्या लक्षात आले असावे.

सभागृहाच्या परंपरेनुसार पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी अध्यक्षांना त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले. लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेचा बॉस असतो. सभागृहाचे संचलन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सर्वात महत्वाचे म्हणजे सदस्यांच्या निलंबनाचा अधिकार त्यांच्याकडे असतो. त्यामुळे हे पद कोणाकडे जाते याबाबत मोठी उत्सुकता होती. केंद्रात एका पक्षाला बहुमत नाही, आघाडीची सत्ता आहे, अशा स्थितीत अध्यक्षपदी बसणारा नेता कोणत्या पक्षाचा आहे, याला अनन्यसाधारण महत्व आहे.

मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात सगळी महत्वाची खाती भाजपाने आपल्या हाती ठेवली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदावर तरी तेलगू देसम किंवा जदयू हे पक्ष दावा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. चंद्राबाबू नायडू, नीतीश कुमार हे नेते हे पद मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाब टाकतील असे बोलले जात होते. विरोधकांकडूनही या दोन्ही नेत्यांना चाव्या मारण्याचे प्रयत्न अखंडपणे सुरू होते. भाजपाकडून तुमचे पक्ष फोडले जातील त्यामुळे अध्यक्षपद तुमच्याकडेच ठेवा असे फुकट सल्ले महाराष्ट्रातील काही बिनकामाच्या नेत्यांकडून दिले गेले. परंतु या चाव्यांचा फारसा उपयोग झाला नाही.

चंद्राबाबू आणि नीतीश या दोन्ही नेत्यांनी मोदींवर निर्णय सोपवला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवरून रालोआला उकळी फुटायला लागेल या विरोधकांच्या अपेक्षेवर पाणी पडले. लोकसभा अध्यक्षांची निवड करताना रालोआतील नेत्यांनी दाखवलेल्या समंजसपणामुळे, एकजुटीमुळे हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ विनासायास पूर्ण करेल याबाबत लोकांच्या मनातही खात्री निर्माण झालेली आहे. रालोआच्या नेत्यांचा आत्मविश्वासही यामुळे वाढणार आहे.

लोकसभा अध्यक्षाची निवड सर्वसंमतीने व्हायला हवी, म्हणून भाजपाच्या वतीने राजनाथ सिंह, किरेन रिजीजू यांनी प्रयत्न केले. परंतु त्याला यश आले नाही. लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सहमती न झाल्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपदावर सत्ताधारी आघाडीचा नेताच येणार हे स्पष्ट झाले आहे. आम्ही आवाजी मतदानानंतर मत विभाजनाची मागणी केली नाही हे आमच्या बाजूने सकारात्मक पाऊल होते, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले. विरोधकांनी जर ओम बिर्ला यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नसता तर जयराम रमेश यांच्या विधानावर विश्वास ठेवणे सोयीचे झाले असते. काही असो, परंतु अध्यक्षांच्या निवडी दरम्यान विरोधकांनी फार ताणून धरले नाही. सभागृहाचे वातावरण बिघडेल अशी कृती केली नाही, ही बाब मान्य करायला हवी.

हे ही वाचा:

लोकसभाध्यक्ष बिर्ला म्हणाले, आणीबाणी हा काँग्रेसच्या हुकुमशाहीचा काळा अध्याय

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सुनील गावस्करांकडून रोहित शर्मावर स्तुतीसुमने

मुंबई ‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ करणार!

मोदी ३ चा चेहरा मोहरा पाहिला तर लक्षात येते भाजपाकडे नसलेला बहुमताचा आकडा सोडला तर २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत या सरकारच्या चेहऱ्यामोहऱ्यात विशेष फरक दिसत नाही. प्रमुख मंत्रीपदी आणि लोकसभेच्या अध्यक्ष पदावर असलेले चेहरे बदलेले नाही. देशातील राजकीय चित्र तेच आहे, ते बदलेले नाही, हे मोदींनी या निमित्ताने दाखवून दिलेले आहे. मोदी ३ च्या स्थापनेपासून चंद्राबाबू आणि नीतीश यांनी घेतलेली समंजस भूमिका पाहिली की लक्षात येते की राज्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही, केंद्रात तुम्ही आम्हाला मोकळा हात द्या, असे सामंजस्य पंतप्रधान मोदी आणि चंद्राबाबू तसेच नीतीश यांच्यात झालेले दिसते. सरकारची घडी व्यवस्थित बसली आहे याचे संकेत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यामुळे मिळत आहेत. मोदींच्या दौऱ्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा