समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोंडभरून स्तुती केली. उपमुख्यमंत्र्यांनीही भरभरून कौतूक केले. या दोन्ही नेत्यांनी शिंदेवर उधळलेल्या फुलांच्या जखमा खोल जखमा ठाकरे पिता-पुत्रांना झाल्या आहेत. कोणतेही योगदान नसताना वडीलांच्या नावे देशातील सगळ्यात मोठा महामार्ग बनला याचा अभिमान तर खूप दूर राहिला, या दोघांनी या सोहळ्यानंतर खदखद मात्र व्यक्त केली.
देशातील सर्वात मोठ्या महामार्गाचे नामकरण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्हते. आम्हाला निमंत्रण का नव्हते ते सरकारला विचारा, असे विधान पत्रकारांसमोर करून आदीत्य ठाकरे यांनी आपली चिडचिड व्यक्त केली. मातोश्रीवर काही जणांचा पक्षप्रवेश होता. त्या कार्यक्रमात सुमृद्धी महामार्गाबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाचे उद्घाटन १ मे रोजी होणार होते. परंतु ऐनवेळी कमान कोसळल्याचे कारण देऊन ते पुढे ढकलण्यात आले. उद्धव यांच्या या वक्तव्यातही उद्घाटन सोहळा आपल्या हातून निसटल्याची खंत होती.
एखाद्या रस्त्याला, किंवा प्रकल्पाला एखाद्या नेत्याचे नाव देण्यात येत असेल तर त्याच्या कुटुंबियांना बोलावलेच पाहिजे असा काही शासकीय नियम नाही. परंतु राजकारणात प्रत्येक गोष्ट नियमानुसार होते असे नाही. किंबहुना राजकारणात कोणताच स्थायी नियम नाही. प्रत्येक गोष्ट गरजेप्रमाणे, सोयीप्रमाणे बदलत असते. परंतु ठाकरे पिता-पुत्रांना ठरवून बोलावण्यात आले नाही हे स्पष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना या मुद्याला स्पर्श केला आहे. समृद्धी महामार्गासाठी एकनाथ शिंदे पहील्या दिवसापासून रस्त्यावर उतरले होते. जमीन अधिग्रहणात स्वत: जाऊन सह्या घेत होते. त्यांच्याच पक्षाचे नेते महामार्गासाठी एक इंचही जमीन देऊन नका असे सांगत असताना एकनाथ शिंदे यांच्यामुळेच काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितलेला त्यांच्याच पक्षातील नेता कोण हे उघड गुपित आहे. फडणवीसांनी नाव न घेता या नेत्याचा कार्यक्रम केला. जे फडणवीस बोलले तेच वेगळ्या शब्दात शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गात अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही हा महामार्ग पूर्ण केला आणि त्याला बाळासाहेबांचे नाव दिले.
अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी जो काही पाणउतारा केला, त्याचे उट्टे आता शिंदे काढतायत. फडणवीसांनी तर जाहीरपणे सांगितले आहे, की मी उद्धव ठाकरे यांच्या गद्दारीचा बदला घेतला. आश्चर्य म्हणजे शिंदे-फडणवीस ज्यांच्याकडे अंगूलीनिर्देश करतायत त्या उद्धव ठाकरे यांना इतके अडथळे आणून सुद्धा समृद्धी महामार्गाचे श्रेय घ्यायचे होते, १ मेचा मुहूर्त टळला याचे दु:ख त्यांनी उघडपणे बोलून दाखवले.
शिंदे फडणवीस यांनी जे काही केलं त्याला मराठीत वचपा काढणे म्हणतात. उद्धव यांना न केलेल्या कामाचे किंचिंतही श्रेय मिळू द्यायचे नाही, समृद्धी महामार्गात खोडा घालणाऱ्यांना सोहळ्यापासून दूर ठेवायचे असे दोघांनी ठरवले असावे. त्यानुसार सोहळ्याचे निमंत्रण त्यांना पाठवण्यात आले नाही. दोघांनी ज्या जखमा केल्या त्यावर मीठ चोळले गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृती आणि उक्तीने. मोदींनी केवळ शिंदे यांची स्तुती केली नाही. तर त्यांचा हात हातात घेतला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. उद्धव ठाकरे आणि आदीत्य यांनी ज्या एकनाथ शिंदेंचा एकत्रित शिवसेनेत घाऊक अपमान केला, त्या शिंदेंना मोदी कुठे ठेऊ आणि कुठे नको असे वागवत होते. जी सलगी मोदींनी फडणवीसांना दाखवली नाही ती सलगी ते एकनाथ शिंदे यांना दाखवत होते.
हे ही वाचा:
काँग्रेसची गलिच्छ मानसिकता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे केले आवाहन
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पाठीशी रशिया
गोपीनाथ मुंडे यांची श्रीमंती पैसा, जमीन-जुमला सोन्या नाण्यात मोजता येणारी नव्हती
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘या’ नेत्याचं नाव
राजकारणातील प्रत्येक कृती मागे हेतू असतो. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. मोदींच्या कृती मागे जो अर्थ आहे स्पष्ट आहे. राजकारणात शत्रूचा शत्रू मित्र असतो. एकनाथ शिंदे यांच्यामार्फत भाजपा उद्धव यांच्या कद्रूपणाचे हिशोब चुकते करीत आहेत.
हे दुसरे तिसरे काही नसून उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचे फळ आहे. भाजपाबाबतच्या पराकोटीच्या द्वेषामुळे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांच्या गळाला लागले. काँग्रेससोबत निष्ठा दाखवण्यासाठी त्यांनी भाजपाचा वारंवार पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला. भाजपा मोठा होतोय हे उद्धवना सहन होत नव्हते. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री झाला हे गळी उतरत नव्हते. परंतु भाजपाला अपशकून करण्यासाठी त्यांनी स्वत:चे नाक कापण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांच्याबाबतही तेच केले. त्यांना फडणवीस सोडा, पण एकनाथ शिंदे यांचा प्रभावही सहन होत नव्हता. आज चित्र असे आहे की शिंदे फडणवीस एकत्र आले आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्या नशीबी फक्त खदखद उरली आहे. ज्या फांदीवर बसलोय ती कापणाऱ्या लाकूडतोड्या सारखी त्यांची अवस्था झाली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)