25 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरसंपादकीयहे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित...

हे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित…

फडणवीसांच्या स्मिताच्या आडही अशी अनेक रहस्य आणि वादळं लपलेली आहेत

Google News Follow

Related

आझाद मैदानात काल गुरुवारी महायुती-२ चा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या पाठोपाठ शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेताना ते जे काही म्हणाले ते महत्वाचे आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही नावे घेतली. फडणवीसांनीही ईश्वर साक्ष शपथ घेतली. अजित पवारांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. त्यामुळे शिंदेंचे वेगळेपण उपस्थितांच्या चटकन लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. देवेंद्रांच्या गूढ स्मिताआड या शपथेचे रहस्य दडलेले आहे. हे स्मित मोनालिसाच्या स्मिता इतकेच गूढ आहे.

नवी दिल्लीतील बैठकीनंतर भाजपा-शिवसेना यांच्यात रस्सीखेच असल्याचे चित्र निर्माण झाले. कदाचित हे चित्र रंगवण्यात माध्यमांना जास्त रस होता. त्यामुळे ते आभासी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शिवसेनेचा एकही नेता वेडंवाकडे काही बोलत नव्हता. तरी सुद्धा शिंदे यांची नाराज प्रतिमा निर्माण करण्यात माध्यमांना यश आले असे म्हणता येईल. हे कितपत खरे होते कि या निव्वळ वावड्या होत्या हे आता ‘धर्मवीर-३’ मध्ये स्पष्ट होईलच. कारण एकनाथ शिंदे यांना जे काही म्हणायचे आहे, सांगायचे आहे ते त्यांनी त्यांचा बायोपिक असलेल्या ‘धर्मवीर’च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुधा ही प्रेरणा त्यांनी शरद पवारांपासून घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरीत्राच्या माध्यमातून मविआचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या होत्या. चाणाक्ष वाचक ‘लोक माझे
सांगाती’च्या तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. शरद पवार ज्या प्रमाणे आत्मचरित्रातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात, तसेच शिंदे ‘धर्मवीर’च्या माध्यमातून आपला प्रवास सांगत असतात. अनेकदा प्रतिस्पर्ध्यावर बाण चालवण्यासाठीही ते या बायोपिकचा वापर करताना दिसलेले आहेत.

शिंदेंना उपमुख्यमंत्री केल्यामुळे त्यांचे काही समर्थक निश्चितपणे दुखावले गेले आहेत. ते असा दावा करतायत की एकनाथ शिंदे यांना भाजपाने वापरून घेतले. त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की, एकनाथ शिंदे यांनीही अडीच वर्षांचे
मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी १०६ आमदार असलेल्या भाजपाला वापरले होते. आमदारांची सर्वाधिक संख्या असताना भाजपाला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली असती. उद्धव ठाकरे यांनी हे पद त्यांना कधीही दिले नसते. एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि अमित शहा यांचे नाव घेऊन स्पष्ट केले. की ते आपले बॉस आहेत. भाजपाशी आपली बांधिलकी आहे. भाजपाशी जुळवून घेत ते यापुढे वाटचाल करणार आहेत. युती किंवा आघाडीत असताना जेव्हा तुमच्या पक्षाचे बळ कमी असते, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसतो. भाजपाने शिवसेनेशी जेव्हा युती केली तेव्हा अनेकदा असे कडवट घोट प्यायले आहेत. एकनाथ शिंदे यांनी एक शिवसैनिक, शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून तो काळही पाहिला
असणार.

हे ही वाचा:

काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखाली सापडले ५० हजार रुपयांचे बंडल, चौकशीचे आदेश!

ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…

शिंदेंनी पहिल्यांदा तर अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

२०१९-२०२२ मध्ये संधी हुकली, पण यंदा जनतेने फडणवीसांना अविश्वसनीय बहुमत दिलं!

ज्या ठाण्याची शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आज चर्चा होते. त्या ठाण्यातून रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथराव पाटील, राम कापसे हे भाजपाचे दिग्गज लोकसभेवर जायचे. ही जागा शिवसेनेने भाजपाकडून हिसकावली होती. युती ऐन भरात असताना हे घडले होते. जसा काळ बदलतो, तसे राजकारण ही बदलत असते. त्यात डोक्याला शॉट लावून घेण्याची फार गरज नसते. देवेंद्र मंत्रिमंडळात एक मंत्री असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांशी मुख्यमंत्र्यासारखेच बोलत होते. वागतही होते. गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाचर मारली
होती. फडणवीसांनी त्याचा कधी बाऊ केला नाही. मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार त्यांनी मंत्री म्हणून मोठ्या मनाने स्वीकारला. तरीही एकाच मंत्रिमंडळात असलेल्या भाजपा-शिवसेनेचे संबध मैत्रीपूर्ण आहेत, देवेंद्र आणि एकनाथ यांचे संबंध मधुर आहेत, असाच मेसेज बाहेर जात होता, त्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या परिपक्वपणाला, काहीही पचवण्याच्या त्यांच्या क्षमतेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मितहास्याला आहे.

फडणवीसांचे स्मित हास्य ‘मोनालिसा’च्या तुलने कमी गूढ नाही. लिओनार्दो दा विंची ने काढलेल्या ‘मोनालिसा’च्या चित्रापेक्षा
कितीतरी अदभूत कलाकृती आहेत. परंतु ‘मोनालिसा’ केवळ तिच्या चेहऱ्यावरील गूढ स्मितामुळे जगभरातील रसिकांच्या कौतुकाला आणि उत्कंठेला पात्र ठरले. हे रहस्य उलगडता उलगडता दिग्गजांचे तर्क थकले. असे म्हणतात या अवखळ
चेहऱ्याच्या ‘मोनालिसा’ने हृदयात अनेक रहस्य दडलेली आहेत. तेच गूढ तिच्या त्या अवखळ स्मितातून व्यक्त झाले आहे. फडणवीसांच्या स्मिताच्या आडही अशी अनेक रहस्य आणि वादळं लपलेली आहेत. भविष्यात ते ‘लोक माझे सांगाती’ किंवा ‘धर्मवीर’ सारख्या माध्यमातून ही वादळे उघड करणार की नाही हे त्यांनी स्पष्ट करायला हवे.

ज्यांनी अरुण सरनाईक यांच्या नितांत सुंदर अभिनयाने नटलेला ‘सिंहासन’ हा सिनेमा पाहिला आहे, त्यांना एकाच पक्षात मुख्यमंत्री पदासाठी होणारे कुरघोडीचे राजकारण ठाऊक असणार. त्यामुळे हे तीन पक्षांच्या महायुतीत नसेल असे
मानणे मूर्खपणाचे आहे. पक्ष वेगळे असल्यामुळे स्पर्धा अटळ आहे. तणावही अटळ. त्यातून मार्ग काढण्याची या त्रिदेवांची क्षमता किती हेच महत्वाचे ठरणार आहेत. फडणवीसांनी या प्रांतातील त्यांची मातब्बरी सिद्ध केलेली आहे. ते मार्गही
काढतील आणि काय घडते आहे, याचा पत्ताही लागू देणार नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा