27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरसंपादकीयएकनाथ शिंदेनाही राज यांचे वावडे?

एकनाथ शिंदेनाही राज यांचे वावडे?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काय होणार?

Google News Follow

Related

मनसेचा महायुतीत समावेश असता तर कदाचित मनसेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला नसता, अशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनसेला महायुतीत प्रवेश देण्यासाठी विरोध होता, असा गौप्यस्फोट मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी विभागप्रमुखांच्या केल्याचे वृत्त आहे. मनसेच्या बैठकीत यावर बराच खल झाला. एकनाथ शिंदे यांना महायुतीत मनसे नको होती, हे काही फार आश्चर्यकार नाही. हे तेच कारण आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना राज ठाकरे नकोसे झाले होते.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हाती काही लागले नाही. त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला. पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीम मतदार संघातून पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाले. भाजपाने अमित ठाकरे यांना पाठींबा दिल्यानंतरही शिवसेनेने इथून उमेदवार मागे घेतला नाही. उलट शिवसेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनाच उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करत होते. लोकसभेत मनसेने पक्षाचा एकही उमेदवार मैदानात न उतरवता महायुतीला पाठींबा दिला होता. विधानसभेत मनसेला शिवसेना भाजपाकडून काही जागा सोडल्या जातील अशी अपेक्षा होती. जागा सोडणे तर दूरची गोष्ट विद्यमान आमदार राजू पाटील आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासाठीही जागा सोडण्याचे सौजन्य शिवसेनेने दाखवले नाही. विभागप्रमुखांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाशी चर्चा करण्यासाठी जबाबदारी एका समितीकडे देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत. दोघांनी एकाच पक्षात अनेक वर्षे काम केलेले आहे. महायुतीचे पहिले सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेही काही वेळा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्याची घटना क्वचितच घडली असेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी जो गौप्यस्फोट केला आहे, तो सर्वसामान्यांसाठी धक्कादायक आहे. परंतु राजकीय विश्लेषकांसाठी हा
धक्का वगैरे अजिबात नाही.

एकनाथ शिंदे स्वत:ला पक्ष प्रमुख वगैरे म्हणवून घेत नसले तरी ते आज त्याच पदावर आहेत. नाव आणि निशाणीसह शिवसेना त्यांच्या ताब्यात आहे. शिवसेनेची भूमिका, त्यांचे मतदार यांची मनसेशी तुलना केली तर दोघे एकाच अंगणात वावरतायत. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून मनसेने हिंदुत्वाची भूमिका पुन्हा जोरकसपणे मांडायला सुरूवात केलेली आहे. हे एकनाथ शिंदेंनाही माहिती आहे. मनसे वाढली तर ती शिवसेनेच्या राजकीय अंगणात वाढणार. मनसेमध्ये शिवसेनेची राजकीय स्पेस व्यापण्याची क्षमता आहे. राज ठाकरे यांच्या भोवती ते वलय आहे. त्यांच्याकडे ठाकरे हे आडनाव आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत. त्यामुळे दूरगामी राजकारणाचा विचार करता राज ठाकरे वाढणे हे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने अजिबात सोयीचे नाही. याच कारणमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात कधीही सख्य झाले नाही. ते परस्परपूरक कधीच नव्हते. एका म्यानात दोन तलवारींसारखे त्यांचे अस्तित्व आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज महायुतीत शिवसेना आहे. उद्या मनसे त्यांची जागा घेऊ शकते. एकनाथ शिंदे हा धोका पत्करायला तयार नाहीत. भाजपा विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची होती. त्यामुळे एकनाथ
शिंदे यांच्या विरोधानंतर भाजपने माघार घेतली. भाजपाला एकनाथ शिंदे यांना दुखावण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु आता राजकारण बदललेले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेला महायुतीत सामील कऱण्यासाठी महायुतीत आज तीन पक्ष आहेत, म्हणून चौथा पक्ष सामील होऊ शकत नाही, असे सांगण्यात येत असले तरी त्यात तथ्य नाही.

हे ही वाचा:

सर्व वाद बाजुला ठेवा आणि ‘इमर्जन्सी’ पाहा!

संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच नामी संधी !

मुंडेंची दादांना तासभर शुभेच्छांसाठी मिठी!

महायुतीत मनसे सामील असती तर मुंबईतील १० जागा उबाठा शिवसेनेला जिंकता आल्या नसत्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बाब ठसठशीतपणे समोर आलेली आहे. मतविभाजनाचा फायदा उबाठा शिवसेनेला झाला.
मुंबई महापालिका जिंकणे, तिथे आपल्या पक्षाचा महापौर बसवणे हे भाजपाचे लक्ष्य आहे. जो पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हाती मुंबई महापालिका नावाचा जादूचा दिवा आहे, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला रसद कमी पडणार नाही. हा पक्ष संपणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला गफलत परवडणारी नाही. महाराष्ट्रातील राजकीय यशाचा लंबक जसा हेलकावे घेतो आहे, ते पाहाता विजयश्रीची हमी कोणीही देऊ शकत नाही.

लोकसभेत मविआचा विजय झाला. विधानसभेत महायुती सत्तेवर आली. महापालिकेत विजयाची पुनरावृत्ती करायची असेल तर योग्य रणनीती शिवाय ते अशक्य आहे. आधीच चाय-बिस्कूट मीडियाला हाताशी धरून मराठी-अमराठी वाद निर्माण करण्यासाठी उबाठा शिवसेनेकडून ताकदीने प्रयत्न होताना दिसतायत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे हा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो. भाजपाला हे माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली नाराजी बाहेर आल्यानंतर ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांना एकनाथ शिंदे यांची जोरदार पाठराखण केलेली आहे. मनसेसोबत युती करण्याचा न करण्याचा निर्णय हा पक्षाचा निर्णय होता. असा खुलासा त्यांनी केलेला आहे. उद्या मनसे महायुतीमध्ये सामील होईल न होईल, मनसेला दोन्ही शक्यतांचा विचार करून तयारी ठेवावी लागेल. राज ठाकरे यांना याची जाणीव निश्चितपणे असणार.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा