24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरसंपादकीयनगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

गेल्या काही महिन्यात मुंबई महानगर पालिकेतील उबाठा शिवसेनेचे ३६ दमदार नगरसेवक कधी बाहेर पडले हे कुणाच्या फारसे लक्षातच आले नाही

Google News Follow

Related

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नजर कधी कॅनडातील घडामोडी तर कधी दिल्लीतील हालचाली टिपण्यात व्यस्त असल्यामुळे पायाखाली काय जळते आहे, त्याकडे त्यांचे लक्ष नाही. महाराष्ट्रासह देशभरात रोज काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना गेल्या काही महिन्यात मुंबई महानगर पालिकेतील उबाठा शिवसेनेचे ३६ दमदार नगरसेवक कधी बाहेर पडले हे कुणाच्या फारसे लक्षातच आले नाही. जोगेश्वरीचे प्रवीण शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडून मंगळवारी एकनाथ शिंदे यांचा हात धरला. महापालिका निवडणुका होईपर्यंत ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदे यांच्या छावणीत जमा होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरेंना सहानुभूती मिळेल असे भाकीत राजकीय पंडित वारंवार करतायत, परंतु त्यावर शिउबाठातील नगरसेवकांचा विश्वास दिसत नाही. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. मार्च २०२२ मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर आता दीड वर्ष लोटले आहे. महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती म्हणजे अप्रत्यक्षरीत्या राज्य सरकारच्या हाती आहे.

मविआच्या कार्यकाळातच जानेवारी-फेब्रुवारीत या निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु तेव्हा मविआच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची आणि ठाकरेंच्या अकार्यक्षम कारभाराची चर्चा एवढी होती की त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसेल याचा अंदाज असल्याने या निवडणुका होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. पुढे तोच कित्ता महायुती सरकारने गिरवला.

ढकलाढकलीच्या खेळाची ज्यांनी सुरूवात केली. तेच आता राज्यातील महायुती सरकार महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवत नसल्याचा आरोप करतायत. शिवसेनेतील फुटीनंतरही मुंबई-ठाण्यात ठाकरेंची ताकद आहे, असा दावा केला जातो. परंतु, हा इतिहास आहे. गेल्या काही महिन्यांत ठाकरेंची बरीच ताकद एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल झाली आहे. प्रवीण शिंदे हे बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी राहिलेले वरीष्ठ नगरसेवक. २०१७ मध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आले. सुरूवातीला दोन वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले. दोन्ही वेळा शिवसेनेच्या उमेदवाराला धुळ चारुन ते जिंकून आले. शिवसेनेच्या विरोधात लढले तरी सभागृहात मात्र त्यांचा पाठींबा शिवसेनेलाच असे. वॉर्ड ओबीसी झाल्यामुळे त्यांना हक्काचा मतदार संघ सोडून शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्याविरोधात २०१२ मध्ये लढावे लागले. तेव्हा त्यांचा साडे सहा हजार मतांनी पराभव झाला. २०१७ मध्ये मात्र उद्धव ठाकरेंच्या आग्रहावरून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते बेस्ट समितीचे अध्यक्ष राहिले. जोगेश्वरीतील २५-३० हजार मतांवर त्यांचा वैयक्तिक प्रभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वायकर यांना ते जड जातील अशी शक्यता आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगरात उबाठा शिवसेनेला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पक्षाबाहेर पडलेले येरे-गबाळे नाहीत. महापालिकेतील तालेवार आहेत. यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या सोबत मंगेश सातमकर यांचे नाव चर्चेत होते. मिरवणुकीची तयारी करण्यात आली होती. परंतु, ऐनवेळी त्यांचा पत्ता कटला. जाधव स्थायी समिती अध्यक्षपदी कायम राहिले. सातमकर फक्त शिक्षण समितीपर्यंत जाऊ शकले. सायनचे सातमकर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. महापालिकेच्या सभागृह नेत्या राहिलेल्या वडाळ्याच्या तृष्णा विश्वासराव, आदित्य ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले वडाळ्याचे अमेय घोले आज शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रभाव क्षेत्रातून म्हणजे भांडूप, कांजूर, विक्रोळीतून बरेच नगरसेवक बाहेर पडले. सुवर्णा करंजे, चंद्रावती मोरे, विक्रोळीचे उपेंद्र सावंत.

पश्चिम उपनगरातून दहिसरच्या शीतल म्हात्रे, सदा परब, अणुशक्ती नगरमधून आमदार तुकाराम काते यांच्या पत्नी मंगला काते आणि त्यांची सुन असे दमदार ३६ नगरसेवक ठाकरेंना टाटा-बाय बाय करून मोकळे झाले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फक्त दोनचा फरक होता. भाजपाला ८२ तर शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या. भाजपाने जोर केला असता तर त्यांचा महापौर होणे अशक्य नव्हते कारण राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होता. देवेंद्र फडणवीस या भानगडीत पडले नाहीत. शिवसेनेचा महापौर झाला. दरम्यान, मनसे आणि अन्य पक्षांना फोडून शिवसेनेने नगरसेवकांच्या संख्येत आणखी दहा नगरसेवकांची भर टाकली. त्यातील फुटलेल्या २५ नगरसेवकांत आणखी १५ ते २० जणांची भर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा आमदार-खासदार वेगळे झाले. परंतु, नगरसेवक मात्र ठाकरेंच्या सोबत आहेत, असे चित्र दिसत होते. परंतु, ते फसवे असल्याचे आता लक्षात येत आहे. सगळे कुंपणावर बसलेले. योग्य वेळेची वाट पाहत होते. आमदार-खासदारांमध्ये एकाच वेळी घाऊक फूट पडल्यामुळे कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु, एक-दोन अशा संख्येने नगरसेवक कमी झाल्यामुळे याबाबत फार चर्चा झाली नाही. ही एकूण संख्या ३६ पर्यंत गेली आहे.

हे ही वाचा:

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड

रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

महापालिका निवडणुका कधी होतील हे आज कोणीही ठामपणे सांगत नाही. महापालिकेशी संबंधित काही विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे तिथून जेव्हा काही निर्णय होतील तेव्हाच हा विषय धसास लागणार आहे. नगरसेवक पद गेले, परंतु खर्च काही संपत नाहीत, अशी परीस्थिती असल्यामुळे नगरसेवक मेटाकुटीला आलेले आहेत. जेव्हा केव्हा महापालिका निवडणुका जाहीर होतील तेव्हा कुंपणावर बसलेले नगरसेवक घाऊक संख्येने एकनाथ शिंदे यांच्या छावणीत दाखल होतील.

मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. शिवसेना इथून मिळत असलेल्या रसदीवरच वाढली. याच बळावर ठाकरे आणि पक्षातील अन्य नेत्यांच्या घरावर सोन्याची कौले चढली. याच प्रभाव क्षेत्रात त्यांचा दारुण पराभव होणार असे आता ठाकरेंच्या सोबत असलेल्या नगरसेवकांनाच वाटू लागले आहे. पक्ष फुटल्यामुळे ठाकरेंना सहानुभूती मिळेल अशी आशा आता ठाकरेंच्या सोबत असलेल्या नगरसेवकांना सुद्धा उरलेली नाही. फक्त संजय राऊत, मराठी मीडिया, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य यांच्या मनात मात्र ही आशा अजून जिवंत आहे. ती जिवंत ठेवणे त्यांना भाग आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा