31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरसंपादकीयफडणवीसांचे सोडा, पक्षातील आमदाराचे अंतरंग तरी कळतात का?

फडणवीसांचे सोडा, पक्षातील आमदाराचे अंतरंग तरी कळतात का?

Google News Follow

Related

बंद पडलेले घड्याळ पण दिवसभरात दोन वेळा अचूक वेळ दाखवतं असं म्हणतात. शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची परीस्थिती बंद घड्याळापेक्षा वाईट आहे. केलेला एकही दावा प्रत्यक्षात येत नाही. तरीही रोज नवे दावे करणे काही बंद होत नाही. ‘भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे अंतरंग अपमानाने धगधगतायत’, असे ताजे विधान राऊतांनी केले आहे. त्यांनी फडणवीसांचा विचार तूर्तास बाजूला ठेवून राजन साळवींच्या अंतरंगाचा विचार केला तर बरे होईल. राजन साळवींनी बारसूतील रिफायनरीचे समर्थन केले आहे.

अंतरंग समजून घेण्याची क्षमता ना राऊतांमध्ये आहे. ना उद्धव ठाकरेंमध्ये. जर ती असती तर पक्षातील ४० आमदार बाहेर पडले, तेव्हाच ही क्षमता कामी आली असती. राऊत हे बोलभांड आहेत, ठाकरेंचा केजरीवाल झाला आहे. अरविंद केजरीवाल हे रंग बदलण्यात सरड्यापेक्षा माहीर आहेत, असे म्हटले जाते. परंतु हम किसी से कम नही, हे शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेले आहे.

रिफायनरी प्रकरणी कोलांटी मारून उद्धव ठाकरे यांनी आपली रंग बदलण्याची क्षमता सिद्ध केलेली आहे. उद्धव ठाकरे हा महाराष्ट्रातील विकास विरोधी चेहरा आहे. शिउबाठाचे नेते रिफायनरीच्या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात बाह्या सरसावतायत. शिउबाठाचे अनिल परब, विनायक राऊत, भास्कर जाधव या सर्व नेत्यांचा यात समावेश आहे. हे नेते मातोश्रीशी जवळीक असलेले आहेत. त्यामुळे हा प्रकार ठाकरेंच्या आदेशाशिवाय झालेला नाही. लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघाचे आमदार असलेल्या साळवी यांनी ट्वीट करून धमाका केला आहे. धमाका अशासाठी कि त्यांनी ठाकरे गटाच्या अन्य नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर त्यांना प्रकल्पाचे समर्थन केले आहे.

हिरव्यागार, निसर्गसंपन्न कोकणातील सामाजिक परिस्थिती काय आहे? फक्त पिकली पाने वावरतात, अशी हजारो घरं आहेत. शेकडो घर बंद आहेत. तरणी-ताठी मुलं रोजगारासाठी बाहेर पडली आहेत. कोणी मुंबई-पुण्यात तर कोणी कोल्हापूरात. घरा समोरचे गोठे रिकामे पडले आहेत. शेतीचा छटाकभर तुकडा सुद्धा मजूर घेऊन कसावा लागतो आहे.

‘कोकण हा स्वर्ग असल्यामुळे इथे रिफायनरीसारखे उद्योग नको’, असा दावा काही लोक करतात. मग हा स्वर्ग सोडून तरुण इतक्या मोठ्या संख्येने १०-१५ हजार पगाराच्या नोकऱ्या करण्यासाठी घर का सोडतात, या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले पाहिजे. कोकणात बाकीचे उद्योग तर दूरची गोष्ट इथले दूध सुद्धा कोल्हापूरातून येते. कोकणाकडे डोळे निववणारे सौंदर्य आहे, गड किल्ले आहेत, नद्या, डोंगर-कपारी, देखणे समुद्र किनारे आहेत, खाडी आहे. परंतु पैसा नाही. मूठभर पैशासाठी इथले तरुण शेकडो मैलावर जाऊन राबतायत.

उद्धव ठाकरे हे घरप्रिय नेते आहेत, बाहेर क्वचित पडतात. त्यांना कोकणातील परिस्थितीची माहिती असण्याचे कारण नाही. परंतु राजन साळवी हे कोकणातील लोकप्रतिनिधी आहेत. नोकरीसाठी बाहेर पडलेल्या तरुणांमुळे घरपण हरवलेली कित्येक घरं त्यांच्याही मतदार संघात आहेत.

रिफायनरीमध्ये हे चित्र बदलण्याची ताकद आहे. नाणारमध्ये होणारी रिफायनरी मोठी होती. तीन लाख कोटी गुंतवणूक असलेला हा प्रकल्प होता. तुलनेने बारसूतला प्रकल्प कमी आकाराचा, सुमारे एक लाख कोटीची गुंतवणूक असलेला आहे. परंतु कोकणाला समृद्ध करण्याची ताकद या प्रकल्पात निश्चितपणे आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होणार आहे. यातून निर्माण होणाऱ्या अप्रत्यक्ष रोजगारांची संख्याही घसघशीत असेल.

स्थानिक रहिवाशांच्या पदराआडून ठाकरेंनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. कारण त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देणे-घेणे नाही. ‘मी आणि माझे कुटुंब’, या पलिकडे त्यांची फूटपट्टी जात नाही. परंतु राजन साळवींचा आवाज हा भूमिपुत्राचा आवाज आहे. कोकणात बेरोजगारीची समस्या किती भेसूर झाली आहे, याची जाण असलेल्या आमदाराचा हा आवाज आहे.

ठाकरेंना विरोधातले आवाज ऐकण्याची सवय नाही. त्यामुळे एक तर त्यांना गप्प केले जाईल किंवा त्यांच्या मताकडे साफ दुर्लक्ष केले जाईल. त्यांनी व्यक्त केलेले मत बदलण्यासाठी त्यांना चेपण्याचाही प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. राऊतांसारखे नेते त्यांच्यावर चिखलफेकही करतील.

ठाकरेंचा रिफायनरीला विरोध हा पूर्णपणे राजकीय आहे. या निमित्ताने भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचे काही हिशोब चुकते करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. रिफायनरीच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा आपली काड्या करण्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळालेली आहे. त्याचा ते पुरेपूर वापर करतीलच. कधी काळी त्यांनीच बारसूची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूचवली होती. परंतु कोलांट्या मारण्याच्या बाबतीत ठाकरे देशातील कोणत्याही राजकारण्याशी स्पर्धा करण्या इतके वाकबगार झाले आहेत. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याची कला त्यांना साध्य झालेली आहे.

हे ही वाचा:

दंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ११ जवान शहीद

एक किलो गांजाच्या तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या तंगाराजूला फाशी

मल्याळी अभिनेता उन्नी मुकुंदनला ४५ मिनिटांत मोदींनी भारावून टाकले!

 ‘मन की बात’ संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम

 

इथे कसोटी कोकणातील लोकांची लागणार आहे. आंबा-काजूच्या चिंतेने जे लोक रिफायनरीचा विरोध करीत आहेत, त्यांनी गुजरातच्या रिलायन्स रिफायनरीची माहिती जरुर घ्यावी. या रिफायनरीच्या परीसरात आंब्याची हजारो कलमे आहेत. इथे आंब्यांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते.

निसर्गाचे नुकसान होणार असल्याचा तथाकथित पर्यावरणवाद्यांचा प्रचार हाणून पाडणारी याशिवायही कैक उदाहरणे जगात आहेत. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. या देशात एकून १३५ बड्या रिफायनरी असून त्यांचा पसारा एकूण ३० राज्यात पसरलेला आहे. कधी काळी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा प्रचंड लोकप्रिय होती. आज घडीला कॅलिफोर्नियामध्ये १५ सक्रीय रिफायनरी आहेत. तंत्रज्ञानाच्या कृपेमुळे आज रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात ठेवणे शक्य आहे. ठाकरे यांच्यासारखे नेते हे कधीही सांगणार नाहीत. कारण शक्य तिथे राजकीय पोळी भाजणे हा त्यांचा उद्योग आहे. कोकणातील जनतेने अशा राजकारण्यांपासून सावध होण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा