प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अयोध्या झगमगलेली असताना देशभरात उत्साहाच्या लाटा उसळत असताना काल नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फ्लॉप शो कोण पाहणार? त्यामुळे बहुधा त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथेच पक्षाच्या कार्यकारिणीचा घाट घातला असावा. एकूणच या कार्यकारीणीत ठाकरेंची बडबड ऐकल्यावर हिंदी बिग बॉसमध्ये एण्ट्री घेण्यासाठी ठाकरे प्रचंड इच्छुक असावेत, अशी दाट शंका येते. बिग बॉसमध्ये पिता-पुत्रांची पहिली जोडी म्हणूनही त्यांचा विचार होऊ शकतो.
बिग बॉस मध्ये एण्ट्री घ्यायला काय लागतं. मुनव्वर फारुकी सारखे दीड दमडीचे पण वादग्रस्त लोक या शोमध्ये येतात. राखी सावंत सारखे बोलघेवडे येतात. ज्यांचे नाव ऐकून चाळे पाहून शिसारी येते असे लोक येतात. हे लोक दीड दमडीचे असो नसो वादग्रस्त, विचित्र असणे महत्वाचे. मनोरुग्ण असल्यास उत्तम. बिग बॉसच्या घरातही इतरांशी असे वाद निर्माण करून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करावे अशी अपेक्षा असते.
अलिकडे ठाकरेंची त्यांचे चिरंजीव आदित्य, विश्वप्रवक्ते संजय राऊत, सुषमा अक्का यांची विधाने पाहून खरे तर उबाठा गटासाठी बिग बॉसच्या स्वतंत्र घराची निर्मितीचा विचारही होऊ शकतो. मालिकेतील सहकलाकाराला शिवीगाळ केल्याबद्दल मालिकेतून नारळ मिळालेला किरण माने याच्यासारखा कलाकार अलिकडेच ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून पक्षात दाखल झाला आहे. त्याच्याकडून मोलाचे मार्गदर्शन ठाकरेंना होऊ शकते.
शिवसेनेते एकेकाळी शिवसेनाप्रमुखांचे नेतृत्व होते. दत्ताजी साळवी, अनंद दिघे, नारायण राणे यांच्यासारखे वाघ होते. आता सुषमा अंधारे आणि किरण माने सारखे पक्षाचे आधार स्तंभ बनले आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या जीवावर पक्ष चालवतायत. अयोध्येत काल श्रीरामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशभरात दिवाळी साजरी झाली. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर आलेला हा क्षण लोकांनी जल्लोषात साजरा केला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर हा क्षण आलाच नसता हे देशातील प्रत्येकाला ठाऊक आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत देशातील नामवंत तारे-तारका काल गर्दीत उभे राहून एकाच लखलखत्या ताऱ्याला अभिवादन करत होते. तो तारा म्हणजे नरेंद्र मोदी. आता आकाशात तारा संपूर्ण तेजाने तळपत असताना गारगोट्या कशा दिसतील? काळाराम मंदिरात गेलेले तोळाराम लोकांच्या खिजगणतीत नव्हते. ठाकरे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून आलेले पाहून अनेकांचे मनोरंजन झाले. पुन्हा एकदा शेंडी जानव्याकडे ठाकरेंचा प्रवास सुरू झालेला दिसतो. सलग ११ दिवस कडकडीत उपावास करणारे मोदी कुठे आणि बापाची नक्कल करणारे हे भोगी कुठे?
अयोध्येतील लखलखाटामुळे झालेली प्रचंड जळजळ ठाकरेंनी नाशिकच्या कार्यकारिणीत बाहेर काढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिऱ्यापोटी गारगोटी असा केला होता. परंतु तो योग्य नव्हता. कारण गारगोटीतून ठिणग्या निघतात. इथे तुलना कोळशाशीच होऊ शकते, किती उगाळला तरी काळाच.
बिग बॉसच्या घरात मनोरंजनाची पूर्ण हमी म्हणजे ठाकरेंची बडबड. ‘मी शिवनेरीवरून माती घेऊन अयोध्येत गेलो होतो, म्हणून थंड्या बस्त्यात गेलेल्या या विषयाला गती आली आणि मंदीर झाले’. स्वत:बद्दल एखाद्याचे किती गैरसमज असावेत?
शिवनेरीची माती पवित्र आहे, पण ती माती हाती धरायला सुद्धा पात्रता लागते. महाराष्ट्राची सत्ता अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून उबवलीत त्या काळात तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवता आले नाही. पूर्णवेळ वसुलीकडे लक्ष असल्यामुळे पित्याच्या स्मारकाकडे दुर्लक्ष झाले बहुधा. शिवनेरीवरून आणलेली थोडी माती लाटलेल्या महापौर बंगल्यात टाकण्याचा विचार नाही आला का डोक्यात? कि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख स्मारक उभारल्यानंतर हे जाहीर करणार की शिवनेरीतील माती तिथेही टाकली होती म्हणून. आपले काहीच नाही, काही निर्माण करता येणार नाही, उभारता येणार नाही, मग आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याशिवाय दुसरा पर्याय कुठे शिल्लक राहतो. बापाचे स्मारक बनवता आले नाही, त्याने देशात भव्य राम मंदिराच्या निर्मितीचे शिवधनुष्य पेलणाऱ्या मोदींबद्दल बोला कशाला?
अयोध्येत झालेल्या सोहळ्यात मोदी स्वत:च्या तेजाने तळपत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते, त्यांना पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर धन्यतेचे. या सोहळ्यात मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली हे ठाकरेंना त्रिवार मान्य नाही. पण महाराष्ट्रात जातीचा वणवा पेटवणाऱ्या शरद पवारांना जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा छपरी नेता जाणता राजा म्हणला तेव्हा ठाकरे तोंडात मळी भरल्यासारखे गप्प राहतात.
हे ही वाचा:
प्रभू रामांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीनंतर पांढऱ्या रंगाच्या मूर्तीची पहिली झलक!
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश करा
श्री रामभक्तांसाठी बनवलेल्या ‘हलवा’ची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
मीरारोडमध्ये फडणवीसांनी बांबू दिला!
ठाकरेंचे शिवप्रेम म्हणजे काय तर शिववडा, शिवभोजन. मोदींचे शिवप्रेम म्हणजे नौदलाच्या ध्वजावर त्यांनी शिवमुद्रा अंकीत केली. आरमारातील त्यांचे योगदान देशासमोर आणले. रावणाचे मुखवटे घालून राम फिरतात असा टोला त्यांनी मोदींना लगावला. मोदींचे महत्व शिवसेनाप्रमुखांना ठाऊक होते. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या ठाकरेंना ते समजण्याची कुवत असण्याचे काही कारण नाही.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुखांना कायम पाण्यात पाहिले. आजही तो खुन्नस कायम आहे. शिवसेनाप्रमुखांची आज जंयती, परंतु सोनिया असो वा राहुल कोणीही त्यांना अभिवादन करत नाही. शिवसेनाप्रमुखांचे संयमी चिरंजीव आपला तोल ढळू न देता, इमाने इतबारे त्यांचे जोडे उचलत असतो.
जेमतेम १४ आमदार आणि चार खासदारांचा हा नेता. त्यातले किती सोबत राहतील आणि किती सोडून जातील याचा नेम नाही. असा नगण्य नेता मोदींच्या विरोधात शड्डू ठोकू शकतो. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असा निर्णय दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना झोडले होते. ज्यांच्यामुळे अनेक दिग्गजांनी पक्ष सोडला, आज त्यांच्या हातून पक्ष निसटला. या विधानाचा अर्थ एवढाच की कुटुंबात सुद्धा ठाकरेंची किंमत नाही. घरात ज्यांना विचारत नाही. ते मोदींना आव्हान देण्याची भाषा करतात. तेव्हा अगदी ठामपणे वाटते यांची जागा बिग बॉसच्या घरातच आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)