हे घडलंय उद्धव ठाकरेंच्या दहशतीमुळे

उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्या पक्षातील नेत्याने केलेले विधान हास्यास्पद आहे

हे घडलंय उद्धव ठाकरेंच्या दहशतीमुळे

मनसेच्या दीपोत्सवानिमित्त शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात महायुतीची नांदी झाल्याची चर्चा आहे. या तीन नेत्यांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे, त्यांच्या सातत्याने गाठीभेटी आणि संवाद होत असतो. पण हे समीकरण दहशतीमुळे निर्माण झाले आहे आणि ही दहशत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे, असा दावा शिवसेना उद्धव गटाच्या एका नेत्याने केला आहे.

शिवसेनेचा एकमेव बुलंद आवाज सध्या तुरुंगात आहे. ते होते तेव्हा सकाळ संध्याकाळ तेच बोलायचे, त्यामुळे अन्य कोणाला बोलण्याची संधी क्वचित मिळत असे. परंतु ते आता नाहीत त्यामुळे इतरांना संधी आहे. त्यांची जागा घेण्यासाठी पक्षात जोरदार चुरस सुरू आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे आघाडीवर आहेत. बाकी प्रियांका चतुर्वेदी, अरविंद सावंत, विनायक राऊत ही मंडळी अध्येमध्ये प्रयत्न करत असतात.

विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील कधी तरी आपण सुद्धा या स्पर्धेत आहोत अशी जाणीव करून देत असतात. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे यांची दहशत वाटते हे विनोदी विधान त्याच प्रयत्नांचा भाग आहे. विनोद फक्त आदित्य ठाकरे यांनी का करावेत आपल्यालाही तसा हक्क आहे, अशी भावनाही या विधानामागे असू शकते.

उद्धव ठाकरे हे राजकारणी झाले नसते तर कदाचित कायदेतज्ज्ञ किंवा डॉक्टर झाले असते असे आदित्य यांचे काल परवाचे विधान आहे. कायदेतज्ज्ञ किंवा डॉक्टर होण्यासाठी फक्त घरी बसणे पुरेसे नसते, घरी बसून अभ्यासही करावा लागतो, हे बहुधा आदित्यना माहीत नसावे. असो पण आदित्य ठाकरे यांची प्रेरणा संजय राऊत असू शकतील आणि दानवेंची आदित्य ठाकरे.

राजकारण्यांची दहशत नसते दरारा असतो. मराठीच्या मुद्यावर दुकान चालवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना हा फरक खरं तर कळायला हवा. दानवे बहुधा मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत असावेत. मनाला येईल तेव्हा कोणाचेही घर पाडणे, कोणालाही अटक करणे, कोणालाही माणसं पाठवून मारहाण करणे, नंतर त्यांच्या मातोश्रीवर सत्कार करणे अशा अनेक उचापती करून उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या काळात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पण ती दहशत मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडीच्या सरकारसोबत संपली. आता केवळ रडारड उरली आहे, जी ठाकरे पिता-पुत्र रोज एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नावाने करत असतात.

राज ठाकरे, एकनाश शिंदे आणि फडणवीस यांच्यातील सलगी उद्धव यांच्या दहशतीमुळे झाली, परंतु २०१९ मध्ये भाजपा सोबत निवडणूक लढवून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले, त्याचे कारण त्यांना थोडा चवीत बदल करण्याचा मूड आला होता. असे दानवे म्हणू शकतील. असे म्हणावेच लागते. नेत्याला अशा प्रकारे चण्याच्या झाडावर चढवण्याची कला साध्य झाली की पद आणि प्रमोशन पटापट मिळू लागते. दानवेंच्या समोर संजय राऊतांचे उदाहरण आहेच. राऊतांनी तर उद्धव ठाकरेंना जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार बनवून टाकले होते. त्यामुळे दानवेंनी त्यांना दहशतवादी बनवून टाकले तर त्यात नवल ते काय?

हे ही वाचा:

संविधान कुणाच्या बापाचे?

दिवाळी पर्यटनाचा ‘डबल’ आनंद

सत्याग्रह एक्स्प्रेसमध्ये डब्यात चौघांनी मार्गिकेतच पढला नमाज; व्हीडिओ झाला व्हायरल

लक्ष लक्ष दिव्यांनी अयोध्यानगरी उजळणार

 

राष्ट्रवादीच्या कुठल्या तरी प्रवक्त्याने मनसे आणि भाजपा लिव्ह इन मध्ये असल्याचे सांगून टाकले आहे. एकीशी संसार, दुसरीला डोळा मारायचा, तिसरीच्या गळ्यात गळे घालायचे हे स्वत:च्या पक्षाचे चारित्र्य त्यांना माहीत नसावे. दानवे आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची राज, शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे आग झाली असली तरी अजितदादा पवार मात्र नेहमीप्रमाणे ‘कूल’ आहेत.

शरद पवार किंवा पक्ष म्हणेल त्याच्या विरोधात मत नोंदवण्याची परंपरा कायम ठेवत, दिवाळीत नेत्यांनी एकमेकांना भेटण्यात काहीच गैर नाही. दिवाळीतही राजकारणातील फटाके तडतडतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version