रुद्रावतार दाखवून नामोहरम करून गेला ‘एकटा देवेंद्र’…

रुद्रावतार दाखवून नामोहरम करून गेला ‘एकटा देवेंद्र’…

आज विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. संपूर्ण अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रावतार दाखवून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना ‘एकटा देवेंद्र काय करणार…?’ असा प्रश्न काही दिवसांपूर्वी पडला होता. सत्ताधाऱ्यांची अवस्था पाहून सुप्रीया सुळे यांना त्यांच्या प्रश्नाचे चोख उत्तर मिळाले असणार.

विरोधी पक्षनेता म्हणून या संपूर्ण अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अत्यंत आक्रमकपणे वावरले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना अंगावर घेत त्यांनी एकत्र लोळवले. जबरदस्त आवेशाने ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. जेव्हा जेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा फडणवीसांनी विविध संसदीय आयुधे वापरून समोरच्यांच्या ठिकऱ्या उडवल्या. आक्रमक पण तर्कपूर्ण भाषा वापरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या तोफखान्यासमोर बावचळलेले दिसले, तर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तोंडाला त्यांनी फेस आणला. उपमुख्यमंत्री अजित दादा, अनिल परब, नाना पटोले कोणीही त्यांच्या माऱ्यातून वाचले नाहीत. कोणीही त्यांच्यासमोर टीकाव धरू शकले नाहीत. मनसुख हिरेन प्रकरणात त्यांनी ठाकरे सरकारची प्रचंड कोंडी केली. फडणवीसांची तयारी जबरदस्त होती. एफआयआरच्या प्रती, सुप्रीम कोर्टाचे निवाडे, आवश्यक दस्तैवज असा सगळा दारुगोळा त्यांच्याकडे होता. विरोधक कोणता मुद्दा उपस्थित करू शकतात याचा नेमका अंदाज त्यांना होता.

हे ही वाचा:

पवारांच्या नाराजीच्या पुड्या…

अँटिलीयाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो मधल्या स्फोटकांबाबात सभागृहात बोलताना एकीकडे फडणवीस या प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरेन याच्या जीवाला धोका असल्याबाबत बोलतात काय आणि तासाभरात त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडतो काय, असा थरार या सभागृहाने अनुभवला.

फडणवीस यांच्याकडे असलेला माहीतीचा तपशील ऐकून क्राईम ब्रँचचे अधिकारीही अवाक झाले. एपीआय सचिन वाझे यांच्यावर त्यांनी नाव घेऊन आरोप केले. ‘वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून केला’ असल्याचा विमला हिरेन यांचा टाहो, जनतेला ऐकू आला तो फडणवीस यांच्या मुळेच. वाझे यांचे मनसुख हिरेन यांच्याशी पूर्वीपासून संबंध असल्याचा गौप्यस्फोट करून फडणवीस थांबले नाही, त्यांनी दोघांच्या संभाषणाचा सीडीआरच सत्ताधाऱ्यांच्या तोंडावर फेकला. ‘सीडीआर फडणवीसांकडे कसा आला?’, असा सवाल करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना पटोले यांना ‘हिंमत असेल तर करा माझी चौकशी, पण आधी खूनाची चौकशी तर करा’, असे सांगून गप्प केले.

खासदार महेश डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या पत्राचा उल्लेख करून फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न अनिल परब यांनी करून पाहीला, तेव्हा ‘माझ्याकडेही आहे ते पत्र, दाखवा कोणाची नावे आहेत ती’, असे आव्हान देऊन त्यांनी थंड केले.

हे ही वाचा:

वाझे हे लादेन नाहीत…उद्धव ठाकरेंचे प्रशस्तीपत्र

 

मंगळवारी फडणवीसांचा रुद्रावतार पाहून मुख्यमंत्री आपल्या चेंबरमधून बाहेरच आले नाहीत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करून गृहमंत्र्यांनी फडणवीसांना दाबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खोटे आरोप करून विशेषाधिकाराचे हनन केल्याचे संसदीय अस्त्र काढून फडणवीसांनी देशमुखांना  केवळ गप्पच केले नाही, तर त्यांना सुप्रीम कोर्टाचा निकाल दाखवून त्यांच्या काळात झालेला पोलिस तपास योग्यच होता हे सिद्धही केले.

केवळ बेछूट आरोप करून समोरच्याला नामोहरम करता येत नाही, त्यासाठी तुमच्याकडे भक्कम कागदपत्र, पुरावे आणि माहिती असावी लागते याची जेवढी समज फडणवीसांनी दाखवली, त्याच्या आसपासही सत्ताधाऱ्यांना दाखवता आली नाही.

अधिवेशनाच्या आधी विरोधकांनी संजय राठोड याची विकेट घेतली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एपीआय वाझे यांची बदली झाली. हे अधिवेशन सरकारला जड गेले. एपीआय वाझेमुळे हे सरकार जाऊ शकते असा टोला फडणवीसांनी लगावल्यामुळे ठाकरे सरकारची धडधड वाढली असणार. १७० आमदारांचे संख्याबळ असलेल्या या सरकारला फडणवीसांनी नामोहरम केले.

वाझेंना वकीलाची गरज नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची वकीली करतायत, या शब्दात त्यांनी केलेले वस्त्रहरण मुख्यमंत्र्यांची झोप उडवणारे आहे.

Exit mobile version