आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

राजकारणात यश मिळवणे दुर्मीळ नाही, परंतु यश टिकवणारे, यश पचवणारे यशवंत मात्र निश्चितपणे दुर्मिळ आहेत. यशाच्या शिखरावर मांड ठोकून बसणारे दुर्मिळ आहेत, कारण तिथे जागा फार कमी असते. निवडणूक आय़ोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आलेली आहेत. आधी मुख्यमंत्री पद आणि नंतर पक्ष संघटना हाती आलेल्या शिंदेंना हे यश पचवता येईल का? हा लाख मोलाचे प्रश्न आहेत.

यश डोक्यात शिरल्यामुळे महाविकास आघाडीचे पतन झाले. पहिल्यांदा मुख्यमंत्री पद पाहिलेले उद्धव ठाकरे आणि पहिल्यांदाच आमदार आणि मंत्री झालेल्या आदित्य ठाकरेंना यश पचवता आले नाही, म्हणून टिकवता आले नाही. त्यांचे पाय जमिनीवर पडतच नव्हेत म्हणूनच सत्ता २५ वर्षे टिकेल अशी स्वप्न त्यांना पडत होती. एकनाथ शिंदे हे सत्तेच्या आकाशात अचानक धूमकेतूसारखे प्रकटलेले नेते नाहीत. ते तळागाळातून वर आले. अशा नेत्यांना प्रभावक्षेत्रातील सत्यनारायणाची पूजा, बारशे, मुंजी, लग्न, अंत्ययात्रा काहीच चूकवता येत नाही. हीच मेहनत त्यांना ताकद देऊन जाते. कारण यानिमित्ताने लोकांशी संपर्क राहतो. लोकांची सातत्याने संबंध येत असल्यामुळे त्यांची नाडी अचूक माहिती असते. जनतेच्या पाठिंब्यामुळे आपले नेतृत्व कायम राहू शकते याचे भान राहाते.

अशाच प्रकारे सत्तासोपानाची एकेक पायरी चढत एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि एका पक्षाचा ताबा या दोन्ही गोष्टी आपल्या हाती येतील असे कधी त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल. त्यांनी तसा विचारही केला नसेल.

ठाकरे पिता-पुत्रांनी केलेल्या कुठल्यातरी जबरदस्त अपमानामुळे ते इरेला पेटले आणि त्यांनी त्या दोघांचा वचपा काढला, असे आम्हाला तरी सुरूवातीपासून वाटते आहे. पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांना मुठीत ठेवण्यासाठी मूठ तेवढी मोठी असावी लागते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मूठ, पकड आणि हृदय सगळंच मोठं असल्यामुळे ते त्यांना शक्य झाले. मात्र हा विषय उद्धव यांच्या क्षमतेच्या पलिकडचा होता. त्यांच्या कद्रूपणामुळे शिंदे हातातून निसटले.   एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये निश्चितपणे आनंदाचे वातावरण आहे. परंतु जनतेचे काय? एक घटक निश्चितपणे असा आहे, की ज्यांना हे आवडलेले नाही. सत्तेचा माज न दाखवता याबाबत सामंजस्याची आणि दिलदार भूमिका घेण्याचे संकेत शिंदे यांनी दाखवले आहेत. शिवसेना भवन आणि पक्षनिधीवर दावा करणार नाही, या त्यांच्या विधानाने लोकांमध्ये सकारात्मक संकेत गेले आहेत.

आमचा लढाई विचारांसाठी होती, हा दावा मजबूत करणारी ही कृती आहे. लोकांना माज आवडत नाही. सत्ताधाऱ्यांचा माज तर अजिबात खपवून घेतला जात नाही. या माजामुळे महाविकास आघाडी सरकार गाळात गेले. शिंदे यांच्या डोक्यात अजून तरी हवा शिरलेली नाही ती शिरणे त्यांना परवडणारे सुद्धा नाही. सुदैवाने त्यांच्या सहकार्यांची डोकी अजून तरी ठिकाणावर आहेत.

शाखांचा ताबा घेण्यासाठी एकमेकांची डोकी फोडणे आम्हाला मान्य नाही, ठाकरे गटाचे म्हणून कोणी आमच्यासमोर उभे ठाकले तरी तेही आमचे शिवसैनिक आहेत, अशी सबुरीची भूमिका संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर ठेवली आहे. ही भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम शिंदेना करावे लागणार आहे. वारसा हा विचारांचा असतो वास्तूचा नाही, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका लोकांनी उचलून धरली. लढाई सुद्धा वास्तूसाठी नाही विचारांसाठी होती यावर शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांच्या कृतीमुळे शिक्कामोर्तब होते आहे. मीडियातील एक मोठा गट ठाकरेंच्या बाजूने इमाने इतबारे काम करतो आहे. हा गट शिंदेची प्रतिमा बिघडवण्यासाठी दिवसरात्र राबतो आहे. परंतु लोकांशी थेट संपर्क ठेवणारे मीडियाच्या जीवावर जगत नाही आणि वाढतही नाहीत.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेश टूरिझमच्या अधिकाऱ्याने केली चेंबूरला आत्महत्या

संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!

बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ ठरला सर्वोकृष्ट चित्रपट

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

महापालिका, विधीमंडळ आणि संसदेच्या पक्ष कार्यालयावर मात्र ताबा मिळवणे गरजेचे होते. तो अधिकृत शिवसेना झाल्यावर शिंदे यांच्या समर्थकांनी मिळवला. पक्षाचे नाव-निशाणी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. तिथे काही वेगळा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख झाले तर ते शिवसेनाप्रमुख म्हणवून घेणार नाहीत हे निश्चित. शिवसेना भवनच्या रस्त्याने आम्ही कधी गेलो तर मंदिराकडे पाहून नमस्कार करतात तसा नमस्कार करू, असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.

ही शिवसेनाप्रमुख या पदाबाबतही वेगळी भावना शिंदे समर्थकांच्या मनात निश्चितपणे नाही. परंतु उद्धव यांनी नावामागे लावलेले पक्षप्रमुख हे पदही ते लावणार नाहीत. ते स्वत:ला पक्ष प्रमुखही म्हणवून घेण्याची शक्यता कमी आहे.   पक्षाची घटना बनवणे, राष्ट्रीय कार्यकारीणी, असे बरेच सोपस्कार त्यांना पार पाडायचे आहेत. बरेच कागदी घोडे त्यांना नाचवायचे आहेत. परंतु डोक्यात यश शिरणार नाही, मेंदूत भिनणार नाही याची काळजी त्यांना सतत घेत राहावी लागेल. माजामुळे ठाकरेंचा कारभार आटोपत असेल तर आपल्या बाबतीत वेगळे काही होणार नाही याचे भान त्यांना सतत बाळगावे लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version