मायानगरीच्या मयासुरांवर कारवाई कधी?

किरीट सोमय्या यांनी मढ येथील स्टुडीयो प्रकरणी चहल यांच्यासह आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर ठपका ठेवला आहे

मायानगरीच्या मयासुरांवर कारवाई कधी?

मढ येथे बांधलेल्या अनधिकृत स्टुडिओवर महापालिकेने आज कारवाई केली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही बेकायदा मायानगरी उभारण्याचा ठपका तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर ठेवला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडेही त्यांनी बोट दाखवले आहे. चहल यांच्यावर टीका करणारे सोमय्या एकमेव नाहीत. कोविड भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांच्यावर आहे. आता तरी सरकार चहल यांच्यावर कारवाई करणार काय, हा सवाल जनतेच्या मनात आहे.

मढमध्ये ऐन कोविडच्या महामारीत हे स्टुडिओ उभारण्याचे काम सुरू झाले. फेब्रुवारी २०२१ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने तात्पुरते बांधकाम म्हणून त्यांना परवानगी दिली. सहा महिन्यानंतर ही परवानगी संपल्यानंतरही महापालिकेने या बांधकामांना चारवेळा मुदत वाढ दिली. सीआरझेडच्या नियमांचा कडेलोट करून ही बांधकामे उभारण्यात आली होती.

हा बेकायदा बांधकामे उभारण्याचा राजमार्ग आहे. सरकारी जमिनीवर अशी तात्पुरती बांधकामे करायची. त्याला सतत मुदतवाढ मिळवायची. सगळ्यांना मॅनेज करून ही बांधकामे हळूहळू पक्की करायची ही जुनी परंतु यशस्वी पद्धत आहे. सगळं काही सावकाश होत असल्यामुळे लोकांच्या फार नजरेत येत नाही. मढमध्येही तसेच होईल असा सत्ताधाऱ्यांचा होरा होता. हे सरकार २५ वर्षे चालेल असा आत्मविश्वास असल्यामुळे तोपर्यंत ही अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची योजना होती. परतुं मध्येच सरकार गडगडल्यामुळे सगळा प्लान फसला. पाच लाख चौ.फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आले होते. बांधकामाला अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांचे आशीर्वाद होते. दोघेही बांधकाम सुरू असताना इथे आले होते, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. महापालिका आय़ुक्त चहल यांना याबाबत माहिती असूनही त्यांनी याप्रकाराकडे काणाडोळा केल्याचा त्यांचा आरोप आहे.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. चहल यांच्यावर आमदार आणि मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमित साटम यांनीही आरोप केले आहेत. ‘चहल हे तडजोड करणारे अधिकारी आहेत,’ असे विधान साटम यांनी विधानसभेत केले होते. मुंबईत झालेल्या प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेत पालिका अधिकाऱ्यांचा अहवाल बाजूला ठेवून चहल यांनी मनमानी केल्याचा ठपका साटम यांनी ठेवला होता. साटम यांचे आरोप गंभीर आहेत. कोविड महामारीच्या काळात चहल हे महापालिका आय़ुक्त होते. याच काळात महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या, अमित साटम आणि भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला होता. अप्रत्यक्षपणे हा ठपका चहल यांच्यावर होता.

हे ही वाचा:

सांख्यिकी आयोगासाठी भारताची निवड; चीनलाही टाकले मागे

फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

महागडी बुलेट प्रूफ एसयूव्ही करणार सलमान खानचे संरक्षण

महाविकास आघाडीची सत्ता असताना मुंबईचे पोलिस आय़ुक्त संजय पांडे आणि महापालिका आयुक्त चहल हे सत्ताधाऱ्यांचे खास होते. पांडे आपल्या कर्माने गेले, परंतु मविआची सत्ता गेल्यानंतर चहल अजूनही महापालिकेचे आयुक्त आहेत. किरीट सोमय्या यांनी मढ येथील स्टुडीयो प्रकरणी चहल यांच्यासह आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर ठपका ठेवला आहे. महापालिका आणि सीआरझेडचे नियम धाब्यावर बसून बेकायदा बांधकाम करणे, त्याला प्रोत्साहन देणे, संरक्षण देणे अशाप्रकारचे हे आरोप आहेत.

सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशी कऱण्याची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. काल आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सत्ता आल्यास सरकारला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली आहे. परंतु विरोधात असताना ज्यांच्या कामकाजावर भाजपा नेत्यांनी टीका केली, सत्ता आल्यानंतरही ज्यांच्यावर टीका केली जाते आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असे चित्र जनता पाहते आहे.   सनदी अधिकारी तेच असतात. राज्य शकट चालवणे त्यांच्याशिवाय शक्य नसते, तेच ५२ पत्ते पिसावे लागतात, हे खरे असले तरी प्रश्न आता भाजपा नेत्यांच्या विश्वासार्हतेचा बनला आहे.

बेकायदा बांधकामावर तर कारवाई झाली. मविआच्या काळात ऐन कोविड महामारीच्या आडोशात उभारण्यात आलेले भ्रष्टाचाराचे एक स्मारक महापालिकेने उद्ध्वस्त केले. परंतु या भ्रष्टाचाराला बेकायदा बांधकामाला अभय देणाऱ्यांचे काय?   मढमधील बेकायदा स्टुडिओ पाडल्याबद्दल महापालिका आणि सरकारचे अभिनंदन, परंतु हे बांधकाम उभारण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये राज्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटल्याचा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केलेली आहे. बॉल आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version