कोविड महामारीच्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांची गँग महाराष्ट्रात काय करत होती, याची माहिती आता आकडेवारीसह समोर आलेली आहे. कोविड मृत्यूदरात महाराष्ट्र नंबर वन होता. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेस्ट मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते. स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. लोक मरत होते आणि महापालिकेतील सत्ताधारी टोळी घरावर सोन्याची कौलं चढवत होती. घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या काळात हा असा कारभार केला. मृत्यूचे थैमान सुरू असताना मुंबईत शहराच्या प्रथम नागरीक महापौर किशोरी पेडणेकर यांच्या चिरंजीवांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
लोक किडा-मुंगीसारखे मरत होते. अशा काळात जितके जास्त मृतदेह तितका फायदा जास्त, असे गणित मांडले जात होते. मेलेल्यांच्या डोक्यावरचे लोणी खाणे हा वाक्यप्रचारही सौम्य वाटावा असा धंदा महापालिकेतील लुटारू टोळीने सुरू केला होता. कसायाने थंड डोक्याने बोकडाचा गळा चिरावा, त्याला सोलून उलटा टांगावा आणि तुकड्या तुकड्याने त्याच्या मांसाचा बाजार मांडावा असा हा सगळा प्रकार होता. कोविड महामारीच्या काळात झालेला भ्रष्टाचार खोदण्यासाठी ईडीने मुंबईत घातलेल्या धाडीत काय सापडले याचा थोडा फार तपशील बाहेर आला आहे.
भायखळ्यातील महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. कोविडच्या काळात विकत घेण्यात आलेल्या औषधांच्या आणि अन्य सामग्रीच्या अनेक निविदांचा आणि कंपन्यांशी झालेल्या करारांचा तपशील ईडीच्या अधिकाऱ्यांना या धाडीत सापडला. यापैकी बॉडी बॅग खरेदीचा तपशील अत्यंत लुटारू गँगचा बेशरमपणा उघड करणारा आहे.
महापालिकेने २०२० मध्ये ६८०० रुपये या दराने बॉडी बॅगची खरेदी केली. ज्यावेळी महापालिका बॉडी बॅगची घाऊक खरेदी इतक्या चढ्या दराने करत होती. त्या काळात त्याच दर्जाच्या बॉडी बॅगचे बाहेर किरकोळ खरेदीचे दर फक्त २००० रुपये होते. त्यानंतर फक्त एका वर्षात म्हणजे २०२१ मध्ये तशाच बॉडी बॅगची खरेदी ६०० रुपयात केली असल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले. म्हणजे घाऊक खरेदीचा दर ६०० रुपयेच होता. अगदी कोविडच्या काळात मोठी मागणी असल्यामुळे दर फार फार तर दुप्पट होऊ शकतो. परंतु महापालिकेने ११ पट पेक्षा जास्त पैसे देऊन या बॉडी बॅगची खरेदी केली.
पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे ३४ कोटी किमतीच्या २४ मालमत्तांची कागदपत्रे, १५ कोटींच्या ठेवी सापडल्या आहेत. ही मालमत्ता पत्नीची असून तिला सासरच्यांनी दिलेली असल्याचा दावा जयस्वाल यांनी केलेला आहे. हा दावा ऐकून आपल्याला असा सासरा का मिळाला नाही, किंवा आपण पालिकेत अतिरिक्त आयुक्त का झालो नाही, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. अर्थात ही एका अधिकाऱ्याकडे असलेली संपत्ती आहे. मग महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात गेली २५ आहे, त्यांच्याकडे किती माल असेल याची कल्पना केलेली बरी.
कोविडच्या काळात मुंबईत मृत्यूचे थैमान सुरू असताना मुंबईच्या महापौर, शहराच्या प्रथम नागरीक किशोरी पेडणेकर यांच्या चिरंजीवांचा शाही विवाह सोहळा २०२१ च्या जानेवारी महिन्यात पार पडला. महापालिका आणि राज्यात सत्तेवर असलेले ठाकरे सरकार लोकांना सार्वजनिक समारंभ करू नका. विवाह सोहळा असेल तर फक्त ५० लोकांनाच बोलवा, असे फतवे काढत होते. परंतु हे नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी होते. कारण तीच मरणयातना भोगत होती. सत्ताधाऱ्यांचे मस्त चालले होते.
महापालिकेतील नगरसेवकापासून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अडीचशे खास लोक होते. बाकी नातेवाईक, मित्र यांची गर्दी किती असेल? पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी बेस्ट बसचा ताफा सज्ज ठेवलेला. अनेक खासगी गाड्याही होत्या. त्या काळात अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ३०-३२ खोल्या वऱ्हाडी मंडळींसाठी बुक करण्यात आल्या होत्या. सुमारे हजार-दीड हजार लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. आठवडाभर लग्नाचा थाट सुरू होता. हळद, संगीत, विवाह सोहळा सगळंच इथे पार पडले. कॉम्प्लेक्सचे दोन मोठे ह़ॉल, सगळी मोकळी जागा विवाह सोहळ्यासाठी आरक्षित होती. या काळात कॉम्प्लेक्समधल्या खेळाशी संबंधित उपक्रम बंद ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानने पेरलेले दोन डॉक्टर अखेर बडतर्फ; काश्मिरात दोन महिलांचा खोटा शवविच्छेदन अहवाल दिला
‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक
१६४ बनावट खात्यांमधून गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकिटींचे आरक्षण
बेपत्ता टायटन पाणबुडीतील ‘त्या’ पाच जणांचा मृत्यू
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे महापालिकेअंतर्गत असलेल्या ललित कला क्रीडा प्रतिष्ठानचा एक उपक्रम आहे. महापौर ज्याच्या पदसिद्ध अध्यक्षा असतात. त्यामुळे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा कर्मचारी वर्ग या विवाह सोहळ्यासाठी राबत होता. कोविड काळात ललित कला प्रतिष्ठानच्या मॅनेजरपासून प्यूनपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना फक्त दहा हजार रुपये पगार मिळत होता. हे अर्धपोटी कर्मचारी महापौरांच्या घरच्या लग्नासाठी फुकट राबत होते.
कोविडच्या काळात २०२० मध्ये महाराष्ट्रात आठ लाख आठ हजार ७८३ मृत्यू झाले. बॉडी बॅगपासून औषधांपर्यंत प्रत्येक गोष्टीत घपला झाला. भ्रष्टाचार झाला. त्या काळात झालेल्या या लग्नात किती पैशांचा चुराडा झाला असेल? बॉडी बॅगमधून जो मलिदा पालिकेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कमावला, त्यातला पैसा यात वापरण्यात आला असेल का?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)