ऐंशीच्या दशकात पंतप्रधान राजीव गांधी यांनी सत्तेच्या धुंदीत व्ही.पी.सिंह यांना दुखावण्याची चूक केली. त्या चुकीनंतर नेहरु गांधी घराणे आणि पंतप्रधान पदाचा संबंध संपला. महाराष्ट्रात याच चुकीची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकल्यानंतर का कोण जाणे व्ही.पी.सिंह यांची आठवण आली.
विश्वनाथ प्रताप सिंह उर्फ व्ही.पी.सिंह हे देशाचे सातवे पंतप्रधान. बोफोर्सच्या मुद्यावरून त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात बंड केले होते. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ऐतिहासिक विजय मिळवत राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. १९८४ ते १९८७ या काळात राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात व्ही.पी.सिंह हे देशाचे संरक्षण मंत्री होते. याच काळात बोफोर्स घोटाळ्याचा धुरळा निर्माण झाला. व्ही.पी.सिंह यांनी नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा देत राजीव गांधी यांना कचाट्यात पकडले. परंतु ते पक्षातच होते.
१९८७-१९८८ च्या दरम्यान एका जाहीर कार्यक्रमात हे दोन्ही नेते समोरासमोर आले. ठिक या भेटीच्या आधी राजीव गांधी यांनी एका जाहीर सभेत नाव न घेता व्ही.पी.सिंह यांना मीर जाफर आणि जयचंदाची उपमा दिली होती. दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता. अशा परीस्थितीत हे दोन्ही नेते जेव्हा समोरासमोर आले तेव्हा राजीव गांधी त्यांना थेट भिडले. तुम्हारी बहोत चर्चा है, क्या करने का इरादा है, असा थेट प्रश्न विचारला.
व्ही.पी.सिंह हे मुरलेले राजकारणी होते. राजीव यांच्यासारखे नवथर नव्हते. त्यांनी मुत्सद्दी उत्तर दिले. तुमची इच्छा असेल तर राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेतो. सिंह यांच्या उत्तरानंतर खरं तर हा वाद संपायला हवा होता. परंतु राजीव गांधी यांनी त्यांना सत्तेच्या धुंदीत आव्हान दिले. फार काळ चालणार नाही हा खेळ, प्रणब मुखर्जी यांच्यासारखे तीन महिन्यात शस्त्र टाकाल. राजीव गांधी यांनी एक प्रकारे सिंह यांना आव्हान दिले. राजीव यांचे बोलणे म्हणजे अनुभवहीन आणि अपरिपक्व राजकारणाचा उत्तम नमुना होता. सिंह यांनी त्यांचे आव्हान स्वीकारले. त्यानंतर जे काही घडले ते अवघ्या देशाला माहिती आहे.
हे ही वाचा:
दिव्यशक्तीवरून बागेश्वर बाबा,अंनिस यांच्यात आरोप प्रत्यारोप
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनकही म्हणाले,आम्ही मोदींची माणसं.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कार चालवताना केली ही चूक, मागितली माफी
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
संतोष भरतीया या राजकीय नेत्याने लिहीलेल्या व्ही.पी.सिंह, चंद्रशेखर, सोनिया गांधी और मै या पुस्तकात या प्रसंगाचे वर्णन आहे. भरतीया हे खासदार होते. त्या काळाचे प्रत्यक्षदर्शी होते. इंदिराजींच्या मृत्यूनंतर मिळालेला देदिप्यमान विजय, संसदेत असलेले राक्षसी बहुमत आणि आजूबाजूला जमलेल्या भाटांच्या गोतावळ्यात राजीव गांधी यांचे राजकारण सुरू होते. विरोधी पक्ष तर संपल्यात जमा होता. त्यामुळे राजीव गांधी यांच्या डोक्यात हवा गेली होती. गांधी घराण्याच्या पुण्याईमुळे आकाशात चंद्र-सूर्य असेपर्यंत देशात आपली सत्ता राहील, असा त्यांचा ठाम समज झाला होता.
व्ही.पी.सिंह यांनी राजीव गांधी आणि काँग्रेसच्या अहंकाराच्या ठिकऱ्या केल्या. १९८९-१९९० या काळात ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यांचे सरकार औट घटकेचे जरी असले तरी नेहरु-गांधी घराण्याकडे असलेली निरंकुश सत्ता त्यांनी संपवली.
जे राजीव गांधी यांनी व्ही.पी.सिंह यांच्याबाबतीत केलं तिच चूक उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केली. उद्धव यांच्या अहंकारामुळे आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका मंचावर बसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभर स्तुती करताना महाराष्ट्राची जनता पाहते आहे.
सत्तेचा माज आणि घराण्याच्या पुण्याईबद्दल गैरसमज असला की अशी परीस्थिती ओढवते. सत्तेच्या नशेत माणसं टीकवता आली नाही की जवळची माणसं दूर जातात आणि व्ही.पी.सिंह आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखा इतिहास घडवतात.
काल मेट्रो २-ए आणि मेट्रो-७ प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर मेट्रोच्या बाकावर बसून हास्यविनोद करणारा नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोवर Guess The Conversation… अशी एक ओळीची कॅप्शन आणि एक स्मायली टाकला होता. फडणवीस यांनी त्या एका ओळीत काय म्हणायेच आहे ते जगाला ठाऊक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंचावरून म्हणाले आम्ही मोदींची माणसं आहोत. जेव्हा ते भेटतात तेव्हा पवित्र वाटते, मनात विश्वास आणि ऊर्जा निर्माण होते. हे ऐकून उद्धव ठाकरे यांचे काय होत असेल कल्पना करा. व्ही.पी.सिंह यांच्या बंडानंतर काँग्रेस प्रचंड खिळखिळी झाली. राजीव गांधी १९८९ मध्ये पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. त्यांचा १९९१ मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु जे पंतप्रधान पद पिढीजात गांधी घराण्याकडे येत होते ते आजतागायत दुरावले आहे. उद्धव ठाकरे यांना हा इतिहास माहीत नसेल असेल असे नाही, परतुं त्यांनीही अहंकार आणि सत्तेच्या धुंदीपोटी पक्षात एकनाथ शिंदे नावाचा व्ही.पी.सिंह निर्माण केला.