उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दम देण्याच्या मुडमध्ये दिसतायत. कोणी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला तर मकोका लावायला मी मागे पुढे पाहणार नाही, असा दम त्यांनी दिलेला आहे. बीड जिल्हा विकास आणि नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत अजित पवार यांचे हे विधान आहे. या बैठकीत आमदार आणि अधिकारी उपस्थित असतात. सवाल हा निर्माण होतो, की अजित पवारांनी हा दम नेमका कुणाला दिला? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मामला थंड व्हावा, यासाठी बरेच जण सध्या प्रयत्नशील आहे. हा खरे तर तपासाचा मामला परंतु यात संत-महंत सुद्धा उतरलेले आहेत.
महंत नामदेव शास्त्री यांनी भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही दिलेली आहे. नामदेव
शास्त्रींच्या स्वच्छता प्रमाणपत्रानंतर प्रश्न हा निर्माण होतो, की वाल्मिक कराडला असे एखाद्या संताने प्रमाणपत्र दिले असते, किंवा भगवान गड वाल्मिकच्या पाठीशी उभा राहीला असता तर वाल्मिक कराड निर्दोष ठरला असता का? देवाला कौल लावून एखाद्याला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याची प्रथा असू शकेल, परंतु न्यायनिवाडा न्यायालयात होतो, घटनेने जे कायदे केलेले आहेत, त्यानुसार होतो. संत-महंतांमध्ये अलिकडे भोंदूंचा सुळसुळाट झालेला आहे.
स्वत:ला शंकराचार्य म्हणवणारे अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात आले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पाय धुतले. सेवेवर संतुष्ट होऊन महाराजांनी त्यांना मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद दिला. नंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांच्या सेवेवरही ते प्रसन्न झाले. शिंदेंनाही त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आशीर्वाद दिला. प्रत्यक्षात दोघेही मुख्यमंत्री झाले नाहीत, ज्यांना जनतेचा आशीर्वाद होता ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या तथाकथित संत-महंतांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. अजित दादा आणि धनंजय मुंडे हे दोघेही प्रतिमा सुधारण्यासाठी चेहरा साफ
करण्याचे सोडून आरसा साफ करण्याचे काम करतायत. मुंडे स्वत: म्हणाले आहेत, की माझा राजीनामा महत्वाचा की संतोष देशमुख यांना न्याय? खरे तर संतोष देशमुख यांना न्याय देणे आता कुणालाही शक्य नाही. ते कारण त्यांना
आधीच संपवण्यात आले आहे. न्याय त्यांच्या कुटुंबियांना देता येईल. वाल्मिक कराडचा आका जोपर्यंत गजाआड होत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही.
मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे, कोणाला ठेवायचे नाही, हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो. परंतु आघाडीचे नियम वेगळे असतात. आघाडीतील पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला मंत्री करायचे, कोणाला वगळायचे याचा
निर्णय घेतो. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची फडणवीसांची इच्छा होती. तरीही भुजबळ मंत्रिमंडळाबाहेर आहेत, या उदाहरणावरून हे स्पष्ट व्हावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेचा निर्णय पूर्णपणे अजित पवारांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपवलेला दिसतो. अजित दादा जो निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असणार आहे. त्यामुळे अजितदादांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आपण आपल्या आमदारांना कसे दमात घेतो हे दाखवण्याचा मोह
अजितदादांना झालेला आहे.
डीपीडीसीच्या बैठकीत आमदारांसमोर त्यांनी ही दमदाटी करावी, यातून एक गोष्ट स्पष्ट आहे. काही आमदार खंडणी घेतात हे त्यांना माहिती आहे. परंतु असे हवेत तीर चालवण्यात काय अर्थ आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडून तीन कोटीची खंडणी मागितली. हा सौदा मुंडे यांच्या बंगल्यावरच झाला, असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी
केलेला आहे. त्यांनी काही नावे घेतलेली आहेत. ही बैठक झाली की झाली नाही, हे शोधणे एखाद्या नवशिक्या पोलिस अधिकाऱ्यालाही शक्य आहे. बऱ्याच गोष्टी असतात, जिथे तिथे कॅमेरे लागलेले असतात, त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन
असते. बंगल्यावरच्या कर्मचाऱ्यांचा जबाब घेणे शक्य असते. खणून काढण्याची इच्छा असेल तर हे सगळे संभव असते. ज्यांना झाकून ठेवायचे असते, ते कसे काय, छडा लावणार?
हे ही वाचा:
देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार
सैफ हल्ला प्रकरणात अटकेतील आरोपी आणि सीसीटीव्हीमधील व्यक्ती एकचं!
‘आप’ भ्रष्टाचारी है… म्हणत आम आदमीच्या आमदाराचा राजीनामा
ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले
आईला एक वेळ पोटचा पोरगा बाहेर काय दिवे लावतो ते माहीत नसेल, परंतु पक्षाच्या नेत्याला आपले आमदार किती पाण्यात आहे, त्यांचे हात आणि चेहरे किती बरबटलेले आहे, कोणता पैसा वापरून ते पक्षाच्या सभा, मेळाव्यांची
व्यवस्था करतात, सिनेमाच्या पडद्यावरच्या देखण्या नायिकांना बोलावून इव्हेंट कसे घेतात, हे सगळे ठाऊक असते.
अविमुक्तेश्वरानंद जसे आशीर्वाद वाटत फिरतात, तसे अजितदादा दम देत फिरतायत. ना अविमुक्तेश्वरानंदांच्या आशीर्वादाला अर्थ ना यांच्या दमबाजीला. अजितदादांनी कानउघाडणी केली, दम दिला, असे मथळे माध्यमांनाही मिळतात.
वाचकांना बातमी मिळते. प्रत्यक्षात साध्य काय होते तर काहीच नाही.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. जर तो मिळाला नाही, तर लोकांचा कायद्याच्या राज्यावरचा विश्वास संपुष्टात येईल. दादांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांची प्रतिमा उजळून निघेल. तेलगी प्रकरणाची धग आपल्यापर्यंत येईल हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनीही छगन भुजबळांचा राजीनामा घेतला होता. गोवारी हत्याकांड प्रकरणात त्यांनी मधुकर पिचडांचा राजीनामा घेतला होता. स्वत:ची चामडी वाचवण्यासाठी एखाद्या नेत्याचा गेम करताना मागे पुढे पाहायचे नाही, हा पायंडा थोरल्या पवारांनी पाडलेला आहे. ती परंपरा तरी दादांनी लक्षात घेतली पाहिजे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)