देवगिरीचे रहस्य

देवगिरीचे रहस्य

महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दोन्ही बाजूच्या १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. शपथविधी होणार याची आपल्याला कल्पना असली तरी अजून याबाबत मला अधिकृत निमंत्रण आलेले नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले होते. परंतु आज सकाळी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, ते मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले.

अडीच वर्षांपूर्वी एका पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून शपथ घेतली होती. त्यामुळे फडणवीस आणि अजित दादांचे समीकरण किती घट्ट आहे हे पहिल्यांदा उघड झाले होते. परंतु हे समीकरण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कंठाशी येऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार जी भूमिका घेतायत, त्याच्या पेक्षा वेगळी किंबहुना त्या विरोधात भूमिका घेताना अजित दादा दिसतात. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मागे जेव्हा ED चा फेरा लागला होता. तेव्हा शरद पवार पूर्ण ताकदीने राऊतांच्या पाठीशी उभे होते. परंतु त्याच काळात अजित दादा यांचे विधान आठवा. ED चे अधिकारी सारखे सारखे संजय राऊतांच्या घरी का जातात, याचे उत्तर तेच देऊ शकतात असे अजित दादा म्हणाले होते. त्यांची ही प्रतिक्रीया अत्यंत बोचरी होती. अजित पवार आणि त्यांच्या बहीणींवर ED ने छापेमारी केली. परंतु तरीही अजित पवार या कारवाईबद्दल कधी अवाक्षराने बोलले नाहीत. ED ची कारवाई राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, या शरद पवारांच्या मताला दुजोरा देणारे विधान त्यांनी केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर त्यांनी कधीही संजय राऊत स्टाईलची आगपाखड केली नाही.

हे ही वाचा:

मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिठाचा खडा

बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीशकुमार सत्तेतून बाहेर

खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

राहुल गांधी हीच का तुमची लोकशाही ?

 

एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात होते ही बाब आता आता उघड होते आहे. परंतु अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळीक तर आळंदी येथील जाहीर कार्यक्रमात अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. आळंदी येथील शिळास्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आलेल्या मोदींनी याच कार्यक्रमा दरम्यान दादांच्या खांद्यावर दोनदा हात ठेवला. त्यानंतर राजभवनात होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोदी त्यांना स्वत:च्या हेलिकॉप्टरमधून घेऊन गेले. हे चित्र थोरल्या पवारांना सुखावणारे निश्चितपणे नाही. शिवसेनेत जशी उभी फूट पडली तशी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. आणि जर अशी फूट पडली नाही तर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार शिवसेना – भाजपाच्या सरकारला बाहेरुन मजबुती देतील अशी शक्यता आहे.

भाजपा नेत्यांशी त्यांचे संबंध किती घट्ट आहेत याचे संकेत देणारा प्रसंग काही दिवसांपूर्वी घडला. महाविकास आघाडीच्या ४० पैकी १८ मंत्र्यांनी त्यांचे बंगले सोडले नसल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली, त्याच वेळी अजित पवारांना देवगिरी बंगला बहाल करण्यात आल्याचेही वृत्त आले. मलबार हिल येथील आलिशान बंगले सर्वसामान्यांना फक्त बातम्यांमध्ये दिसतात. परंतु हा मुंबईतला स्वर्ग आहे. देवगिरी बंगल्याची चर्चा अगदी ताजी आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना देवगिरी हे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी हा सर्वात मोठा बंगला आहे. सत्ताधारी पक्षातील मातब्बर मंत्र्याला हा बंगला देण्याची परंपरा आहे. उपमुख्यमंत्री पदी असताना गोपिनाथ मुंडे हे याच बंगल्यात राहायचे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार या बंगल्यात निवासाला होते. परंतु सत्ताधारी पक्षाशी कायम नाते सांगणारा हा बंगला, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना बहाल करण्यात आला आहे.

हा निर्णय निश्चितपणे काही संकेत देणारा आहे. फडणवीस आणि अजित पवारांमध्ये कुछ तो ऐसी बात है जिस की पर्दादारी है… भविष्यात काय होईल माहीत नाही, तूर्तास तरी देवगिरीचे हे रहस्य उत्कंठा वर्धक बनत चालले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version