पंतप्रधान नरेंद्र मोदी काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूरात होते. निमित्त होते माधव नेत्रायलयाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचे. पंतप्रधान पदावर पोहोचलेला एक संघाचा स्वयंसेवक एका कार्यक्रमानिमित्त आपल्या मातृसंघटनेच्या मुख्यालयात गेला. ही घटना महत्त्वाची, असली तरी आश्चर्यकारक निश्चितपणे नाही. परंतु काही लोकांनी या भेटीला आश्चर्यकारक बनवण्याचा प्रयत्न मात्र केला. काहींनी त्याचा संबंध मोदींच्या चौथ्या टर्मशी जोडला. काही लोकांनी त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली. संघ गेली शंभर वर्षे देशात काम करतोय. अनेक जण असे आहेत, ज्यांची हयात संघाला शिव्या देण्यात गेली. परंतु त्यांना संघ काय हे मात्र कळले नाही.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची ही तिसरी टर्म. २०२९ नंतर ते पंतप्रधान राहतील का? त्यांना चौथी टर्म मिळेल का? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. काही लोक भाकीतांच्या माध्यमातून त्याची चाचपणी करण्याचा प्रयत्न करतायत. मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे भाकीत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केलेले आहे. राऊत हे बुडीत निघालेल्या एका पक्षाचे नेते, प्रवक्ते, खासदार आहेत. त्यांनी हा पक्ष बुडीत जाण्यापासून वाचेल कसा याची काळजी घेण्याचे सोडून ते जगातील सगळ्या विषयांची चर्चा आणि चिंता करीत असतात. केवळ पत्रकारांसमोर वावरणारे, मिरवणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे वारसदार हा त्यांच्या चिंतेचा खरा विषय असायला हवा. अगदी फारच चिंता प्रसवत असेल तर राष्ट्रवादी शपचा वारस कोण असेल किंवा राहुल गांधीनंतर काँग्रेसचा वारसा चालवण्यासाठी पक्ष शिल्लक राहील काय? याची चिंताही ते करू शकतील. परंतु हे करायचे सोडून ते विनाकारण भाजपाच्या फाटक्यात पाय घालण्याचा प्रयत्न करतायत.
देशातील पक्ष म्हणजे काही कुटुंबांची मालकी असलेली राजकीय दुकाने आहेत. उबाठा शिवसेना ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड, राष्ट्रवादी शप पवार प्रायव्हेट लिमिटेड, काँग्रेस म्हणजे गांधी प्रायव्हेट लिमिटेड. तशी वेळ अद्यापि भाजपावर आलेली नाही. दिनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर पक्षाची धुरा अटल बिहारी वाजपेयी यांनी समर्थपणे सांभाळली. अटलजींचे नेतृत्व ऐन भरात असताना लालकृष्ण आडवाणी यांनी पक्षाला नेतृत्व दिले. वाजपेयीनंतर कोण हा प्रश्न तर फार अवघड होता. नरेंद्र मोदी हा लोकांना आशेचा किरण वाटत होता. परंतु ते पंतप्रधान होतील, याचा विचार किती जणांनी केला होता? ते मोदी आजवरचे सर्वात यशस्वी पंतप्रधान ठरले आहेत. प्रत्येक नेता आधीच्या नेत्यापेक्षा चार पावले पुढे होता. संघ असो वा भाजपा दोन्ही ठिकाणी निर्णय प्रक्रिया सामुहिक असते. प्रत्येक यश-अपयशाबाबत चिंतन होते. त्यातून योग्य तो धडा घेऊन पुढची रणनीती ठरवली जाते. इतके मोठे संघटन आहे, अनेक दिग्गज नेते आहेत, तिथे वारसदार कोण या प्रश्नाचे उत्तर शोधणे फार कठीण नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आज ७४ आहे. पंचहात्तरीनंतर निवृत्त व्हावे असा एक संकेत त्यांच्याच कारकीर्दीत भाजपामध्ये रुजला. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी हे नेते वानप्रस्थात गेले. त्यामुळे मोदी ७५ नंतर निवृत्त होतील काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. मोदींनी त्याचा विचार केला नसेल असे म्हणता येणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही, हे त्यांनाही माहिती आहे.
संजय राऊतांनी मोदींच्या वारसदाराबाबत केलेले विधान म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या आरत्या ओवाळण्याचा प्रकार आहे. त्या ओवाळल्यानंतरही फडणवीसांनी राऊतांना ओवाळणी घातली नाही, ही बाब वेगळी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो… अशा आरत्या ओवाळण्याची रणनीती स्वीकारली आहे. राऊतांनी तिच लाईन घेतलेली आहे. मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल असे राऊत म्हणाले असतील तर त्यांना फडणवीसच अभिप्रेत आहेत, हे समजायला फार मोठी राजकीय समज असण्याची गरज नाही. महाराष्ट्र भाजपाकडे सध्या तरी दुसरे नाव नाही.
फडणवीस यांनी २०२९ मध्ये मोदीच नेतृत्व करतील असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ते मुरलेले राजकारणी आहेत. ज्यांचे नाव चर्चेत असते ते यादीत कधीच नसते हे फडणवीसांना ठाऊक आहे. किंबहुना अनेकदा एखाद्यांचा पत्ता कापायचा असेल तर त्याच्या नावाची अधिकाधिक चर्चा करा, ही रणनीतीही नवी नाही. फडणवीस हे जाणून आहेत. सोव्हीएत रशियाचा नेता जोसेफ स्टॅलिन याची ती कथा फडणवीसांना माहित असावी. एकदा स्टॅलिनने पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले, की आता माझे वय झाले आहे. माझ्यानंतर पक्षाची जबाबदारी कोण सांभाळणार याचे उत्तर शोधण्याची वेळ आलेली आहे. सांगा माझ्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळू शकेल ? ज्यांना स्टॅलिन माहिती होता, ते कोरा चेहरा करून बैठकीत बसून राहीले. नेतृत्वासाठी उतावीळ झालेल्या तीन जणांना हात वर केला. स्टॅलिननंतर पक्षाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. त्या दिवसानंतर ते तिघे पुन्हा कधीही दिसले नाहीत.
हे ही वाचा..
दहशतवादी हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्याची कराचीत गोळ्या घालून हत्या
झोपताना मोबाईल बघताय, निद्रानाश होणारच
म्यानमारच्या भूकंपात १७०० जणांचा मृत्यू
व्हायरल गर्ल मोनालिसाला ऑफर देणारा दिग्दर्शक निघाला बलात्कारी
मोदी हे स्टॅलिन नाहीत, भाजपामध्ये हुकूमशाही नाही. तरीही एक नेता यशस्वीपणे पक्ष आणि देश चालवत असताना त्याच्या वारसदाराची चर्चा होणे, त्याला रुचण्याची शक्यता कमी असते. भविष्यात काहीही होऊ शकते. मोदी ७५ नंतर पायउतार होऊ शकतात. जोपर्यंत देशाच्या जनतेची इच्छा आहे, तोपर्यंत ते नेतृत्व देऊ शकतात. जनतेची इच्छा मतपेटीतून व्यक्त होत असतेच. परंतु इथे भाजपाचे म्हणजे पर्यायाने देशाचे नेतृत्व निश्चित करणारा संघ नावाचा आणखी एक घटक सुद्धा आहे. हे मोदींनाही ठाऊक आहे. संघटन हे व्यक्तिच्या तुलनेत अधिक स्थायी आणि शाश्वत असते. त्यामुळे मोदींना असलेली वयाची मर्यादा संघाला नाही. संजय राऊतांना वारसदाराची बत्ती लावताना संघालाही गुळ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे न समजण्या इतके संघाचे नेते दुधखूळे नाहीत.
संजय राऊतांचा मुद्दा त्यांच्या सारखाच अदखल पात्र आहे. परंतु नेतृत्वाचा मुद्दा आज ना उद्या भाजपा आणि संघा समोर येणार ही बाब निश्चित आहे. वय ही मानवी मर्यादा आहे. त्यामुळे हा प्रश्न कधी तरी ऐरणीवर येणार. भाजपा वा संघाच्या दृष्टीने हा काही फार गुंतागुंतीचा किंवा कठीण सवाल नाही. कारण इथे नेतृत्वाचा दुष्काळ नाही. देशाचे भले करण्याची क्षमता असलेले बरेच पर्याय आहेत. मोदींनी त्यांच्या मेहनतीने, बुद्धीमत्तेने पंतप्रधान पदाचे निकष अधिक कठोर बनवले आहेत. त्यांचा वारसदार हा त्यांच्यापेक्षा कणखर, अधिक कडवा हिंदुत्वनिष्ठ असावा अशी जनतेची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. परंतु जोपर्यंत मोदींचे शरीर, मन, बुद्धी आणि नेतृत्व खणखणीत आहे, तोपर्यंत तो वारस कोण असेल याचा विचार करण्याची गरज नाही. संजय राऊतांना तर नाहीच नाही. त्यांनी उबाठा शिवसेनेला अधिक बुडवता कसे येईल त्याबाबत चिंता आणि विचार करावा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)