चॅनलचा बूम तोंडासमोर आला की अनेकांना चेव येतो, त्यात जर साहित्यिक मंडळी असली तर प्रस्थापितांना आव्हान देणारा विद्रोही जागा होतो. मग अनेकांना शाब्दिक वांत्या होऊ लागतात. ऐकणाऱ्याला मळमळू लागेल इतपतो बोलून लागतात. चीन आणि पाकिस्तानबाबत हळहळ आणि कळकळ व्यक्त करत प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी अशाच वांत्या केल्या आहेत. लोकशाही मार्गाने मतपेटीच्या माध्यमातून सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना हरामखोर आणि पर्यायाने त्यांना निवडून देणाऱ्या जनतेला मूर्ख ठरवले आहे.
नेमाडे यांना ‘हिंदु जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. अर्थात हा पुरस्कार मिळवणाऱ्या लेखकाकडे किमान वैचारिक उंची आहे, अशी अपेक्षा जनता करू शकते. परंतु अशी मंडळी जेव्हा वैचारिक कोलांट्या मारू लागतात आणि आपली वैयक्तिक खदखद विचारांच्या नावाने लोकांच्या माथी मारतात तेव्हा अशा मंडळींची कीव वाटू लागते.
लोक असेच मूर्ख राहिले तर सरकार असेच येत राहणार. लोकांना कळत नाही की आपण कशा प्रकारच्या लोकांना निवडून देतो. आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, असे मत नेमाडे यांनी एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले आहे. ध्रुवीय प्रदेशात बेडकांची जमात आढळते. तिथे तापमान गोठण बिंदूपेक्षा खूप कमी झाल्यानंतर जलस्त्रोत गोठतात. तेव्हा ही बेडकं सुद्धा सुप्तावस्थेत जातात. वैज्ञानिक भाषेत याला हायबरनेशन म्हणतात. काही काळानंतर पाणी वितळायला लागल्यानंतर ती पुन्हा सक्रीय होतात. महाराष्ट्रात सुमारे तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार मागल्या दाराने दाखल झाले होते तेव्हा काही साहित्यिक मंडळी त्याच बेडकांसारखे मृतवत झाले होते. त्यांच्या हालचाली बंद झाल्या होत्या. आवाजही बंद झाले होते.
आजूबाजूला आवाज उठवण्यासारखं बरंच काही घडत होते, तेव्हा ही मंडळी शहामृगासारखी वाळूत मान खूपसून बसली होती. भाजपासोबत युती करून लढलेले उद्धव ठाकरे काँग्रेसच्या वळचळीला गेले तेव्हा नेमाडे यांना राजकीय नेते हरामखोर असतात याचा साक्षात्कार झाला नाही. अडीच वर्षे सत्ताधारी पक्षाचे गुंड सोशल मीडियावर टिप्पणी केली म्हणून लोकांना झुंडीने बदडत होते, पोलीस लोकांवर खोट्या केसेस दाखल करत होते, निरपराधांना तुरुंगात डांबलं जात होतं, मनसुख हिरनसारख्या लोकांची हत्या होत होती तेव्हा नेमाडे नेमके कुठल्या गुहेत लपले होते? नेमाडे तेव्हा एकाही शब्दाने सरकारचा निषेध करताना दिसले नाहीत. ते खोक्यांबाबतही बोलले. बहुधा त्यांना खोक्यांचा प्रचंड त्रास होतोय. उद्धव ठाकरे कोणत्याही उद्योग धंद्या शिवाय मातोश्री २ कुठून उभारतायत असा प्रश्न त्यांना का पडला नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलताना सत्ताधारी पक्षांचे नेते महीलांशी जे असभ्य गुंडासारखे वर्तन करत होते ते नेमाडे यांच्या चाणाक्ष नजरेतून कसे सुटले हेही आश्चर्य आहे. संजय राऊतांच्या शिव्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या दिसत नाही. हरामखोर भडवा दलाल या शब्दांना पत्रकार परिषदांमध्ये स्थान देणाऱ्या संजय राऊतांचे प्रताप नेमाडे यांच्यापर्यंत आलेच नाहीत का? कि या मंडळींच्या हरामखोरपणाला नेमाडे यांनी साहित्यिक अभय प्रदान केले आहे.
नेमाडे कोणत्या शाळेत शिकले ही माहिती उपलब्ध नाही, परंतु तुकाराम महाराजांचे आणि एकनाथ महाराजांचे गुरू हे सुफी संत होते हा इतिहास त्यांना कोणी शिकवला कोण जाणे. जनतेच्या माथी अशी तद्दन खोटी माहिती ज्या आत्मविश्वासाने नेमाडे मारतात त्याचे कौतुकच करायला पाहिजे. देशात फॅसिझम वाढतो आहे, हा अशा टीपिकल पुरोगाम्यांचा आवडता सिद्धांत आहे. शेजारच्या देशांशी युद्ध हे देखील आपल्या देशात चुकीचे आहे, असे नेमाडे बोलतात तेव्हा हा माणूस डोक्यावर पडला की काय अशी शंका येते. भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान आणि चीनने आपल्यावर आक्रमण केले. देशाची भूमी बळकावली. हा इतिहास आहे. शाळकरी मुलांना माहीत असलेला हा इतिहास नेमाड्यांना माहीत नसेल तर त्यांचा पुन्हा एकदा अज्ञानपीठ पुरस्कार दैऊन गौरव केला पाहिजे.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू
शिवसृष्टीसाठी सरकारचे लाखमोलाचे सहाय्य
आपल्या देशात युद्धाचे वातावरण आहे. जिंगोइझम अर्थात युद्धखोर वृत्ती. पाकिस्तानात आपल्यासारखीच माणसं आहेत. आपल्यासारखीच गरीब. पण यातलेच अनेक गरीब शस्त्रसज्ज होऊन जिहादच्या नावाखाली गेली अनेक दशके निरपराधांचे रक्त सांडतायत हे बहुधा नेमाड्यांपर्यंत आलेले नाही. तेव्हा हे नेमकं कुठे तोंड खुपसून बसले होते याचे संशोधन व्हायला हवे. म्हणे चीनमध्येही असेच गरीब लोक आहेत, ते आपले शत्रू नाहीत त्यांचे सैनिक जे करतात तेच आपले सैनिक करतात, असे म्हणून नेमाडे यांनी आपल्या जवानांना आक्रमक चीनसोबत बसवले आहे.
जय जगत ची घोषणा देण्याची गरज आहे. नॅशनॅलिझममुळे आपलं फार नुकसान होते आहे. हे सांगताना त्यांना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानची आठवण झाली. परंतु विश्वाचे कल्याण करण्याची प्रार्थना ज्या मातीत करण्यात आली त्याच मातीत छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमकांविरोधात तलवार का उचलावी लागली, हिंदवी स्वराज्य स्थापन का करावे लागले याचे उत्तर या पुरोगामी पोंगा पंडितांकडे नाही.
अरुणाचल किंवा ल़डाखमध्ये चीनी सैनिक घुसले की संजय राऊत यांच्यासारखे भंपक मोदी सरकारला दोष देतात. त्यांचा बंदोबस्त केला तर नेमाडेंसारखे अडाणी नॅशनलिझमच्या नावाने ठणाणा करतात. पुन्हा हे दोन्ही अतिशहाणे एकाच गँगमध्य आहेत जी सतत मोदींच्या नावाने गळा काढत असते. भारतील लोकशाही अत्यंत प्रगल्भ आहे. जनतेला मूर्खात काढून लोकशाहीचा बाजार उठवणाऱ्या नेमाडेंसारख्या मुखंडाना योग्य शब्दात उत्तर देण्याची गरज आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)